Home » Blog » गीर अभयारण्यातील आठ सिंहांचा मृत्यू

गीर अभयारण्यातील आठ सिंहांचा मृत्यू

गोचीडांमुळे पसरणा-या आजाराचा सिंहांच्या छाव्यांना धोका

by प्रतिनिधी
0 comments
  • हिमांशू नितनवरे

गुजरातमधील गीर अभयारण्यात आशियाई सिंहांमध्ये बाबेसिया रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या काही दिवसांत आठ सिंहांचा मृत्यू झाला असून आणखी १७ सिंहांवर उपचार सुरू आहेत. जगातील एकमेव आशियाई सिंहांची ही नैसर्गिक अधिवासभूमी असल्याने या घटनेने पुन्हा एकदा गिरमधील सिंहांचे कुनो अभयारण्यात स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (Eight Asiatic lions dead in Gir)

बाबेसिया किंवा बाबेसिओसिस हा गोचीडांद्वारे पसरणारा आजार असून तो Babesia या परजीवी प्रोटोजोआमुळे होतो. या आजारामुळे ताप, अशक्तपणा, खोकला आणि नाकातून स्त्राव अशी लक्षणे दिसतात. परजीवी लाल रक्तपेशी नष्ट करत असल्याने गंभीर परिस्थितीत प्राणघातक गुंतागुंत निर्माण होऊ शकते, विशेषतः सिंहांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर.

मॅकॅलेस्टर कॉलेजचे प्राणी वर्तनशास्त्राचे प्राध्यापक आणि गेल्या दशकभरापासून आशियाई व आफ्रिकन सिंहांवर संशोधन करणारे स्तोत्र चक्रवर्ती यांनी सांगितले की, ही परिस्थिती चिंताजनक असली तरी व्यापक संदर्भात तिचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. (Eight Asiatic lions dead in Gir)

“मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक पिल्लांचा समावेश आहे. आमच्या दीर्घकालीन अभ्यासानुसार एका वर्षाखालील सिंहपिल्लांचा नैसर्गिक जगण्याचा दर साधारण ५० टक्के असतो,” असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, उपलब्ध माहितीनुसार या मृत्यूंमुळे संपूर्ण सिंहसंख्येवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र ज्या भागात हा रोग आढळला आहे, त्या भागात सिंह आणि पाळीव जनावरांचा मोठ्या प्रमाणावर संपर्क येत असल्याने रोगाचा प्रसार तिथून झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोचीडांमुळे वाढणारा धोका

‘मेटास्ट्रिंग फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘बायोडायव्हर्सिटी कोलॅबोरेटिव्ह’चे समन्वयक रवी चेल्लम यांनी सांगितले की, हा संसर्गजन्य नसून ‘व्हेक्टर-बोर्न’ म्हणजे गोचीडांमार्फत पसरणारा आजार आहे. त्यामुळे तो थेट एका सिंहाकडून दुसऱ्याकडे पसरण्याची शक्यता कमी असते.

मात्र सिंह हे सामाजिक प्राणी असल्याने त्यांच्यातील जवळच्या संपर्कामुळे गोचीड एका सिंहाकडून दुसऱ्याकडे जाऊ शकतात. त्यामुळे रोगाचा प्रसार वाढू शकतो. (Eight Asiatic lions dead in Gir)

चेल्लम यांनी सांगितले की, ‘कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस’ (CDV) आणि बाबेसिया हे एकत्र आल्यास परिस्थिती अधिक गंभीर बनते. २०१८ मध्ये सीडीव्हीमुळे ११ सिंहांचा मृत्यू झाला होता.

स्तोत्र चक्रवर्ती यांनी १९९४ मधील सेरेन्गेटीतील भीषण साथीसंदर्भात सांगितले की, बाबेसिया आणि सीडीव्ही या दोन्ही रोगांच्या संयुक्त परिणामामुळे तेव्हा जवळपास एकतृतीयांश सिंहसंख्या नष्ट झाली होती.

“गोचीडांच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे बाबेसियाने कमकुवत झालेल्या सिंहांना सीडीव्हीचा संसर्ग अधिक घातक ठरला. त्यामुळे मृत्यूदर झपाट्याने वाढला,” असे ते म्हणाले.

