Sydney Test : भारताचे पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’

Sydney Test

सिडनी : भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात येणाऱ्या अपयशावर अद्यापही उत्तर सापडले नसल्याचे सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी पुन्हा स्पष्ट झाले. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील या पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात शुक्रवारी भारताचा डाव १८५ धावांत आटोपला. त्यानंतर दिवसअखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाने १ बाद ९ धावा केल्या होत्या. (Sydney Test)

कर्णधार रोहित शर्माने या सामन्यासाठी ‘विश्रांती’ घेतल्यामुळे जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा कर्णधार आहे. शुक्रवारी त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु, भारतीय फलंदाजांना त्याचा निर्णय सार्थ ठरवता आला नाही. डावाच्या पाचव्याच षटकात मिचेल स्टार्कने सलामीवीर लोकेश राहुलला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. आठव्या षटकात यशस्वी जैस्वाल बोलंडच्या गोलंदाजीवर बाद झाला. उपाहारापूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर नॅथन लायनने शुभमन गिलला बाद केल्याने उपाहारावेळी भारताची अवस्था ३ बाद ५७ अशी झाली होती. (Sydney Test)
दुसऱ्या सत्रामध्ये विराट बोलंडच्या ऑफ स्टंपबाहेरच्या चेंडूचा बळी ठरला. विराटला १७ धावाच करता आल्या. त्यानंतर, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी सावध फलंदाजी करत चहापानापर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवला. या दोघांनी भारताचे शतकही धावफलकावर लावले. चहापानानंतर बोलंडने पंतला बाद करून ही जोडी फोडली. पंतने ९८ चेंडूंमध्ये ३ चौकार व एका षटकारासह ४० धावा केल्या. जडेजा २६ धावा करून स्टार्कचा बळी ठरला. तळातील बुमराहच्या फटकेबाजीमुळे भारताला पावणेदोनशेचा टप्पा ओलांडता आला. बुमराहने ३ चौकार व एका षटकारासह १७ चेंडूंत २२ धावा फटकावल्या. पॅट कमिन्सने बुमराहला बाद करून भारताचा डाव संपवला. ऑस्ट्रेलियातर्फे बोलंडने ४, स्टार्कने ३, तर कमिन्सने २ विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी केवळ तीन षटके फलंदाजी केली. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर बुमराहने उस्मान ख्वाजाला राहुलकडे झेल देण्यास भाग पाडून ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट काढली. (Sydney Test)

पंचांच्या निर्णयावरून वाद
भारताचा फलंदाज विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद होताहोता वाचला. बोलंडच्या गोलंदाजीवर विराटचा झेल स्टिव्ह स्मिथच्या दिशेने आला. स्मिथने जमिनीलगत हा चेंडू उडवला व मार्नस लॅबुशेनने झेल टिपला. परंतु, रिप्लेमध्ये स्मिथने उडवण्यापूर्वी चेंडूचा स्पर्श मैदानाला झाल्यासारखा दिसल्याने तिसऱ्या पंचांनी विराटला नाबाद ठरवले. या निर्णयावर ऑस्ट्रेलियन संघाने नापसंती व्यक्त केली. त्यानंतर, भारताच्या वॉशिंग्टन सुंदरला बाद देण्याचा निर्णयही वादग्रस्त ठरला. वॉशिंग्टनच्या बॅटला चेंडू लागल्याचे स्निकोमीटरमध्ये स्पष्ट संकेत नसतानाही पंचांनी त्याला बाद ठरवले. त्यावेळी, नॉन-स्ट्रायकर असलेल्या बुमराहने याविषयी मैदानावरील पंचांकडे नाराजी व्यक्त केली.

धावफलक :

  • भारत : पहिला डाव – यशस्वी जैस्वाल झे. वेबस्टर गो. बोलंड १०, लोकेश राहुल झे. कॉन्स्टस गो. स्टार्क ४, शुभमन गिल झे. स्मिथ गो. लायन २०, विराट कोहली झे. वेबस्टर गो. बोलंड १७, रिषभ पंत झे. कमिन्स गो. बोलंड ४०, रवींद्र जडेजा पायचीत गो. स्टार्क, नितीश कुमार रेड्डी झे. स्मिथ गो. बोलंड ०, वॉशिंग्टन सुंदर झे. कॅरी गो. कमिन्स १४, प्रसिध कृष्णा झे. कॉन्स्टस गो. स्टार्क ३, जसप्रीत बुमराह झे. स्टार्क गो. कमिन्स २२, महंमद सिराज नाबाद ३, अवांतर २६, एकूण पहिला डाव ७२.२ षटकांत सर्वबाद १८५.
  • बाद क्रम : १-११, २-१७, ३-५७, ४-७२, ५-१२०, ६-१२०, ७-१३४, ८-१४८, ९-१६८, १०-१८५.
    गोलंदाजी : मिचेल स्टार्क १८-५-४९-३, पॅट कमिन्स १५.२-४-३७-२, स्कॉट बोलंड २०-८-३१-४, ब्यू वेबस्टर १३-४-२९-०, नॅथन लायन ६-२-१९-१.
  • ऑस्ट्रेलिया : पहिला डाव – सॅम कॉन्स्टस खेळत आहे ७, उस्मान ख्वाजा झे. राहुल गो. बुमराह २, एकूण ३ षटकांत १ बाद ९.
    बाद क्रम : १-९.
  • गोलंदाजी : जसप्रीत बुमराह २-०-७-१, महंमद सिराज १-०-२-०.

हेही वाचा :
रोहित शर्मा संघाबाहेर?
आकाश दीप सिडनी कसोटीस मुकणार

Related posts

KSA Football :‘शिवाजी’ची ‘दिलबहार’वर मात

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १२ जानेवारीला संघनिवड

‌Bumrah Injury : बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुकणार?