स्नेहबंध आणि स्नायूबंध

शिवडी मतदारसंघातून उभे राहिलेले ‘मनसे’ उमेदवार बाळा नांदगावकर, मानखुर्द- शिवाजीनगरचे उमेदवार राष्ट्रवादी आपगटाचे नवाब मलिक, घाटकोपर (पूर्व) मतदारसंघातील भाजपा उमेदवार पराग शहा यांचे पडलेल्या चरणी बालके विनम्र यांजकडून साष्टांग नमस्कार !

निवडणुकीचा प्रचार सुरू झाला की पायांना भिंगरी लावून फिरायचं आणि संपूर्ण मतदारसंघात तोंडाला झिंगरी लावून वाट्टेल ती आश्वासनं देत मतं मागायची या इराद्याने आपण आपापल्या मतदारसंघात पिकनिक करायला निघालात खरे; पण आपणा तिघाही महोदयांना निवडणुकीला उभे राहता राहता असे ना तसे पडावे लागले, याचे आमचे मनास अतिशय वाईट वाटते आहे. प्रचाराला रंग चढण्यास सुरुवात होत असतानाच आपल्यासारख्या खद्या बंद्यांना दुखापतीचे असे ग्रहण लागणे म्हणजे तो एक प्रकारे आपापल्या पक्षांना अपशकुनच आहे, असे आपले हितचिंतक समाजमाध्यमांवर बरळत आहेत. तथापि, त्यांचे म्हणणे मनावर न घेता आपण तिघांनीही आपापला प्रचार-अपप्रचार चालू ठेवावा व सदरहू निवडणुकीनंतर आपले सरकार निवडून आल्यास प्रत्येक आमदारास प्रतिमहा रु. १५०० किंवा त्या पटीत ‘दुखापत भत्ता’ जाहीर करावा, अशी आपणास कळकळीची विनंती आहे.

श्री. नांदगावकर, आपण १९९५ साली पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून माझगावमधून निवडून आलात. १९९९ आणि २००४ साली पुन्हा शिवसेनेच्याच तिकिटावर निवडून आलात. ९ मे २००६ रोजी ‘मनसे’ची स्थापना झाल्यावर आपण राज ठाकरेंबरोबर गेलात आणि ‘मनसे’ च्या तिकिटावर शिवडी मतदारसंघातून २००९ साली आमदार झालात. पण गेल्या दहा वर्षात आपले नेते आणि महाराष्ट्राचे थोर मार्गदर्शक माननीय स्वश्रीठा (स्वरराज श्रीकांत ठाकरे) यांनी आपले मार्ग वारंवार बदलते ठेवल्यामुळे, ‘राज म्हणे आता उरलो उपदेशापुरता’ अशा आध्यात्मिक अवस्थेत त्यांना सध्या फिरावे लागत आहे आणि आपल्यासारख्या त्यांच्या जुन्या जाणत्या सहकाऱ्यांना निवडणुकीचा निकाल लागायच्या आधीच पडून घ्यावे लागत आहे. आपण शिवडी मतदारसंघातून यावेळी रिंगणात आहात. आपल्या विरुद्ध उबाठा गटाचे अजय चौधरी लढा देत आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात अभ्युदय नगरमध्ये प्रचार करताना एका इमारतीची पायरी उतरताना आपला तोल गेला आणि पायाचे हाड फ्रैक्चर झाले, या प्रकाराची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे वाटते. नाहीतरी शिवडीमध्ये भाजपने आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे, तेव्हा नांदगावकर पायरी उतरताना पडावेत म्हणून कोणी विरोधी गटाकडून करणी-बिरणी केली की काय याची चौकशी करण्यासाठी ते सीबीआयला कामाला लावू शकतात. त्या चौकशीचा निष्कर्ष काय जो येईल तो येवो, पण आपण आपल्या मतदारसंघात व्हीलचेअरवर बसून जो प्रचार चालू ठेवला आहे तो पुढे तसाच चालू ठेवावा आणि भरपूर मतांनी आपल्यासारखा ‘मनसे’चा एक तरी उमेदवार निवडून यावा, अशा शुभेच्छा देतो.

श्री. नवाब मलिक, अलीकडेच आपल्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने आपणास चालण्यास त्रास होत असल्याचे वृत्त वाचून, ऐकून व पाहून वाईट वाटले. तथापि, मंगळवारपासून मानखुर्द मतदारसंघात आपला प्रचार पुन्हा सुरू झाला आणि गोवंडीत आपण आपल्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटनही केल्याचे समजले आणि बरेही वाटले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संघटित गुन्हेगारी टोळीचे प्रमुख शेख दाऊद इब्राहिम कासकर यांच्याशी आपले संबंध असल्याचे आरोप नागपूरचे महान संशोधक दे. गं. फडणवीस यांनी केले आहेत. तथापि, ते सिद्ध झालेले नसल्याने राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटातर्फे तुम्हास तिकिट देण्यात आलेले आहे व दस्तूरखुद्द दादाही तुमच्या प्रचारासाठी हिरीरीने उतरवणार ओत, ही बातमी तुमच्यासाठी दिलासादायक आणि भाजपासाठी व्यर्थ खुलासादायक झाली आहे. आपल्या प्रचाराच्या रॅलीत मोदींचे छायाचित्र न लावण्याचा आपला निर्णय योग्यच आहे. तथापि, त्याऐवजी समीर वानखेडे यांचे छायाचित्र लावण्याचा कोणी सल्ला दिला तर तोही मानू नये. आपल्या गुडघ्यास लवकर आराम मिळो.

श्री. पराग शहा, आपण घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवत आहात. मागच्या सोमवारीच आपल्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. मंगळवारपासून धडाक्यात प्रचाराचे नियोजन सुरू असतानाच सकाळी घरात पडल्याने आपल्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर आपणास तातडीने रुग्णालयात नेल्यावर आपल्या गुडघ्याखालील स्नायूबंध दुखावल्याचे स्पष्ट झाले. तथापि डॉक्टरांनी एक महिना सक्तीचा आराम करण्याचा दिलेला सल्ला बाजूला ठेवून आपण दोन आठवड्यांनंतर ऑपरेशन करून घेण्याचा घेतलेला निर्णय चिंताजनक आहे. ‘गुडघा सलामत तो इलेक्शन पचास’ असे आपणास वाटत नाही काय ? परागजी, एकवेळ स्नेहबंध दुखावले तरी राजकारणात चालून जाते; पण स्नायूबंध दुखावणे ही किरकोळीत घेण्याजोगी गोष्ट नव्हे. आता राजकारणातलेच उदाहरण द्यायचे झाले तर सध्या राज ठाकरे यांच्याशी भाजपाचे स्नेहबंध दुखावलेले असले तरी लवकरच ते कुठल्याही ऑपरेशनशिवाय, केवळ इंडीचा छोटासा अनस्थेशियाचा डोस दिला तरी सुधारू शकतात. उद्धव ठाकरे यांच्याशी मात्र भाजपाचे जे स्नायूबंध दुखावले आहेत, ते दुरुस्त होण्यासाठी बराच कालावधी जावा लागेल असे वाटते. दुखापत झालेले तीनही उमेदवार लवकरात लवकर दुरुस्त होवोत, अशी इच्छा बाळगणारा…

आपला, विनम्र बालक

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