संतुलित आहार आणि आरोग्य

आपल्या शरीराची रोज झीज होत असते. ती भरून काढण्यासाठी आपल्याला जेवण लागते. अर्थात त्यामध्ये सर्व ते सत्वयुक्त घटक असणे गरेजेचे असते. खनिजांनीयुक्त आहार घेतल्यामुळे शरीराची झीज लवकर भरून निघायला मदत होते. या खनिजांपैकीच एक म्हणजे मॅग्नेशियम.

हाडांची झीज भरून काढण्यायाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे. शरीरातील अनेक जैवरासायनिक प्रक्रिया घडवून आणण्यासाठी हा घटक भूमिका बजावत असतो. हाडे मजबूत ठेवण्यापासून ते ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी मॅग्नेशियम गरजेचे किंबहुना अत्यावश्यकच असते.

आहार आणि जीवनशैलीमध्ये हा घटक इतका महत्त्वाचा असतानाही मॅग्नेशियमबाबत जागरूकता न पाळल्यामुळे त्याच्या कमतरतेकडे दुर्लक्ष केले जाते. साहजिकच शरीरातील त्याच्या कमतरतेमुळे थकवा, स्नायू कमकुवत होणे अथवा हृदयाच्या तक्रारीही जाणवू लागतात. आपण स्वीकारलेली जीवनशैली हे त्यामागचे एक प्रमुख कारण आहे.

शरीराला आवश्यक असलेल्या मॅग्नेशियमची शंभर टक्के गरज भागवलीच पाहिजे. त्याच्या कमतरतेमुळे किंवा त्याचे प्रमाण अत्यल्प असेल तर वेळीच उपचार घेतले पाहिजेत. अन्यथा शरीराचे अपरिमित नुकसान होऊ शकते.

यासंदर्भातील एक संशोधन अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या निष्कर्षांनुसार, मॅग्नेशियम आणि आरोग्य यांच्यात महत्त्वाचा दुवा आहे. शरीरातील त्याचे प्रमाण पुरेसे नसेल तर स्मृतिभ्रंश आणि अन्य कमजोरीशीही सामना करावा लागतो. त्यावरून त्याचे आहारातील महत्त्व किती आहे हे लक्षात येईल.

अमेरिकन मेडिकल डायरेक्टर्स असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे, की मॅग्नेशियमयुक्त नियमित आहारामुळे अकाली वृद्धत्व टाळता येऊ शकते. अर्थात जास्त प्रमाणात मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचे सेवन हेही विपरीत परिणाम करते. त्यामुळे त्यातील संतुलन पाळायला हवे.

योग्य आहार, नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या भाज्या-फळभाज्या, नियमित फलाहार तुमच्या दैनंदिन मॅग्नेशियमची गरज पूर्ण करतो. त्यासाठी योग्य आहाराच्या निवडी आणि योग्य जीवनशैली स्वीकारायला हवी.

शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढवण्याचा एक निश्चित मार्ग म्हणजे नैसर्गिकरीत्या खनिजाने समृद्ध असलेले पदार्थ खाणे. विशेषतः वनस्पती-आधारित पर्याय मॅग्नेशियमनेयुक्त असतात. त्यामध्ये बदाम, काजू, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफूल बिया हे स्नॅकसाठी म्हणून उत्तम पर्याय आहेत. पालकाची भाजीही चांगला पर्याय आहे. क्विनोआ, तपकिरी तांदूळ, ओट्स आणि गव्हाचा ब्रेड हे उत्कृष्ट पर्याय आहेत. केळी आणि एवोकॅडोमध्येही मॅग्नेशियम भरपूर असते.

शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तत्काळ पूरक आहार घेणे केव्हाही चांगले.

नियमित जेवणापासून ज्यांना पुरेसे मॅग्नेशियम मिळत नाही त्यांच्यासाठी पूरक आहार आवश्यकच ठरतो. मॅग्नेशियम सायट्रेट, ग्लाइसिनेट आणि ऑक्साइड असे मॅग्नेशियम सप्लिमेंट्सचे काही प्रकार आहेत. अर्थात त्यातील त्याचे प्रमाण कमी-जास्त असू शकते. ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार आणि डॉक्टरी सल्ल्यानुसार ते घेतले तर अशक्तपणा दूर व्हायला मदत होते. पोटाचे विकार दूर होतात. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. एकूणच निरोगी शरीर असेल तर टवटवीतपणाही राहतो.

Related posts

lead in turmeric : तुम्ही वापरताय ती हळद रंग तर नाही ना?

ganga and cancer: गंगेच्या पठाराला कॅन्सरचा घट्ट विळखा!

आउटफिट ॲण्ड पर्सनॅलिटी