गीरमध्ये ८९१ सिंह (Eight Asiatic lions dead in Gir)

२०२५ च्या सिंह गणनेनुसार गुजरातमध्ये एकूण ८९१ आशियाई सिंह आहेत. हे सिंह गीर सोमनाथसह आसपासच्या ११ जिल्ह्यांत विखुरलेले आहेत.

मुख्य वन्यजीव संरक्षक आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक जयपाल सिंह यांनी `डाउन टू अर्थ`ला सांगितले की, २८ मेनंतर नव्या मृत्यूची किंवा संसर्गाची नोंद झालेली नाही. (Eight Asiatic lions dead in Gir)

“हा संसर्ग सिंहांमध्ये नवीन नाही. २०२५ मध्येही सुमारे १०-११ सिंहांचा मृत्यू झाला होता,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, या काळात वाढणारे तापमान आणि आर्द्रता यामुळे गोचीडांचा प्रादुर्भाव वाढतो.

जयपाल सिंह यांनी सांगितले की, गोचीड प्रामुख्याने गुरांमधून सिंहांपर्यंत पोहोचतात. गेल्या वर्षी शेत्रुंजी विभागात हा संसर्ग दिसून आला होता. मात्र यंदा गीर सोमनाथ आणि अमरेली जिल्ह्यांच्या पश्चिम सीमावर्ती भागात अचानक संसर्ग आढळल्याने चिंता वाढली.

त्या भागात सुमारे ५० सिंह राहतात.

विशेष उपचार सुरू

सध्या १७ सिंहांवर विशेष उपचार सुरू असून त्यांना रक्तही दिले जात आहे.

“रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण टिकवण्यासाठी रक्त संक्रमण केले जात आहे. आवश्यकतेनुसार ड्रिप्स, अँटिबायोटिक्स आणि कृमीनाशक उपचारही दिले जात आहेत,” असे जयपाल सिंह यांनी सांगितले.

गेल्या वर्षी दीड वर्षांच्या एका सिंहपिल्लाला रक्त संक्रमणाद्वारे यशस्वीरित्या वाचवण्यात आले होते.

वन विभागाने गीर परिसरात रोगनियंत्रण मोहीम तीव्र केली असून संशयित सिंहांना वेगळे ठेवण्यात येत आहे. गोचीड काढणे आणि कृमीनाशाचे कामही सुरू आहे.

दुसऱ्या अधिवासाची गरज पुन्हा चर्चेत

रवी चेल्लम यांनी पुन्हा एकदा आशियाई सिंहांसाठी दुसरा नैसर्गिक अधिवास निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने १५ एप्रिल २०१३ रोजी गीरमधील सिंहांचे मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात सहा महिन्यांच्या आत स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते.

“हा आदेश अंमलात न आणून गुजरात सरकार आणि केंद्र सरकार आशियाई सिंहांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करत आहेत,” असे चेल्लम म्हणाले.

त्यांच्या मते, स्वतंत्र आणि भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या भागात सिंहांची दुसरी मुक्त लोकसंख्या निर्माण करणे हे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आणि दीर्घकालीन संवर्धनासाठी आवश्यक पाऊल आहे.

विखुरलेली लोकसंख्या ही जमेची बाजू (Eight Asiatic lions dead in Gir)

स्तोत्र चक्रवर्ती यांच्या मते, गीरमधील सिंहसंख्या तुलनेने मोठ्या भूभागात विखुरलेली असल्याने संसर्गाचा झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते.

“लोकसंख्या एका मर्यादित भागात एकवटलेली नसल्याने सर्व सिंहांना एकाच वेळी रोगाचा फटका बसण्याचा धोका कमी होतो,” असे त्यांनी सांगितले.

मात्र दुसरी मुक्त सिंहसंख्या निर्माण करण्याचा प्रश्न हा केवळ वैज्ञानिक नसून सामाजिक, राजकीय आणि धोरणात्मक बाबींशी जोडलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संशोधक मीना वेंकटरमण यांनीही सिंह संवर्धनाच्या चर्चेत दीर्घ अनुभव असलेल्या शास्त्रज्ञ आणि क्षेत्रीय जीवशास्त्रज्ञांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

(सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या (सीएसई) `डाऊन टू अर्थ` च्या सौजन्याने)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00