मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांना शनिवारी ‘ब्रेन स्ट्रोक’ आला. त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Tiku Talsania)
तलसानिया हे मुंबई येथे एका गुजराती चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी गेले असता, त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर, त्यांना कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त माध्यमांमधून देण्यात येत होते. तथापि, त्यांना हृदयविकाराचा झटका नाही, तर ब्रेन स्ट्रोक आल्याचे त्यांच्या पत्नी दीप्ती तलसानिया यांनी स्पष्ट केले. ७० वर्षीय तलसानिया यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. (Tiku Talsania)
प्रामुख्याने विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या तलसानिया यांनी गुजराती रंगभूमीवरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. १९८४ साली ‘ये जो है जिंदगी’ या दूरदर्शन मालिकेद्वारे त्यांनी हिंदी मनोरंजन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. दिल है के मानता नही (१९९१), हम है राही प्यार के (१९९३), अंदाज अपना अपना (१९९४), कभी हां कभी ना (१९९३), जुडवा (१९९७), इश्क (१९९७), हंगामा (२००३) आदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून पसंतीची दाद मिळाली होती. (Tiku Talsania)
मागच्या वर्षीच त्यांची ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटातील भूमिकाही गाजली होती. त्यांची मुलगी शिखा तलसानिया हीसुद्धा अभिनेत्री असून तिने ‘वेक अप सिड’ (२००९), वीरे दि वेडिंग (२०१८) आदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
हेही वाचा :