बीड : प्रतिनिधी : भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी बीडचे तत्कालिन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली. त्यांनी राज्य सरकारची ७३ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेने आयएएस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला जात होता. अविनाश पाठक यांनी जमिनीच्या मुल्यांकनामध्ये प्रचंड फेरफार करुन कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. जमिनीचा वाढीव मोबदला मिळवण्यासाठी खातेदारांनी जिल्हाधिकारी पाठक यांच्याकडे अर्ज केले होते. त्यांची २२ एप्रिल २०२५ मध्ये बदली झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील मागील तारखांवर बनावट आदेश काढण्यात आले. जुन्या तारखा, बनावट सह्या वापरुन १५४ प्रकरणांमध्ये २४२ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर केला होता. त्यापैकी अंदाजे ७३ कोटी चार लाख रुपये संबधित खातेदारांना वाटप करण्यात आले. यासंबधित आदेश देताना कोणतेही रजिस्टर, नोंदवहीबाबतची माहिती भूसंपादन समन्वय कार्यालयात ठेवण्यात आली नव्हती. एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात १० जणाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये अविनाश पाठक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आज अविनाश पाठक यांच् चौकशी केल्यानंतर लातूर येथील घरातून त्यांना अटक करण्यात आले. (IAS Officer Avinash Pathak arrested in land acquisition scam case)
अविनाश पाठक यांची कारकीर्द
अविनाश पाठक हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते महाराष्ट्र केडरमध्ये कार्यरत होते. बीडचे जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. बीडमध्ये त्यांनी १५ वर्षे सेवा बजावली आहे. बीड जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, निवासी उप जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळातही त्यांनी काम केले आहे. गेल्या वर्षी त्यांची लातूरमध्ये बदली करण्यात आली होती. (IAS Officer Avinash Pathak arrested in land acquisition scam case)