कोल्हापूर : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब झाले असतील त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नसल्याने कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी अशी याचिका कोल्हापूर खंडपीठात माजी खासदार राजू शेट्टी यांनी दाखल केली. कोल्हापूर खंडपीठाने याबाबत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य , रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिवासह कोल्हापूर , सांगली , सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. (Toll on Pune Kolhapur roads)
दोन आठवड्यापुर्वी केरळ राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या खराब रस्त्यांच्या दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या त्रिसदस्यीय समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची याचिका फेटाळून फटकारले होते. या पार्श्वभुमीवर राजू शेट्टी यांनी कोल्हापूर ते पुणे हा रस्ता अत्यंत निकृष्ठ झालेला असून जोपर्यंत रस्त्याची कामे पुर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल आकारणी न करण्याची मागणी खंडपीठात केली आहे. (Toll on Pune Kolhapur roads)
याचिकेमध्ये राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री , मुख्य सचिव , रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव त्याबरोबरच कोल्हापूर , सांगली , सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी केले आहे.कोल्हापूर ते पुणे या २४० किलोमीटरच्या महामार्गावर प्रवास करण्यासाठी ज्याठिकाणी तीन तासात पोहचणे अपेक्षित असताना सध्या सात तास लागत आहेत. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होवू लागले आहे. पावसाळ्यात प्रवास करताना अनेक मोठे अपघात झाले असून वाहतूकदारांना प्रचंड मनस्ताप होवू लागला आहे.
कोल्हापूर खंडपीठाकडून मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती शर्मिला देशमुख व न्यायमुर्ती एम. एस. कर्णिक या खंडपीठाकडून प्राधिकरणासह वरील सर्व विभागांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत नोटीसा लागू करण्यात आल्या आहेत. सध्या कोल्हापूर ते पुणे या महामार्गावर दैनंदिन दीड ते दोन कोटी रूपयांची टोल वसुली केली जात आहे मात्र वाहतूकदारांना सुविधा कोणत्याच दिल्या जात नाहीत. सदर याचिकेच्या निर्णयामुळे कोल्हापूर , सांगली , सातारा व पुणे या जिल्ह्यातील प्रवाशांना व वाहतूकदारांना दिलासा मिळणार असून या मार्गावर प्रवास करणा-यांच्या नजरा आता या याचिकेच्या निकालाकडे लागल्या आहेत. (Toll on Pune Kolhapur roads)