Women’s Cricket : भारताची मालिकेत विजयी आघाडी

Women’s Cricket

राजकोट : फलंदाजांच्या जोरदार कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेत रविवारी सलग दुसरा विजय नोंदवला. हा सामना ११६ धावांनी जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली. (Women’s Cricket)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद ३७० इतकी धावसंख्या उभारली. महिला वन-डे क्रिकेटमधील भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. मागील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध केलेल्या ३५८ धावांचा विक्रम भारताने मागे टाकला. कर्णधार स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी भारताला १९ षटकांत १५६ धावांची सलामी दिली. मानधनाने ५४ चेंडूंमध्ये १० चौकार व २ षटकारांसह ७३ धावा फटकावल्या. प्रतिकाने सलग दुसरे अर्धशतक झळकावताना ६१ चेंडूंमध्ये ८ चौकार व एका षटकारासह ६७ धावांची खेळी केली. या दोघी बाद झाल्यानंतर हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी तिसऱ्या विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी रचली. (Women’s Cricket)

जेमिमाने ९१ चेंडूंमध्ये १२ चौकारांच्या मदतीने १०२ धावा करून कारकिर्दीतील पहिलेवहिले वन-डे शतक ठोकले. हरलीनने ८४ चेंडूत १२ चौकारांसह ८९ धावा करत तिला उपयुक्त साथ दिली. महिला वन-डे क्रिकेटमध्ये केवळ दुसऱ्यांदा भारताच्या चार फलंदाजांना अर्धशतकी टप्पा पार करण्यात यश आले. यापूर्वी, २००४ मध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी केली होती. (Women’s Cricket)

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडला ५० षटकांत ७ बाद २५४ धावाच करता आल्या. आयर्लंडतर्फे ख्रिस्टिना रिलीने ११३ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ८० धावा करून एकाकी लढत दिली. भारतातर्फे १०० वा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना खेळणाऱ्या दीप्ती शर्माने ३७ धावांत ३ विकेट घेतल्या. प्रिया मिश्राने २ विकेट घेतल्या. या मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी, १५ जानेवारी रोजी रंगणार आहे. (Women’s Cricket)

संक्षिप्त धावफलक :
भारत – ५० षटकांत ५ बाद ३७० (जेमिमा रॉड्रिग्ज १०२, हरलीन देओल ८९, स्मृती मानधना ७३, प्रतिका रावल ६७, आर्लिन केली २-८२) विजयी विरुद्ध आयर्लंड – ५० षटकांत ७ बाद २५४ (ख्रिस्टिना रेली ८०, सारा फोर्ब्ज ३८, लारा डेलानी ३७, दीप्ती शर्मा ३-३७, प्रिया मिश्रा २-५३).

Related posts

Ira Jadhav : मुंबईच्या इराची विक्रमी खेळी

Yograj Singh : कपिलला गोळी घालणार होतो!

Shami : महंमद शमीचे पुनरागमन