मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आगामी पुस्तकावरून ऐन निवडणुकीच्या काळात राजकारण ढवळून निघणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. देशमुख यांनी ट्विटरवर या पुस्तकातील दोन पाने शेअर केली असून त्यात तुरुंगातील अनुभवांबद्दल कथन केले आहे. आपल्याला अटक करण्याचे कारस्थान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच असल्याचे वारंवार सांगणाऱ्या देशमुख यांनी तुरुंगातील अनुभवांच्या आधारे अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावरच निशाणा साधला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसकडून हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे. (Anil Deshmukh)
“तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर यांच्यावर खोटे आरोप करण्यास मला सांगण्यात आले होते, त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली,’’ असा आरोप काही महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांनी एका मुलाखतीद्वारे केला होता. दरम्यान, गेले आठवडाभर देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकाची समाजमाध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. शनिवारी सकाळी देशमुख यांनी एक्सच्या माध्यमातून ‘टरबुज्यासोबतची तुरुंगात झालेली ती खास भेट – तपशील उद्या सकाळी आठ वाजता’ अशी पोस्ट केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्कंठा लागून राहिली होती.
रविवारी सकाळी आठ वाजता देशमुख यांनी एक्सच्या माध्यमातून पुस्तकातील उतारे पोस्ट केले आहेत. त्याआधी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबुज्या-लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय! (Anil Deshmukh)
माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’मधील १६ आणि २० नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबुजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत.
अनिल देशमुख यांची पोस्ट
देशमुख यांनी शेअर केलेला उतारा असा : ‘तुरुंगात अनेकांना घरचं जेवण दिलं जात असे. मात्र मला घरचं जेवण द्यायला न्यायालयाची परवानगी नव्हती, म्हणून मला तुरुंगातलंच जेवण दिलं जायचं. तुरुंगातील जेवण कसं असतं याचा अंदाज वाचक लावू शकतात; मात्र त्यापेक्षाही तुरुंगातील जेवण कितपत सुरक्षित आहे? याची धाकधूक सतत असायची. संपूर्ण तुरुंगात आणि माझ्या सेलमध्येही उंदीर आणि चिचुंद्र्यांची अगदी भाऊगर्दी व्हायची. कित्येकदा असं व्हायचं की, जेवण यायचं आणि मला जेवायला उशीर झाला तर त्यावर उंदीर-चिचुंद्र्या तुटून पडलेले असायचे. यामुळे कित्येकदा उपाशी झोपण्याची वेळही माझ्यावर आली आहे. रविवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी तर जेवणाची परिस्थिती आणखीच खराब असायची; कारण रविवारी दुपारी १२ वाजता सेलचे दरवाजे बंद व्हायचे ते थेट दुसऱ्या दिवशी बारा वाजता उघडायचे. रविवारी दुपारी आलेलं जेवण उरवून ते उंदीर चिंचुंद्र्यांपासून राखून ठेवावं लागायचं. त्यासाठी ते बादलीच्या वर ठेवावं लागायचं आणि त्याची राखण करावी लागायची ते वेगळंच.’ हा उतारा अनिल देशमुख यांच्या पुस्तकात पान क्रमांक १८० वर आहे. यापुढे त्यांनी टरबुजा हा उल्लेख करताना देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे.
‘तुरुंगात तसे तर खूपच उंदीर आणि चिचुंद्र्या होत्या. त्यामध्ये एक उंदीर वेगळा होता. अगदी गलेलठ्ठ. साहजिकच तुरुंगातले सगळे त्याला टरबुजा म्हणायचे. त्याला कितीही दूर हाकलायचा प्रयत्न केला तरीही तो अशा काही नजरेने बघायचा की जणू काही ती नजर सांगत असायची, मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन..!’ (Anil Deshmukh)
चित्रा वाघ यांचे प्रत्त्युत्तर
दरम्यान अनिल देशमुख यांच्या आरोपांवर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोटे बोलताना किमान थोडा तरी रिसर्च करायला हवा होता, अनिलबाबू, असे नमूद करून त्यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पण बिळे पोखरण्याची सवय लागलेला उंदीर त्यात कशाला वेळ घालवणार? नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक झाली तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यानंतर सात महिने त्यांचेच सरकार होते. तरी असे अनुभव या मूषक महाशयांना आले असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि तसेही जेवण कोणते द्यायचे ते न्यायालय ठरवीत असते. कारण कारागृहातील कैदी हा न्यायालयीन कोठडीत असतो. हे तर थेट न्यायालयावरच आरोप करायला निघाले. धन्य ते खंडणीखोर आणि वसुलीबाज गृहमंत्री!!
हेही वाचा :