कोल्हापूर: तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने दत्तक घेतलेले राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्याने मिळवलेल्या यशाने तालुक्याचा शैक्षणिक आसमंत उजळून निघाला आहे. कासारवाडा पैकी धनगरवाडा येथील विद्यार्थी पांडुरंग बाबुराव फोंडे याची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) परीक्षेत सहायक सेनानी (असिस्टंट कमांडंट) या पदावर निवड झाली आहे. (Pandurang Phonde cracks CAPF exam)
अत्यंत दुर्गम डोंगराळ भागातील आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील पांडुरंग यांच्या शिक्षणाची व करिअर जडणघडणीची जबाबदारी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने दहावीपासून स्वीकारली. शिक्षणाचा संपूर्ण खर्च, योग्य मार्गदर्शन आणि करिअर घडविण्यासाठी आवश्यक पाठबळ संस्थेने दिले. या आधाराच्या जोरावर पांडुरंग यांनी कठोर परिश्रम करत केंद्रीय पोलीस दलातील क्लास-वन अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.
डॉ. जगन्नाथ पाटील यांचे मार्गदर्शन
या संपूर्ण प्रवासात आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील आणि मातोश्री वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी पांडुरंग यांच्या करिअर घडविण्यात विशेष योगदान दिले. “एखाद्या विद्यार्थ्याला दत्तक घेणे म्हणजे केवळ त्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे नव्हे; तर त्याच्या स्वप्नांना बळ देऊन त्याला सक्षम भविष्याकडे घेऊन जाणे होय,” या विचाराने कार्यरत असलेल्या शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला पांडुरंग यांच्या यशामुळे मोठी सार्थकता प्राप्त झाली आहे. (Pandurang Phonde cracks CAPF exam)
एका दुर्गम गावातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला शिक्षणाच्या माध्यमातून केंद्रीय पोलीस दलातील अधिकारी बनविण्यापर्यंतचा हा प्रवास शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या सामाजिक बांधिलकीची आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे राहण्याच्या संस्थेच्या ध्येयाची यशोगाथा ठरला आहे. पांडुरंग यांच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण ‘शहीद शिक्षण परिवारात’ आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. त्यांच्या यशाची ही प्रेरणादायी कहाणी संस्थेतील तसेच परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा देणारी ठरणार आहे. पांडुरंग फोंडे यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.