महिलांनी केली प्रभू श्रीरामाची आरती

वारणसी; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील लम्ही येथील सुभाष भवन येथे मुस्लिम महिला फाऊंडेशन आणि विशाल भारत संस्थेच्या सहकार्याने मुस्लिम महिलांनी एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. द्वेषपूर्ण जिहादींना चोख प्रत्युत्तर देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. महिलांनी स्वत:च्या हाताने सुंदर रांगोळी काढली आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती फुलांनी सजवली. यानंतर त्यांनी उर्दूमध्ये राम आरती गायली. रामनामाचा दिवा द्वेषाचा अंधार नाहीसा करू शकतो, असा संदेश या वेळी देण्यात आला.

या कार्यक्रमात पातालपुरी मठाचे पीठाधीश्वर महंत बालकदास जी महाराजही सहभागी झाले होते. त्यांनी श्रीरामाची स्तुती केली आणि मुस्लिम महिलांसोबत भेदभाव संपवण्याचा संदेश दिला. या उपक्रमाचा उद्देश हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील प्रेम आणि सांस्कृतिक ऐक्य वाढवणे हा होता. या वेळी नाजनीन अन्सारी यांनी आंतरराष्ट्रीय नेत्यांना पत्र लिहून भगवान श्रीरामाच्या भक्तीचा प्रसार करण्याचा सल्ला दिला. यामुळे युद्धे संपतील, शांतता प्रस्थापित होईल आणि लोक मानवतेचा धडा शिकतील, असा त्यांचा विश्वास आहे.

विशाल भारत संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजीव श्रीगुरुजी म्हणाले, की हिंदू-मुस्लिम यांच्यात प्रेम आणि सद्भावनेचा सेतू बांधणे आवश्यक आहे. राम नाव हाच आपल्या कुटुंबाच्या आणि देशाच्या सुरक्षेचा आधार आहे, यावर त्यांनी भर दिला. डॉ. अर्चना भारतवंशी, डॉ. मृदुला जैस्वाल, खुर्शीदा बानो, रोशन जहाँ आणि इतर अनेक महिलांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सांस्कृतिक ऐक्य आणि परस्पर प्रेमाचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Related posts

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा