अव्वल फलंदाज

आयपीएल २०२५ हंगामासाठी सौदी अरेबियामध्ये क्रिकेटपटूंवर बोली लागली. यात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले. लिलावाच्या पहिल्या दिवशी श्रेयसवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागली. त्याला पंजाब संघाने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. परंतु, काही क्षणात रिषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला. त्याला लखनौने २७ कोटी रूपयांना खरेदी केले. अनपेक्षितरित्या श्रेयसवर मोठी बोली लागल्यामुळे तो चर्चेत आला.

श्रेयस हा अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. त्याने गेल्या हंगामात आपल्या नेतृत्वाखाली ‘कोलकाता’ला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. परंतु, ‘कोलकाता’ने  लिलावासाठी त्याला रिटेन करण्याऐवजी करारातून मुक्त केले. यामुळे तो या लिलावात २ कोटी या मूळ किमतीसह उतरला होता. त्याच्यावर ‘पंजाब’ने आयपीएलच्या इतिहासातील २६.७५ कोटी अशी सर्वाधिक बोली लावली होती. परंतु काही मिनिटांतच रिषभ पंतने आपल्या नावावर विक्रम केला. तथापि, चर्चा राहिली ती श्रेयसचीच.

श्रेयसचा मूळचा मुंबईतला. ६ डिसेंबर १९९४ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील व्यावसायिक तर आई गृहिणी आहे. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी श्रेयसने शिवाजी पार्कच्या जिमखाना अकादमीतून क्रिकेट खेळायला सुरूवात केली. प्रविण अमरेंनी १२ व्या वर्षी त्याला प्रशिक्षण दिले. यानंतर मोठ्या गटातील क्रिकेटमध्ये पी. शिवलकर आणि विनोद राघवन यांचे प्रशिक्षण लाभले.

२०१४ साली श्रेयसने युनायटेड किंगडमच्या दौऱ्यावर ट्रेंट ब्रिज क्रिकेट संघाकडून ३ सामने खेळले होते. यावेळी त्याने ९९ च्या सरासरीने २९७ धावा केल्या होत्या. यात त्याने सर्वाधिक १७१ धावा केल्या होत्या. २०१४-१५ साली श्रेयसने मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या हंगामातच त्याने ८०९  धावा केल्या होत्या. यासह तो हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.

२०१५ सालच्या आयपीएलमध्ये लिलावात श्रेयसला दिल्ली डेअर डेविल्सने २.६ कोटींना विकत घेतले. यामुळे तो भारतीय संघाकडून न खेळताही आयपीएलमध्ये महाग किमतीत विकला जाणारा क्रिकेटपटू ठरला. पदार्पणाच्या आयपीएल हंगामात अय्यरने ३३.७६ च्या सरासरीने ४३९ धावा केल्या होत्या.

२०१६ साली मुंबईकडून खेळताना श्रेयसने प्रथम श्रेणीत १,३२१ धावा केल्या होत्या. त्याने ४ शतके आणि ७ अर्धशतके झळकवली. या कामगिरीमुळे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तर रणजी ट्रॉफी हंगामात १३०० पेक्षा जास्त धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर त्याला २०१७ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यानंतर २०१७ साली न्यूझीलंडविरूद्धच्या टी-२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पदार्पण केले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. परंतु, दुसऱ्या सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी केली.

डिसेंबर २०१७ साली त्याने भारतीय संघाकडून वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने ८८ धावांची झंझावती खेळी केली होती. यानंतर तो काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. परंतु, २०१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करत तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला. आता तो आयपीएल २०२५ चा हंगाम गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Related posts

ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर

विहिरीत पडलेला माणूस

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम