‘मार्ग’ सोशल मिडियाचा संवादाबरोबरच उत्पन्नाचा

खरं तर कधीच वाटलं नव्हतं की खिशात बसणारा टीचभर ‘मोबाईल’ आपले विश्वच व्यापून टाकेल. परंतु मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे . मनोरंजन,ऑनलाईन खरेदी – विक्री , ऑनलाईन बँकिंग आणि पैसे कमविण्याचे प्रभावी साधन बनला आहे. मोबाईल ! सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून तो एक उत्पन्नाचा स्रोत बनू शकतो. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर केवळ लोकांशी संवाद साधण्यासाठीच नव्हे तर उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत म्हणूनही केला जात आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून लोक विविध पद्धतींनी चांगले उत्पन्न कमावत आहेत. (Social Media )

सोशल मीडियावर सर्जनशीलता आणि संवादकौशल्य असल्यास तुम्हीही यशस्वी होऊ शकता. आजची पिढी व्हिडीओच्या माध्यमातून रेव्हिन्यू जनरेट करीत आहे . यूट्यूब हे जगातील सर्वात मोठे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, जिथे दररोज कोट्यवधी लोक व्हिडिओ पाहतात. तुमच्याकडे एखादा विषय किंवा तंत्रज्ञानाबद्दल माहिती असेल, तर तुम्ही यूट्यूब चॅनेल सुरू करून त्यावर विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड करू शकता. यूट्यूबवर विविध प्रकारच्या व्हिडिओंना लोक प्राधान्य देतात. तांत्रिक माहिती , मनोरंजन, शिक्षण, पाककला, प्रवास, फिटनेस इत्यादी. अशा व्हिडिओंवर जाहिराती दाखवून कमाई करता येते. याशिवाय, स्पॉन्सर्ड कंटेंट, ब्रँड प्रमोशन आणि अफिलिएट मार्केटिंगमधूनही उत्पन्न मिळू शकते.अ‍ॅफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखाद्या उत्पादनाची लिंक तुमच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर शेअर करणे आणि त्या लिंकवरून खरेदी झाली की तुम्हाला कमिशन मिळणे. हा एक चांगला मार्ग आहे ,ज्याद्वारे आपणास कोणतेही उत्पादन तयार न करता, केवळ ते प्रमोट करून पैसे मिळू शकतात. (Social Media)

यूट्यूब प्रमाणेच इंस्टाग्राम हे देखील फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगचे प्लॅटफॉर्म आहे, जे जगात खूप लोकप्रिय आहे. जर अकाउंटला चांगले फॉलोअर्स असतील, तर तुम्ही इंस्टाग्रामवर एक इन्फ्लुएन्सर म्हणून नाव कमावू शकता. ब्रँड्सना त्यांच्या उत्पादने आणि सेवांचा प्रचार करण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सची गरज असते. जर तुम्ही आपला प्रभावी कंटेंट तयार करून फॉलोअर्स वाढवू शकत असाल, तर तुम्हाला ब्रँड्सकडून पैसे मिळू शकतात. एक इन्फ्लुएन्सर म्हणून आपण चांगल्या कन्टेन्ट च्या माध्यमातून जगावर प्रभाव पडू शकतो. नुकताच बिग बॉस चा विजेता झालेला सुरज चव्हाण असो किंवा कोकण हार्टेड गर्ल अंकिता तसेच इचलकरंजीचा धनंजय पोवार याची उत्तम उदाहरणे आहेत.

जर तुमची रुची व्हिडीओपेक्षा लिहिण्यात असेल , तर ब्लॉग लिहिणे हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही आपल्या ब्लॉगद्वारे प्रवास, अन्न, तंत्रज्ञान, जीवनशैली, आरोग्य आणि फिटनेस, आर्थिक सल्ले, शिक्षण अशा विविध विषयांवर लेखन करू शकता. ब्लॉग हे प्रभावी साधन आहे ज्यातून तुम्ही आपल्या वाचकांशी थेट संवाद साधला जाऊ शकतो . सोशल मीडियावर पैसे कमावण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत, मात्र त्यासाठी वेळ, मेहनत आणि योग्य रणनीती आवश्यक आहे. तुमचे कंटेंट लोकांसाठी उपयुक्त, सर्जनशील आणि प्रभावी असणे आवश्यक आहे.फक्त तासंतास टाईमपास म्हणून व्हिडीओ बघण्यापेक्षा सोशल मीडिया च्या सकारात्मक वापराने तुम्ही उत्पन्नाचा चांगला मार्ग बनवू शकता !

– ॲड पृथ्वीराज कदम

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