केपटाउन : दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावामध्ये ६१५ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर रायन रिकलटनने आफ्रिकेतर्फे द्विशतक झळकावले, तर कर्णधार तेंबा बावुमा आणि काइन व्हेरियेन यांनी शतके ठोकली. (South Africa)
या सामन्यात प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३१६ धावा केल्या होत्या. शुक्रवारी १७६ धावांवर नाबाद असणाऱ्या रिकलटनने शनिवारी द्विशतकाला गवसणी घातली. त्याने ३४३ चेंडू मैदानावर तळ ठोकत २९ चौकार व ३ षटकारांसह २५९ धावांची खेळी केली. मायदेशात २५० धावांची खेळी करणारा तो आफ्रिकेचा पहिलाच सलामीवीर ठरला. व्हेरियेनने १४७ चेंडूंमध्ये ९ चौकार व ५ षटकारांसह १०० धावा फटकावताना रिकलटनसोबत सहाव्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारीही रचली. हे दोघे बाद झाल्यानंतर तळातील मार्को यान्सन आणि केशव महाराज यांच्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेला सहाशे धावांचा टप्पा ओलांडता आला. यान्सनने ६२, तर महाराजने ४० धावा फटकावल्या. पाककडून महंमद अब्बास आणि सलमान आघा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. (South Africa)
संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका – पहिला डाव १४१.३ षटकांत सर्वबाद ६१५ (रायन रिकलटन २५९, तेंबा बावुमा १०६, काइन व्हेरियेन १००, महंमद अब्बास ३-९४, सलमान आघा ३-१४८) विरुद्ध पाकिस्तान.
हेही वाचा :
कसोटीतून माघार घेतलीय; निवृत्ती नाही