-अनिलचंद्र यावलकर
सुमारे ७०० वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. ‘दुरितांचे तिमिर जावो’ हीच यामागची मुख्य भावना असावी. अज्ञानाच्या तिमिरात चाचपडणाच्या जनसमुदायासाठी माऊलींनी ही ज्ञानाची ज्योत पेटवली.
ज्ञान माणसाला सक्षम करते. भक्ती भाबडं करते. पंढरीची वारी हा ज्ञान आणि भाबडेपणा यांचा सुंदर मिलाफ आहे.
आत्महत्या करणाऱ्यातला एकही वारकरी नाही. कष्ट सगळ्यांनाच आहेत पण ज्ञानेश्वरीचे ज्ञान आणि विठ्ठलाच्या चरणी असलेला भाबडेपणा झुंजायचे बळ देतो.
आजचं देशातील चित्रं बघता आपल्या देशात भंपक बाबांचं पेव फुटलं असून बुवाबाजीला ऊत आलेला आहे. बहुतांशी बाबा भोंदू आहेत आणि भोंदूगिरी करून अजाण जनतेला बकरा बनवत असतात..
‘तुम्ही माझ्याकडे या.मी तुमच्या समस्यांचं निराकरण करतो कुणी आसाराम बाबा तर कोणी राम रहिम तर आणखी कोणी.. तुम्ही मला देवा माना’ असे सांगणारे विष्णूचे, शंकराचे, दत्ताचे, सत्य साईबाबांचे स्वयंघोषित अवतार म्हणून भोंदू बाबांनी बाजार मांडला आहे. हे बाबा कोणतेही बळ देत नाहीत. अफूची गोळी देऊन समाजाला दुबळे करत असतात..
वारकरी संप्रदाय यापेक्षा खूप वेगळा आहे, त्याचा भक्तिभाव तसा नाही. ज्ञानेश्वर माऊलीचा वारकरी आपल्या सगळ्या दु:खांचा भार माऊलीवर टाकून मोकळा होत नाही. आपली जीवनाची लढाई स्वतःचं खंबीरपणे लढून तो विठाई माऊलीच्या पंढरीच्या वारीला जातो. संत ज्ञानदाने जो मार्ग दाखवला त्यावर तो चालतो. ही माऊलींची लेकरं मोठ्या उत्साहाने फुगड्या-रिंगण रिंगण धरतात.
विश्वात्मक एकात्मतेचा संदेश देतांना ज्ञानातून येणारा अहंकार वारीत गळून पडतो, तसाच अज्ञानातून येणारी लाचारीही या ज्ञान गंगेत वाहून जाते, उरतं फक्त निर्मळ पवित्र वारकऱ्यांचं हृदयामृत..
ज्ञानेश्वर माऊलींनीं लावलेल्या या अमृत वृक्षाला ज्ञान पालवी फुटली तोच हा माऊलीचा ज्ञानवृक्ष वारकरी संप्रदाय.. सातशे वर्षांनंतरही त्याठिकाणी माऊलींचा तो वटवृक्ष उभा आहे. माऊलींकडून मिळवलेले ज्ञानाचे कण न् कण वारकरी बंधू प्राणपणाने जपतो. तो आपल्या आयुष्यात एक तरी झाड लावतो. आपल्या पुढच्या पिढीसाठी भित्रेपणाची, परावलंबाची, अंधविश्वासाची विषवेल लावायची की माऊलींकडून मिळालेल्या ज्ञानाचे कण पेरायचे हे ज्याचं त्यानं ठरवावं.
वैदिकांच्या असमानतेच्या वैतागाला कंटाळून काही संतानी या असमानतेला आव्हान दिले आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली. मुळात वारकरी संप्रदाय हा सात्विक, समानता, बंधूंभाव व आदरभाव जपणारा संप्रदाय. येथे जातीपातीला थारा कधीच नव्हता. वारकरी समाजाने संत मुक्ताई संत जनाबाई , कान्होपात्रा, वेणाबाई , शामा बाई,अक्काबाई, बहिणाबाई अशा अनेक थोर स्त्री संताच्या परंपरेने त्यांच्या भजनातून, ओव्यामधून समाजभान राखलं. तत्कालीन चुकीच्या सामाजिक रूढींवर त्यांनी ताशेरे ओढले. त्यांचा वारकरी संप्रदायाने पुरस्कार केला. समाजातील स्रियांबद्दल आदर दाखवला.
माऊलींची पालखी जेंव्हा निघते तो अवर्णनीय सोहळा..
अनेक प्रांतातून माऊलीच्या दर्शनासाठी वारकरी,खांद्यावर पालख्या घेऊन चालणारे वारकरी रस्त्यात विसाव्यासाठी थांबतात त्या वेळी या वारकऱ्यांची सेवा करणारी मंडळी कोण कोण असतात ? हे लक्षांत घेता वारकरी संप्रदायाची महती, मोठेपण आपल्या लक्षात येईल.
आपल्या स्वधर्माच्या आस्था, श्रद्धा व परंपरा पाळत असताना इतर धर्मियांच्याही काही श्रद्धा व परंपरा असतात.
वारकरी संप्रदाय हा कधी कोण्या एका जातीचा नाही ना धर्माचा.. तो जातपात मानत नाही धर्मभेद मानत नाही. संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत सावता माळी, संत गोरोबा कुंभार असे अनेक सर्व जाती -धर्माच्या संतांचे मोलाचे योगदान वारकरी संप्रदायाला लाभले आहे.. मात्र आज काही बाबा, काही किर्तनकारांना कीर्तन करताना या संतांच्या विचारधारेचे विस्मरण झालेले दिसते.
समाजाच्या प्रबोधनच्या नावाखाली, मानधनाच्या नावाखाली लोकांकडून पैसा काढणे, अव्वाच्या सव्वा बिदागी मागणे इ. प्रकार सर्रास सुरू असून जेव्हढा मोठा महाराज तेव्हढं मोठं त्याचं मानधन. कीर्तनं अक्षरशः लिलावात विकली जात आहेत हे कटू सत्य आहे.. समाजात प्रवचनाच्या/कीर्तनाच्या नावाखाली दांभिकतेचा बाजार मांडला जात आहे. याला फक्त वारकरी संप्रदाय कारणीभूत आहे का की सर्व धर्मातील सर्व छोटे, मोठे संप्रदाय कारणीभूत आहेत ?
ज्ञानाच्या – तर्कशुद्धतेवर सामाजिक मूल्यांच्या कसोटीवर घासून याचा विचार करण्याची आज वेळ आहे..
वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी बंधुना विनम्र आवाहन आहे की, त्यांनी अशा भोंदू व बाजार मांडणाऱ्या प्रवचन – कीर्तनकार लोकांना जे माऊलीच्या नावाखाली समाजाची फसवणूक करीत आहे त्यांना प्रतिबंध घालायला हवा, रोखायला हवं .
ज्ञानेश्वर माऊलींने दिलेला ज्ञान मंत्र जपुन विश्व सुखी समृद्ध, एकोपा जपण्याचा सात्विक वारसा टिकवायला हवा.
पुन्हा वारकरी समाजातील ज्ञाती मंडळींनी सामाजिक आणि वैचारिक विचारांचं दळण दळून पीठ काढायला हवं. त्यातून पुन्हा बहिणाबाईंची “कांदा मुळा -भाजी अवघी विठाई माझी” ही आपुलकी दाखवून अवघी पंढरी आपुली हा संदेश देण्याची गरज आहे.
संत कबीर म्हणतात..
मैली चादर ओढके हे भगवन
द्वार तेरे कैसे आऊं ..!