लखनौ वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानाबाबत एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. यापुढे पुरुष टेलर महिलांच्या कपड्यांचे माप घेऊ शकणार नाहीत, असा निर्णय आयोगाने घेतला आहे. महिलांवरील विनयभंगाच्या घटना पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे. (UP News )
UP News : उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
आयोगाचे म्हणणे आहे, की पुरुष टेलरकडून महिलांची मापे घेताना अनेकदा विनयभंगाच्या घटना घडतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश महिला आयोगाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये महिलांवरील गुन्ह्यांबाबत अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. आयोगाने विशेषत: ज्या ठिकाणी महिलांचे सार्वजनिक व्यवहार होतात, अशा ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. याअंतर्गत जिम, योग केंद्र, कोचिंग सेंटर, बुटीक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची सूचना करण्यात आली आहे.
महिला जेव्हा पुरुष टेलरकडे कपड्यांचे माप घेण्यासाठी जातात, तेव्हा विनयभंगासारख्या घटना घडतात, असे आयोगाचे म्हणणे आहे. या घटना टाळण्यासाठी पुरुष टेलरला महिलांच्या कपड्यांचे माप करण्याची परवानगी देऊ नये, असा प्रस्ताव आयोगाने मांडला आहे. जिम, योगा सेंटर आणि बुटीक यांसारख्या संस्थांमध्ये महिलांचे प्रशिक्षण आणि व्यवस्थापनासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही महिला आयोगाने सुचवले आहे. यासोबतच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरचीही तरतूद करणे बंधनकारक करण्यात यावे. यामुळे महिलांना सुरक्षा मिळणार असून कोणतीही आक्षेपार्ह घटना घडल्यास पुरावे उपलब्ध होणार आहेत.
शिफारसी
- स्कूल बसमध्ये महिला असणे आवश्यक
- स्वच्छतागृहांमध्ये योग्य व सुरक्षित व्यवस्था असावी
- नाट्य केंद्रे आणि विशेष दुकानांवर महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती
हेही वाचा