व्यक्तिवेध : अंतराळातून आल्या अनोख्या शुभेच्छा

दिवाळीच्या शुभेच्छा ! तुम्ही-आम्ही सर्वाँनी एव्हाना एकमेकांना भरभरून शुभेच्छांचे आदान-प्रदान केले आहे.

आनंदात, उत्साहात, जल्लोषात, चैतन्यमय वातावारणात दिवाळी साजरी झाली. दिवाळी हा भारतीयासांठी सर्वात मोठा सण असतो. जणू सणांचा राजा. आजकाल केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात असलेले भारतीय आपापल्या परीने दिवाळी साजरी करतात. शुभेच्छा देतात. घेतात. आजकाल माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे शुभेच्छांची देवाण-घेवाण जलद व सुकर झाली आहे दिवाळी तर शुभेच्छांचा महासागरच असतो. यंदाच्या दिवाळीत एका अनोख्या, लक्षवेधी शुभेच्छा संदेशाने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. कारण हा संदेश थेट अंतराळातून आला आणि तो देणाऱ्या आहेत सुनीता विल्यम्स. मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या अमेरिकन अंतराळयात्री. ‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेच्या मोहिमेतून त्या सध्या अंतराळस्थानकात आहेत.

सुनीता यांनी दिवाळी शुभेच्छांचा हा व्हिडीआओ संदेश पाठवल्याने एक बरे झाले. त्यांचे क्षेमकुशल अत्यंत चांगले असल्याचा संदेश यातून मिळाला. कारण त्यांच्या खुशालीबाबत काहीशी चिंता वाटावी असे सारे वातावरण होते. या मोहिमेसाठी त्या रवाना झाल्या तेव्हा केवळ आठ दिवसांसाठी त्यांची ही मोहीम नियोजित होती, पण त्यांना घेऊन जाणाऱ्या बोईंग स्टरलाईनर या यानात काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने त्यांचे परतणे लांबले. ५ जून २०२३ रोजी त्यांच्या यानाने या मोहिमेसाठी उड्डाण केले होते. म्हणजेच आजच्या तारखेला बरोबर पाच महिन्यांचा काळ लोटला आहे. पृथ्वीवरील त्यांच्या सुखरूप परतीसाठी नासाचे सर्वातोपरी प्रयत्न सुरु आहेत, पण त्याला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप येण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा काळ लागणार आहे. फेब्रुवारी २९२५ मध्ये स्पेस एक्स कंपनीचे दुसरे एक यान मोहिमेवर जाणार असून त्या यानातून सुनीता व त्यांच्यासमवेत असलेले या मोहिमेतील अन्य एक सहकारी अंतराळवीर बरी विल्मोर यांना परत आणण्याचे नियोजन आहे.

अंतराळयात्री म्हणजे असामान्य बुद्धिमत्ता. कमालीची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती हे गुणविशेष त्यांच्याकडे असणारच हे गृहीत धरले तरी जेव्हा आठ दिवसांची मूळ मोहीम आठ महिने लांबते तेव्हा त्यांच्या मनोधैर्यावर काय परिणाम होऊ शकला असता याची कल्पना केली तरी तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांच्या अंगावर शहारे उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत. अशा स्थितीत सुनीता यांच्यासारख्या महिला अंतराळवीराच्या धैर्याला आणि साहसाला दाद देण्यासही शब्द अपुरे पडावेत.

प्रदीर्घ अनुभव

सुनीता सध्या ५९ वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म सप्टेंबर १९६५ चा. त्यांचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या, तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या. सुनीता तीन भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी. सुनीताचे जन्मठिकाण अमेरिकेतील युक्लिड, ओहिओ. मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हायस्कूलमधून त्यांचे सुरवातीचे शिक्षण झाले. भौतिक विज्ञान या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची (बीएस) तर अभियांत्रिकी प्रबंधन या विषयात त्या मास्टर ऑफ सायन्स (एमएस) पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. १९८७ ला त्या अमेरिकन नौदलात रुजू झाल्या होत्या. नेव्हल कोस्टल सिस्टिम कमांडमध्ये सहा महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर त्यांची बेसिक डायव्हिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांची जुलै १९८९ मध्ये नेव्हल एव्हिएटर म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सप्टेंबर १९९२ मध्ये अँड्रयू चक्रीवादळाच्या वेळी मायामी, फ्लोरिडा येथे झालेल्या बचावकार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. जून १९९८ मध्ये त्या सैपान येथे नियुक्त असताना त्यांची अवकाश मोहिमेकरिता नासामध्ये निवड झाली. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे तसेच त्यांच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे. आणखी एक विशेष माहिती. अमेरिकन अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सुनीता व अन्य अमेरिकन अंतराळवीरांना मतदान करता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Related posts

ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर

विहिरीत पडलेला माणूस

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम