Shivspandan culture : देशभरातल्या लोकवाद्यांनी रसिक झाले मंत्रमुग्ध

oplus_1048578

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्या वाद्यांचा आवाज आणि संगीत केवळ ध्वनीफिती अथवा चित्रपटांमधूनच कानी पडतात, अशा वाद्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि ऐकण्याची संधी रसिक शिवस्पंदन महोत्सवात लाभली. वाद्य महोत्सवामुळे विद्यापीठ परिसर विविध लोकवाद्यांच्या सूरतालांनी मंत्रमुग्ध झाला. शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने शिवस्पंदन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या लोकवाद्य वादन कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली आणि त्याचा आनंद लुटला. (Shivspandan culture)

विद्यापीठातील अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील परिसरात सकाळी साडेसात वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी हलगी वाजवून या उपक्रमाचे सांगीतिक उद्घाटन केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोरील परिसर, संगीत व नाट्यशास्त्र विभागाशेजारील तलाव आणि क्रांतीवन या ठिकाणीही विविध वाद्यांचे वादन करण्यात आले. सर्व लोकवाद्यांचे सायंकाळी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात प्रदर्शनही मांडण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक वाद्यांची माहिती देण्यात आली. (Shivspandan culture)

ढोलकी, ढोल, दिमडी, चौंडके, हलगी, संबळ, घुमके, थविल, चेंडा, इडक्का, कोट्टू, मुरासू, थमारू, पंबई ईसाई, उरुमी, उडुक्काई, मोडा, पराई, पंजाबी ढोल, चिमटा, टोका, कैची, दद्द, बुगचू, तुंबी, ढोलक, भपंग, खोळ, मोंडल, एकतारी, खमख, बिहू ढोल, तिबेटियन गाँग, बडुंगदुप्पा, पेपा, गोंगना ही देशाच्या विविध प्रांतात वाजविली जाणारी वाद्ये वाजविण्यात आली. ऋषीकेश देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन शिंदे, कौस्तुभ शिंदे, अभय हावळ, अनिकेत देशपांडे, प्रेम भोसले, ओम शिंदे, सुमंत कुलकर्णी, मयुरेश शिखरे, तेजस गोविलकर, सौरभ आदमाने यांनी या विविध वाद्यांचे सादरीकरण केले. संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. (Shivspandan  culture)

तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात प्राणीशास्त्र अधिविभाग सभागृहात शिवस्पंदन महोत्सवातील मूकनाट्य, नकला आणि लघुनाटिका स्पर्धा पार पडल्या. त्यानंतर दुपारच्या सत्रात शिक्षक, प्रशासकीय सेवक यांचाही सांस्कृतिक कार्यक्रम राजर्षी शाहू सभागृहात रंगला. शिवाजी विद्यापीठाने देशाच्या विविध प्रांतात, राज्यांत वाजविल्या जाणाऱ्या लोकवाद्यांचा महोत्सव आयोजित करून त्यांचे वादन आणि प्रदर्शन या माध्यमातून भारतीय संगीत परंपरेचा आपल्या विद्यार्थी व नागरिकांना परिचय व संवर्धन करण्यासाठी गतवर्षीपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. लोकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे, ही बाब उत्साहवर्धक असल्याचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले, समन्वयक डॉ. नितीन कांबळे, डॉ. मीना पोतदार, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. के.डी. कुचे, डॉ. एस.टी. कोंबडे आदींसह संगीतरसित मोठ्य़ा संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

‘संविधान एक है; सब के लिए सेफ है’

विजय सेतुपतीकडून सिनेकामगारांसाठी सव्वा कोटी

Related posts

Mahavir : लोकवर्गणीतून महावीर अध्यासनासाठी एक कोटी ११ लाखांचा निधी जमा

Sports award : ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे

Sapkal attacks on BJP: हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा भाजपचा अजेंडा