दरोडेखोरांच्या हातात भगवा नाही शोभत

बुलडाणा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते. छत्रपती शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे, तो मावळ्यांच्या हातात शोभतो. दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही. आपल्या पक्षावर दरोडा घातला. चाळीस जणांची टोळी आली. दरोडा घालून पक्ष चोरून नेला. आता म्हणत आहेत, की हा पक्ष आमचा आहे. गद्दारच आहेत ते. खोकेबाज आणि धोकेबाज आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपची पिसे काढली. जयश्री शेळके यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी बुलडाण्यात ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या नाही. मागच्या वेळी गद्दारांवर विश्वास ठेवला आणि चूक केली, त्याबद्दल माफी मागतो. छत्रपती शिवरायांचा झेंडा घेऊन नाचवत आहेत, ते काही सगळेच मावळे नाहीत. गेल्या वेळी आपण चूक केली. मी निवडणुकीच्या प्रचारात फिरतो आहे, तर पाहिले की प्रत्येक ठिकाणी आपल्या विरोधात आपला  गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच आहे ही चूक माझी आहे, कारण यांना तिकिट विश्वास ठेवून मी दिले होते. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या गद्दारांना निवडून दिले होते. आता त्या  चुकीची पुनरावृत्ती करणार नाही. पन्नास खोके आता नॉट ओके. आता यांनी एवढे कमावले आहे, की त्यांना हरवले, तरी काही फरक पडत नाही एवढे त्यांनी कमावले आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.

५० खोके तर आता सुटे पैसे झाले आहेत, असे ते म्हणाले. भाजपवाल्यांची आणि मोदी यांची आम्हाला कमाल वाटते. चोर दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येत आहात ? भाजपला कुणी ओळखत नव्हते, तेव्हा आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एक नारा देऊन गेले, की बटेंगे तो कटेंगे. कुणाची हिंमत आहे असे करण्याची? आम्हाला काय शिकवत आहात ? असा सवाल ठाकरे यांनी केला. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बारा बलुतेदार सगळे आमच्या पाठीशी आहेत. योगीजी, तुमच्या महायुतीकडे बघा. तुमचे गुलाबी जॅकेटवाले म्हणाले, बाहेरच्या लोकांनी येऊन लुडबूड करू नये. महायुतीत एकवाक्यता नसेल तर तुम्ही आम्हाला कशाला शिकवता ? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

तंगडे धरून फेकून देऊ

हिंदुत्वाचा भ्रम तुम्ही निर्माण केलात. वर गेल्यानंतर आम्हाला लाथा घालू लागलात ? ठीक आहे तुमचे तंगडे धरून तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिले नाही, तर मी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलणार नाही,’ असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Related posts

‘लाडकी बहीण’चा हप्ता अधिवेशनानंतर जमा, सर्व आश्वासने पूर्ण करणार

Nana Patole : बीडमधील गुंडगिरीत सहभागी मंत्र्याची हकालपट्टी करा

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट