Australia Team : ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पुन्हा स्मिथकडे

Australia Team

सिडनी : या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ दोन कसोटी खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी गुरुवारी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली असून स्टीव्ह स्मिथकडे पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. (Australia Team)

भारताविरुद्धची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका जिंकल्याने ऑस्ट्रेलियाचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड चॅम्पियनशीप) अंतिम फेरीतील प्रवेश यापूर्वीच निश्चित झाला आहे. त्यामुळे, श्रीलंकेविरुद्धची मालिका ही त्यांच्याकरीता केवळ औपचारिकता आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सने पिता बनणार असल्याने या मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीत स्मिथकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली. स्मिथकडे तब्बल सात वर्षांनी संपूर्ण मालिकेसाठी कर्णधारपद देण्यात आले. (Australia Team)

यापूर्वी, २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये चेंडूशी छेडछाड केल्यामुळे स्मिथला ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद गमवावे लागले होते. क्रिकेटविश्वामध्ये ‘सँडपेपर’ म्हणून गाजलेल्या या प्रकरणामुळे स्मिथवर एका वर्षाची बंदीही घालण्यात आली होती. बंदीनंतरच्या सहा वर्षांमध्ये स्मिथने चार कसोटी सामन्यांत बदली कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले. इंग्लंड व वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी एक, तर २०२३ मध्ये भारताविरुद्धच्या दोन कसोटीत तो ऑस्ट्रेलियाचा बदली कर्णधार होता. परंतु, पूर्णवेळ कर्णधार म्हणून तो २०१८ नंतर प्रथमच परदेश दौऱ्यावर जाईल. या मालिकेमध्ये स्मिथला कसोटी कारकिर्दीतील दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचीही संधी आहे. सध्या त्याच्या नावावर ९,९९९ कसोटी धावा जमा असून हा टप्पा पार करण्यासाठी त्याला एका धावेची गरज आहे. (Australia Team)

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघामध्ये कूपर कोनोली या नवोदित फिरकीपटूला संधी देण्यात आली आहे. पॅट कमिन्स व जोश हेझलवूड संघात नसल्याने मिचेल स्टार्कसोबत शॉन ॲबॉट, स्कॉट बोलंड हे वेगवान गोलंदाजीची आघाडी सांभाळतील. त्याचप्रमाणे, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टर, सॅम कॉन्स्टस आणि नॅथन मॅकस्विनी यांनाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. मिचेल मार्शला मात्र वाईट कामगिरीमुळे संघातील स्थान गमवावे लागले आहे. ऑस्ट्रेलिया-श्रीलंका यांच्यामध्ये २९ जानेवारीपासून गॉल येथे पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. (Australia Team)

  • संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, कूपर कोनोली, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टस, मॅट कुन्हेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, नॅथन मॅकस्विनी, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.

हेही वाचा :
राजस्थान, हरियाणा उपांत्यपूर्व फेरीत

Related posts

Football : बालगोपाल, वेताळमाळ संघाचे विजय

Hazare Trophy : राजस्थान, हरियाणा उपांत्यपूर्व फेरीत

Malaysia Open : सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत