महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फटाके वाजत असतनाच वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही हत्या करण्यात झाल्याचा संशय प्राथमिकदृष्ट्या व्यक्त होत होता, परंतु नंतर लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर येऊ लागले. अटक केलेल्या दोघा संशयितांपैकी एक हरियाणातील आणि दुसरा उत्तर प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. आपण लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हरियाणातील गुरमेल सिंग आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून दोघेही वीस वर्षे वयाचे आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून संशयितांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती, तसेच बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती, असे पोलिसांनी सांगितल्यांचे टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटलं आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या तिसऱ्या संशयिताचाही पोलीस शोध घेत आहेत. मात्र बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी एसआरए वाद आहे की, लॉरेन्स बिश्नोई प्रकरण याबाबतचा संभ्रम दूर होऊ शकलेला नाही.
बाबा सिद्दीकी हे तीन वेळा आमदार तसेच राज्यमंत्रीही होते. त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे सध्या आमदार आहेत. ४८ वर्षे राजकारणात सक्रीय असलेल्या बाबा सिद्दीकी यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी काँग्रेसचे काम सुरू केले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला होता. वाद्रे निर्मलनगर परिसरात फटाके वाजत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. निर्मलनगर पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणामधील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक फरारी असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यामांशी बोलताना दिली,
रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबारानंतर त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी, अभिनेते संजय दत्त, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. काही महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अभिषेक घोसाळकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या या हत्येमुळे मुंबई पुन्हा हादरली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही,असा प्रश्न उपस्थित केला.
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, अत्यंत दुर्दैवी घटना असून याप्रकरणी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात अर्थ नाही,कारण गृहमंत्री अस्तित्वात आहेत, या अंधश्रद्धेतून बाहेर पडूया. पुण्यात भरदिवसा होणारे गोळीबार, गणतप गायकवाड यांचा गोळीबार, अभिषेक घोसाळकरची हत्या या सगळ्या घटना म्हणजे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश होत असल्याच्या निदर्शक आहेत.
डॉ. जलील पारकर यांची माहिती
बाबा सिद्दीकींना लीलावती रुग्णालयात दाखल केले तेव्हा काय घडले याची सविस्तर माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे. बाबा सिद्दीकींना ( Baba Siddique ) दोन गोळ्या छातीवर लागल्या होत्या आणि त्या आरपार गेल्या होत्या. अत्यंत जवळून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना वाचवण्याचे अथक प्रयत्न करूनही ते वाचू शकले नाहीत, असे डॉ. पारकर यांनी सांगितले.
कशी घडली घटना
- बाबा सिद्धिकी ९.१५ मिनिटांच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडले.
- बाबा सिद्धीकी हे कार्यालयाजवळ फटाके वाजवत असताना गोळीबार झाल्याची माहिती आहे.
- फटाके फोडत असताना अचानक तीन जण गाडीतून उतरले.
- तोंडावर रुमाल बांधून हे तीन जण आले होते. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्धिकी यांच्यावर तीन राऊंड फायर केले.
- बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला.
- बाबा सिद्धिकी यांच्या सहकाऱ्याच्या पायाला ही एक गोळी झाली.
- बाबा सिद्धिकी यांना एक गोळी लागल्यानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर लोकांनी त्यांना लिलावती रुग्णालयात तातडीने दाखल केले.
- पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे.
हेही वाचा :