बीड : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर धारदार शस्त्रांनी जिवघेणा हल्ला झाला आहे. त्यामध्ये खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुणे हे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. राम खाडे यांच्यावर झालेला हल्ला हा भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासोबत सुरू असलेल्या वादातून झाल्याचा आरोप खाडे यांच्या समर्थकांनी केला आहे. (Attack on Ram Khade)
मिळालेल्या माहितीनुसार, राम खाडे आपल्या सहकाऱ्यांसह मांदळी गावातील एका हॉटेलमधून जेवण करून बीडकडे परतत होते. अचानक अंधारात हल्लेखोरांनी गाडीच्या समोर अडथळा आणला आणि जोरदार दगडफेक सुरू केली. गाडीच्या बाजूचा आरसा फोडत वाहनाची मोठी हानी केली. त्यानंतर लाठ्या, तलवारी, पिस्तूल आणि सत्तूर घेऊन हल्लेखोरांनी थेट गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खाडे यांनी काही वार हातावर झेलले. हत्याराचे वार खोलवर गेल्याने त्यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत. त्यांचे शरीर रक्तबंबाळ झाले. परिस्थिती इतकी गंभीर होती की रुग्णालयात दाखल होईपर्यंत ते बेशुद्ध पडले होते. त्यांना तात्काळ अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण, प्रकृती अधिकच चिंताजनक होत गेल्याने तातडीने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्यात आले. (Attack on Ram Khade)
घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. पण, अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. हल्लेखोरांच्या हातात सत्तूर, काठी आणि बंदुकीसारखी शस्त्रे होती. त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि राम खाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचे सीसीटीव्ही दिसून आले आहे. (Attack on Ram Khade)
भाजपचे आमदार सुरेश धस आणि राम खाडे यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरु आहेत. खाडे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर देवस्थान जमीन घोटाळ्यांसह गैरकारभाराचे आरोप केले होते. तसेच त्यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सध्या हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना राम खाडे यांचा शस्त्र परवाना रद्द केला जातो. पोलीस संरक्षणही काढले जाते, हे कोणाच्या सांगण्यावरून काढले जाते? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी उपस्थित केला आहे.