कोल्हापूर : प्रतिनिधी : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारे २०२४ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संजय कृष्णाजी पाटील ( मुंबई )यांचा ‘ उदध्वस्त वर्तमानाच्या दाहीदिशा’ आणि तर सुनीता झाडे (नागपूर ) यांचा ‘शब्दाच्या पसा-यातील अर्थाच्या आत्महत्या’ या संग्रहांना यंदाचा पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान समारंभ येत्या २४ मे रोजी सकाळी दहा वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे. (Ratnakar)
पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी पाच हजार रुपये, गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध कवी, कथाकार डॉ. रफीक सूरज यांनी काम पाहिले. धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार यापूर्वी श्रीधर नांदेडकर, श्रीकांत देशमुख, वीरधवल परब, कल्पना दुधाळ, संजीवनी तडेगावकर, अरुण इंगवले, पी. विठ्ठल, सुरेश सावंत, अजय कांडर, सारिका उबाळे, सुचिता खल्लाळ, पद्मरेखा धनकर, दीपक बोरगावे, कविता मुरूमकर, हबीब भंडारे, गोविंद काजरेकर, राजेंद्र दास, केशव देशमुख, कीर्ती पाटसकर, अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर आदींना देण्यात आला आहे. समारंभास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू यांनी केले आहे. (Ratnakar)