ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर

महाराष्ट्र दिनमान;  प्रतिनिधी : 

‘मी केवळ अकॅडमिक किंवा माझ्या क्षेत्राशी संबंधित संस्थांचेच पुरस्कार स्वीकारते. कोणतेही राजकीय पुरस्कार स्वीकारणे मला आवडत नाही…’

दोनवेळा जाहीर झालेला देशाचा सर्वोच्च पद्मभूषण सन्मान नाकारणाऱ्या या ताठ कण्याच्या विदुषी म्हणजे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ रोमिला थापर. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांचा ९३ वा वाढदिवस झाला. कसलाही अभिनिवेष न बाळगता आणि राजकीय लाभासाठी तत्त्वच्युत्ती न करता त्या निष्ठेने इतिहास संशोधनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात आजही तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत.

प्रामुख्याने प्राचीन भारत हा संशोधन विषय असलेल्या थापर या डॉ. दया राम थापर यांच्या कन्या होत. ते लष्कराच्या सशस्त्र दलाच्या वैद्यकीय विभागाचे महासंचालक होते.

रोमिला थापर यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल ॲण्ड आफ्रिकन स्टडीजमधून भारतीय इतिहासात डॉक्टरेट मिळवली. १९६१ आणि ६२ दरम्यान त्यांनी कुरूक्षेत्र विद्यापीठात अध्यापन केले. त्यानंतर १९७० पर्यंत दिल्ली विद्यापीठात प्राचीन भारताच्या इतिहासावर त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर त्या नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) प्रोफेसर एमेरिटस होत्या. साक्षेपी अभ्यासक आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी इतिहासाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी विद्यार्थ्यांना दिली. त्याचवेळी त्यांनी विपुल ग्रंथलेखनही केले. त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातकीर्त झाल्या. कॉर्नेल विद्यापीठ, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ आणि पॅरिसमधील कॉलेज डी फ्रान्स येथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काही काळ त्यांनी काम केले.

इतिहासाकडे पाहण्याची स्वच्छ आणि स्पष्ट दृष्टी असलेल्या थापर यांचे उजव्या विचारसरणीशी उघड मतभेद आहेत. २००२ मध्ये, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने इतिहास आणि सामाजिक विज्ञानाची पाठ्यपुस्तके बदलली. विशेषत: गोमांस सेवन आणि प्राचीन काळातील जातीव्यवस्थेसंबंधीचा ऊहापोह करणारे उतारे काढून टाकले. सरकारच्या या कृतीवर थापर यांनी आक्षेप नोंदवला होता.

२००३ मध्ये त्यांची लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या क्लुग अध्यासनावर नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी ‘हिंदूविरोधी’ आणि ‘मार्क्सवादी’ अशी संभावना करून त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवण्यात आला होता. तथापि, जगभरातील अनेक इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांनी थापर यांना पाठिंबा दिला आणि त्यांची निवड केल्याबद्दल लायब्ररी ऑफ काँग्रेसचे कौतुक केले.

इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या अध्यक्ष, ब्रिटीश अकादमीच्या करस्पॉन्डिंग फेलो, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीच्या सदस्य, लेडी मार्गारेट हॉल, ऑक्सफर्ड आणि स्कूल ऑफ ओरिएंटल ॲण्ड आफ्रिकन स्टडीजच्या मानद फेलो, अमेरिकन ॲकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेसच्या मानद सदस्य अशा जबाबदाऱ्या देऊन या आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान केला.

शिकागो विद्यापीठ, पॅरिसमधील इन्स्टिट्यूट नॅशनल डेस लँग्यूज एट सिव्हिलायझेशन ओरिएंटेल, ऑक्सफर्ड विद्यापीठ, एडिनबर्ग विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. मानव्यविद्या अभ्यासासाठी त्यांची २००८ च्या क्लुग पुरस्काराच्या सह-विजेत्या म्हणून निवड करण्यात आली होती.

वादाची वादळे झेलणाऱ्या साक्षेपी आणि सत्यान्वेषी इतिहास संशोधक म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. अलीकडेच म्हणजे, जून २०१९ मध्ये जेएनयू प्रशासनाने रोमिला थापर यांच्यासह काही प्रोफेसर इमेरेट्सना सीव्ही द्यायला सांगितले होते. त्यावर, त्यांनी प्रोफेसर एमिरेट्स हा सन्मान आहे आणि जगात कुठेही एमेरिटसचा दर्जा प्रदान केल्यानंतर त्यांचे पुनर्मूल्यांकन केले जात नाही, अशा शब्दांत विद्यापीठ प्रशासनाला सुनावले. ‘विद्यापीठाचे बदलले प्रशासन एखाद्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा तीव्र आक्षेप त्यांनी नोंदवला होता. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (जेएनयूटीए) ने देखील जेएनयू प्रशासनाचा हा निर्णय ‘राजकीयदृष्ट्या प्रेरित’ असल्याचे म्हटले होते. तसेच थापर यांची व्यक्तिश: माफी मागण्याची मागणी केली होती.

रोमिला थापर यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ

  • अशोका ॲण्ड द डिक्लाइन ऑफ द मौर्याज
  • ए हिस्ट्री ऑफ इंडिया : व्हॉल्युम १
  • एनशिएंट इंडिया, मीडायव्हल इंडिया
  • द पास्ट ॲण्ड प्रीज्युडाइस
  • एनशिएंट इंडियन सोशल हिस्ट्री
  • एक्झिल ॲण्ड द किंग्डम
  • डिसेंट इन अर्ली इंडियन ट्रॅडिशन

Related posts

विहिरीत पडलेला माणूस

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम

लोककला संघटक