The Offer and The Killer उत्कट अनुभव देणारी सीरिज आणि सिनेमा

  • अमोल उदगीरकर

मागच्या आठवड्यात एक अप्रतिम सीरिज आणि एक सुंदर सिनेमा बघायला मिळाला. सर्वप्रथम सीरिजबद्दल बोलूयात.(The Offer and The Killer)

‘द ऑफर’ चं सौंदर्य त्याच्या कथेत तर आहेच पण त्यापेक्षाही त्या सीरिजमधल्या ‘माहोल’ मध्ये आहे. ‘द ऑफर’ ही सीरिज तुम्हाला छोटी छोटी आश्वासनं देते आणि ती पूर्ण करते. आपल्याकडे जेव्हा एखाद्या कलाकृतीच्या तयार होण्याची गोष्ट बनते तेव्हा ती नेहमी त्यांच्या निर्मिकाच्या किंवा त्या कलाकृतीमागच्या सर्जनशील व्यक्तिरेखेच्या POV मधून बनते. ‘Mank’ हर्मन जे मॅकेविझच्या चष्म्यातून दिसतो. ‘लक बाय चान्स’ विक्रम जयसिंगच्या गॉगलमधून दिसतो. आणि अजूनही उदाहरणं आहेत.

‘द ऑफर ‘ चं वेगळेपण असं की ती घडते ‘गॉडफादर’ या अजरामर चित्रपटांच्या यादीत ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान पटकावणाऱ्या प्रोड्युसरच्या नजरेतून. आपल्याकडे प्रोड्युसर म्हणजे सिनेमात पैसे गुंतवून हिरोईनवर डोरे टाकणारा माणूस अशी जनमानसात एक इमेज आहे. खरं तर ‘प्रोडक्शन’ हा फार किचकट, जगाशी पंगे घेत असणाऱ्या लोकांचा जॉब आहे. काही खूप गाजलेले सिनेमे बनण्यात दिग्दर्शकापेक्षा executive producer (EP ) आणि निर्मात्यांचा वाटा जास्त असल्याची उदाहरण आहेत. निर्भीडता हीच पात्रता, लोकांना अंगावर घेणं हेच क्वालिफिकेशन. ‘गॉडफादर’ लिहिणारा मारियो पुझो आणि ‘गॉडफादर’ ही फिल्म डायरेक्ट करणारा फ्रांसिस फोर्ड कपोला इथं दिसत असले तरी ते काहीशा दुय्यम भूमिकेत आहेत. इथल्या दोन प्रमुख भूमिकांमध्ये आहेत पॅरामाउंट या स्टुडिओचा प्रोडक्शन हेड इव्हान्स आणि ‘गॉडफादर’ च्या निर्मितीचं शिवधनुष्य खांद्यावर घेतलेला अल्बर्ट रुडी. (The Offer and The Killer)

सिनेमाचं मीठ खाल्लेल्या लोकांची गोष्ट

अल्बर्ट रुडी हा ‘गॉडफादर’ मधल्या मायकेलसारखाच एकांडा, मनस्वी इसम. ‘गॉडफादर’ मधल्या मायकेलबद्दल बोलताना फ्रान्सिस कपोला बोलून जातो, “He is outsider in his own family.” हेच विधान खरं तर रूडीला पण लागू होण्यासारखं आहे. सिनेमा क्षेत्राचा फारसा अनुभव नसणारा नवशिका रुडी ‘गॉडफादर’ च्या निर्मितीची जबाबदारी घेतो खरं पण पावलापावलावर त्याला प्रचंड अडथळे येतात. त्या अडथळ्यांमागे तत्कालीन अमेरिकेतली सामाजिक-राजकीय गुंतागुंत आहे. ‘गॉडफादर’ च्या केंद्रस्थानी असणारे माफिया ज्या प्रभावशाली ‘अमेरिकन -इटालियन’ समूहातून आलेले आहेत, त्यांचा ‘गॉडफादर’ पुस्तकाला आणि त्यावर बनणाऱ्या सिनेमाला जोरदार आक्षेप आहे.

