Home » Blog » मिडियाची भरभराट, पत्रकारिता मृतवत : पी.साईनाथ

मिडियाची भरभराट, पत्रकारिता मृतवत : पी.साईनाथ

0 comments
The Media Flourishes, Journalism Lies Moribund

कोल्हापूर : प्रतिनिधी : मिडिया आणि पत्रकारिता ही वेगळी आहे. मिडिया कार्पोरेट आहे. त्यांचे उत्पन्न दिवसेदिवस वाढत आहे. मिडियाची आर्थिक भराभराट झाली असताना पत्रकारिता मृतवत झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी व्यक्त केली. मिडियातून फक्त मनोरंजन होते आहे पण जागतिक, राष्ट्रीय घटनांचे परिणाम सर्वसामान्य कष्टकरी जनतेवर पडत आहेत. त्याचे प्रतिबिंब पत्रकारितेत पडले पाहिजे. त्यासाठी पत्रकारांनी सजग राहून पत्रकारिता केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते ज्येष्ठ पी.पत्रकार पी.साईनाथ यांना अनंत दीक्षित पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच मोहन मस्कर स्मृती पुरस्कार मुंबई तकचे संपादक अभिजित करांडे यांना देण्यात आला. स्मृतीचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.  राजर्षी शाहू स्मारक भवन येथे अनंत दीक्षित स्मृती समितीच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (The Media Flourishes, Journalism Lies Moribund)

पी.साईनाथ म्हणाले, मिडिया फक्त मनोरंजन करत असून देशातील मिडियाचे वार्षिक उत्पन्न यावर्षी २.७९ ट्रिलियन इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत ते सात टक्क्यांनी वाढले असून बारा वर्षांनी हे उत्पन्न दुप्पट होणार आहे.भारतातील मिडियाचे वार्षिक उत्पन्न हे जगभरातील ७२ देशांच्या एकून उत्पन्नापेक्षा जास्त आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 मिडियात पत्रकारांचे अवमुल्यन झाले आहे. गेल्या पाच वर्षात देशातील प्रमुख मिडियातील चार हजार पत्रकारांना निवृत्त करण्यात आले आहे. करोनाच्या काळात मिडिया ही अत्यावश्यक सेवा म्हणून घोषणा मोदी सरकारने केली असली तरी या अत्यावश्यक सेवेतील तीन हजार पत्रकारांना कामावरुन काढून टाकले होते असेही पी.साईनाथ यांनी सांगितले.

पी.साईनाथ यांनी पत्रकारितेची अनुभवही सांगितले. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचे विवाह तोट्याच्या शेतीमुळे पुढे ढकलली जात आहेत. अंदाजे तीन लाख कुटुंबातील मुलींचे विवाह झालेले नाही अशी माहितीही त्यांनी दिली. पण याची माहिती मिडियात दिली जात नाही. मिडियामध्ये अंबांनीच्या मुलाचा विवाह, सेलिब्रिटींची अटक, जामिन याला महत्व दिले जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारतातील कापूस, सी फूड, सोयाबीन, साखर उद्योगाला फटका बसला आहे. तर दुसरीकडे न्यूझिलंड आणि युरोममधील देशांशी झालेल्या करारामुळे भविष्यात डेअरी उद्योगावर संकट येणार आहे. पण टॅरिफच्याविरोधात केंद्रसरकारच्या नितीवर एकही शब्द छापून येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (The Media Flourishes, Journalism Lies Moribund)

आखाती युद्धाचा भारतावर मोठा परिणाम झाला आहे. डिझेलचे शॉर्टेज होईल या भितीने पंजाब आणि उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून १८ टक्के व्याजाने कर्ज घेऊन डिझेल खरेदी केले. कारण गव्हाच्या मळणीसाठी ट्रॅक्टर व अन्य साधनांवर अवलंबून असल्याने त्यासाठी शेतकऱ्यांनी डिझेल खरेदी केले, अशी माहितीही त्यांनी दिली.

गॅस टंचाईमुळे उत्तर प्रदेशातील माध्यान भोजन योजनेवर परिणाम झाला. दीड लाख मुले माध्यान भोजनापासून वंचित राहिले आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक झाडावर चढून सरपन गोळा करत आहेत. तर शाळेचे गॅस सिलिंडर ब्लॅकमध्ये विकले जात आहेत. उत्तर भारतात गॅस टंचाईमुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे सरणातील लाकडे चोरुन घरी नेऊन स्वयंपाकासाठी वापरत आहेत अशी माहिती पी.साईनाथ यांनी दिली. पण अशा बातम्या कुठेच मिडियात दाखवली जात नाही अशी खंत व्यक्त केली. देशात आगडोंब उसळला आहे. यावेळी पत्रकाराने सजग राहून निपक्षपातीपणे, धाडसाने पत्रकारिता केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.  

एकीकडे सरकारची दडपशाही सुरू असताना लोक एकत्र येत आहे. लोकशक्तीपुढे सरकारलाही झुकावे लागते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारला तीन कायदे मागे घ्यावे लागले हे शेतकरी आंदोलनाचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकच्या अदिवासी शेतकऱ्यांनी मुंबईवर लाँग मार्च काढताना दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या मुलांना अडचण होऊ नये म्हणून रात्री मुंबई गाठली होती अशी माहिती दिली. अनवाणी आलेल्या या शेतकऱ्यांचे मुंबईतील जनतेला आश्चर्य वाटले आहे. दहावीच्या विद्यार्थांची आणि नागरिकांना त्रास न झाल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते अशी माहितीही त्यांनी दिली.

सत्काराला उत्तर देताना पत्रकार अभिजित कारंडे म्हणाले, सध्याचा काळ आव्हानात्मक आहे आणि तितकाच संधीचा आहे. सध्याच्या काळात छोट्या बातमीतून सत्य मांडण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे पत्रकारांवर खूप टीका होत आहे. पत्रकारांना सत्ताधारी आणि विरोधकांकडून शेलक्या संज्ञा दिल्या जात आहेत. अशावेळी जी चूक आहे ते सांगण्याचे धाडस पत्रकारांना दाखवावे लागणार आहे.

सध्याच्या काळात भिती आणि हाव यामधून पत्रकारांना काम करावे लागत आहे. भिती हा स्थायीभाव झाला आहे. धर्म,जात पात याकडे दुर्लक्ष करुन विद्वेषाच्या राजकारणाला तिलाजंली देत भितीतून बाहेर पडत पत्रकारिता केली पाहिजे, असा सल्लाही करांडे यांनी दिला. वादळ किती येऊ दे पण दिवा खाली ठेऊ द्यायचा नाही यासाठी पी.साईनाथ यांच्या लेखणीतून प्रेरणा मिळते असेही ते म्हणाले.

यावेळी खासदार शाहू छत्रपती, राजू शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे यांनी केले तर सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी आभार मानले. उपस्थितांचे स्वागत राधेश्याम जाधव, अदिनाथ चव्हाण, विश्वास पाटील, धनंजय बिजले यांनी केले.  (The Media Flourishes, Journalism Lies Moribund)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00