कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येतील तीन प्रमुख आरोपी हिंदू जनजागरण समितीचा विरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर झाला आहे. तावडे याला नरेंद्र दाभोळकर हत्येच्या खटल्यात यापूर्वीच जामिन मिळाला असल्याने त्याचा कारागृहातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टाची ऑर्डर मिळाल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात त्याची सुटका होण्याची शक्यता आहे. (Pansare murder case)
सहा आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर
पानसरे हत्या खटल्यातील सहा आरोपींना यापूर्वी जामिन मिळाला आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील सर्व १२ आरोपीं तुरुंगाबाहेर येणार आहेत. सध्या तावडे, काळे आणि कळसकर कळंबा कारागृहात आहेत. त्यांनी अनेकवेळा कोर्टात जामिन अर्ज करुन त्यांना जामीन मंजुर झाला नव्हता. कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सुनावणी होऊन तिघांना जामीन मंजूर झाला आहे. याआधी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भारत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी यांना सहा आरोपींना यापूर्वीच न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकलपीठाने जामिन मंजूर केला होता. (Pansare murder case)
मॉर्निग वॉकहून घरी परतताना पानसरेंवर हल्ला
कॉम्रेड गोविंद पानसरे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी पत्नी उमा पानसरे यांच्यासह सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. मॉर्निग वॉकहून घरी परतताना त्यांच्या प्रतिभानगर परिसरातील निवासस्थानाजवळ मोटार सायकलवरुन आलेल्या दोघांना गोळ्या झाडल्या. त्यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी त्यांना ताबडतोब अस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. अधिक उपचारासाठी पानसरे यांना एअर अम्बुलन्सने मुंबईत ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा २० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. या घटनेने देश हादरला. पानसरेंची हत्या सनातनच्या मंडळींनी केली असा आरोप सातत्याने केला जात होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन हिंदू जनजागरण समितीचा विरेंद्र तावडेसह १२ आरोपींना अटक केली. (Pansare murder case)