हा सिनेमा बनू नये म्हणून जोरदार प्रयत्न चालू होतात आणि त्यात आपसूकच इन्व्हॉल्व होतात माफिया. त्यातून प्रोजेक्टवर आणि रूडीवर पण मरणांतिक संकट येतात. बजेटसाठी आणि दिग्दर्शकाला हवी ती कास्टिंग मिळवून देण्यासाठी रुडी आपल्या वरिष्ठांशी वाईटपणा घेऊन संघर्ष करत असतो. खरं तर रुडी हा काही सृजनशील कलाकार नाहीये. पण कपोला आणि पुझोसारख्या कलाकारांना व्यवहारी आणि पैसा हाच परमेश्वर असणाऱ्या हॉलिवूड स्टुडियो सिस्टमपासून तो ज्या निगुतीने जपत असतो ते बघून प्रत्येक दिग्दर्शकाला वाटेल की आपला प्रोड्युसर /executive producer पण रूडीसारखाच असावा. रुडीच्या मागे ठामपणे उभी असणारी त्याची सेक्रेटरी बेटी, रुडी आणि इव्हान्सच्या आयुष्यात येऊन गेलेल्या पॉम्पस स्त्रिया, रुडीशी जिव्हाळ्याचं मैत्र तयार झालेला माफिया जो कोलंबो ही लोकं बघताना वाटत जातं की या प्रत्येक माणसात एक त्याचं स्वतःचं शहर आहे. उगीच स्टिरिओटाइप झालेल्या प्रोड्युसर लोकांना ट्रिब्यूट देणारी ही सीरिज.

तुम्हाला ‘लक बाय चान्स’ आवडला असेल तर हा तुमचा शो आहे. श्रीकृष्णाने वर माग असं कुंतीला सांगितल्यावर त्याला ‘दुःख देत राहा’ असा वर मागितला होता. एखादी कलाकृती बनवताना पडद्यामागे राहून योगदान देणारी माणसं कुंतीसारखी असतात. सिनेमाचं मीठ खाल्लेल्या लोकांनी सिनेमाचं मीठ खाल्लेल्या या लोकांची गोष्ट एकदा तरी आवर्जून बघितली पाहिजे. वूटवर आहे. (The Offer and The Killer)

प्रोफेशनल किलरच्या सायकॉलॉजीचा वेध

याच आठवड्यात बघितलेला डेव्हिड फिंचरचा ‘द किलर’ हा पण एक वेगळा अनुभव होता. ‘सेव्हन’, ‘झोडियॅक’ आणि ‘माईंडहंटर’ सारखं फिंचरचं पूर्वीचं काम डोक्यात ठेवून डेव्हिड फिंचरची ‘द किलर’ बघणार असाल तर थोडा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. मला व्यक्तिशः फिल्म प्रचंड आवडली. फिंचरच्या आधीच्या कामापेक्षा खूप वेगळं आहे हे.

एरवी सीरियल किलर आणि त्यांच्या सायकॉलॉजीचा वेध घेणाऱ्या फिंचरने इथं एका प्रोफेशनल किलरच्या सायकॉलॉजीचा आणि फिलॉसॉफीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रोफेशनल किलर आपलं सावज टप्प्यात येईपर्यंत तासंतास, दिवसेंदिवस वाट बघतात. ते वाट बघत बसणं फिंचरने दाखवलं आहे आणि ही वाट बघत असताना किलर आपली सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफी प्रेक्षकांना सांगत असतो. सिनेमाचा तीस ते चाळीस टक्के भाग कॉन्ट्रॅक्ट किलरच्या मुख्य भूमिकेत असणाऱ्या मायकेल फासबेंडरच्या मोनोलॉगचा आहे.

मध्यंतरी एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द किलर’ च्या स्क्रीनिंगनंतर उपस्थित प्रेक्षकांनी फिल्मला स्टँडिंग ओव्हेशन दिल्यावर आणि टाळ्या वाजवल्यावर डेव्हिड फिंचर वैतागून तिथून निघून गेला होता असं वाचलं होतं. फिंचरच वैतागणं ‘द किलर’ बघितल्यावर थोडं कळलं. स्लो बर्न सिनेमा आहे म्हणून न वैतागता सिनेमा बघणार असाल तर ट्रीट आहे. एका प्रसंगात कॉन्ट्रॅक्ट किलरच्या हातून मृत्युमुखी पडण्यापूर्वी एक पात्र त्याला अस्वलाची आणि शिकाऱ्याची एक बोधकथा सांगतं. सिनेमातला सर्वोत्कृष्ट प्रसंग. शेवट पण खूप अनपेक्षित. फिल्म नक्की बघा. नेटफ्लिक्सवर आहे. (The Offer and The Killer)

Related posts

‘पुष्पा’ होतोय मालामाल; रक्तचंदनाचा होईना लिलाव

अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक

Pushpa २ ला कन्नडमध्ये “UI” कडून धोबीपछाड