मणिपूर हिंसाचारग्रस्त भागात ‘स्टारलिंक’सारखे उपकरण

इम्फाळ : मणिपूरमध्ये सातत्याने सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने एके ठिकाणी टाकलेल्या छाप्यावेळी संशयित स्टारलिंक उपकरण सापडले. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. ‘द स्टेट्समन’ने हे वृत्त दिले आहे.

स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क यांनी मात्र भारतात स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवा कार्यरत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यातील चालू असलेल्या वांशिक हिंसाचाराच्या दरम्यान, सुरक्षा दलाने इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील केराव खुनौ येथे छापा टाकला. यावेळी स्टारलिंक उपकरणासारखे दिसणारे हे उपकरण, शस्त्रास्रे आणि दारूगोळा सापडला. सुरक्षा दलांनी अलीकडेच केराव खुनौ येथे छापा टाकून शस्त्रे आणि दळणवळणाच्या उपकरणांचा साठा उघडकीस आणला आहे.

हस्तगत केलेल्या वस्तूंमध्ये एक इंटरनेट सॅटेलाइट अँटेना, इंटरनेट सॅटेलाइट राउटर आणि अंदाजे काही केबल्स होत्या, असे राज्य पोलिसांनी सांगितले.

भारतीय लष्कराच्या स्पीयर कॉर्प्सने ‘एक्स’ वर जप्त केलेल्या वस्तूंची छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यांपैकी एकावर स्टारलिंकसारखा लोगो असल्याचे एका दर्शकाने म्हटले आहे. सोशल मीडियावरही याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले.

एका एक्स यूजरने एलन मस्कना टॅग करत, ‘दहशतवादी हे वापरत आहेत. एलन याकडे लक्ष देतील आणि या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यास मदत करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.’

त्यावर मस्क यांनी या दाव्याचे खंडन करत तत्काळ उत्तर दिले. ‘हे साफ खोटे आहे. स्टारलिंक सॅटेलाइट बीम भारतात वापरली जात नाहीत,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे स्टारलिंककडे भारतात काम करण्यासाठी आवश्यक परवाने नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, संशयित स्टारलिंक डिव्हाइस हिंसाचारग्रस्त राज्यात कसे पोहोचले याचा तपास करीत आहेत. तस्करीच्या माध्यमातून हे डिव्हाइस आले का, या दिशेने शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे संवेदनशील भागात प्रगत दळणवळण तंत्रज्ञानाच्या संभाव्य गैरवापराबद्दल चिंता वाढली आहे.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले