कोल्हापूर : प्रतिनिधी : शिक्षक, साहित्यिक, पत्रकार, कथाकथनकार असलेले शंकर खंडू पाटील हे अफाट ताकदीचे लेखक होते. ग्रामीण बाज असलेले अस्सल लिखान पण मानवी जीवन आणि माणुसकीचे दर्शन त्यांच्या लिखानातून पदोपदी जाणवते. निर्मळ मनाच्या पण वाचकांना आणि श्रोत्यांना खळखळून हसवणाऱ्या शंकर पाटील या लेखकाची खूप उपेक्षा झाली, अशी खंत डॉ. रफीक सुरज यांनी व्यक्त केली. शंकर खंडू पाटील यांच्या जन्मशताब्दी ‘शंकरपट’ कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य शासन सांस्कृतिक कार्यविभाग आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (Shankar Khandu Patil was a writer of immense power)
लेखनात गावगाडा उभारण्यात शंकर पाटील माहीर
रसिकेतेने जगलेले शंकर खंडू पाटील हे उपेक्षित लेखक होते. त्यांनी खूप लिखान करुन त्यांना एकही पुरस्कार मिळाला नाही, अशी खंत डॉ. सूरज यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, त्यांचे कथाकथन श्रोत्यांचे जखडून ठेवत, हसायला लावत आणि काही प्रसंग तर मनाला चूटचूटीची जाणीव करुन देत. घटना, प्रसंग खुलवून सांगण्याची त्यांची चांगली हातोटी होती. त्यांनी मोठे लिखान केले. लेखनात गावगाडा उभारण्यात ते माहीर होते. ३०० हून अधिक कथा लिहिल्या. तरी त्यांचे निवडक कथा संग्रह आणि व्यक्तीचित्र प्रसिद्ध झाले. त्यांनी कांदबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कथावर चित्रपटही निघाले. कौल दे खंडेराया हा चित्रपट गाजला होता. त्यांच्या लेखनाची खूप उपेक्षा झाली. पण राज्य सरकारचा सांस्कृतिक विभाग आणि दमसाने त्यांच्या साहित्यीक कलाकृतींना जन्मशताब्दी वर्षात न्याय दिला.
ग्रामिण साहित्य चळवळीला चालना दिली
चांगल्या पगाराची शिक्षकांची नोकरी करुन आयुष्याच्या अखेरपर्यंत लेखनांवर त्यांनी प्रपंच केला आणि तडीस नेला असे सांगून डॉ. रफीक सूरज म्हणाले, पत्रकारितेत त्यांनी अनेक विषय हाताळाले. दैनिक पुढारीच्या पुरवणीत त्यांनी नवीन लेखकांना संधी दिली. त्यांना लिहिण्यास प्रवृत्त केले. ग्रामिण साहित्य चळवळीला चालना दिली. स्त्रीकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोण वेगळा होता. ग्रामिण भागातील स्त्री प्रचंड हालअपेष्टात जगत असली तरी स्वाभिमानी, कष्टाळू, धाडसी, प्रसंगी संकटावर मात करुन सहीसलामतपणे सुटका करुन घेणारी असल्याचे चित्रण त्यांच्या लिखानातून दिसून येते. ‘घुंगरु’ कांदबरीत तमासगिरी स्त्रीकडे बघण्याचा उदात्त हेतू दिसून येतो. तमासगिरी करणाऱ्या महिलेची कलेची तडफ, निष्ठा त्यांनी कादबंरीत मांडली. (Shankar Khandu Patil was a writer of immense power)
शंकर पाटील यांचे लेखन अक्षय साहित्य
अध्यक्षीय भाषणात साहित्यिक नामदेव माळी म्हणाले, शंकर पाटील हे निर्मळ मनाचे होते. त्यामुळे ते चांगले लेखकही बनले. कथाकथनात किस्से सांगून म्हणजे त्यांच्या भाषेत कुंडका सांगून श्रोत्यांना खिळवून ठेवायचे. कथा, कथाकथन, नाटक, चित्रपट कथा लेखन, वग नाट्या असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. शंकर पाटील यांचे लेखन हे अक्षय साहित्य होतं. आजही त्यांचे नाव ऐकलं जातं. त्यांच्या लिखानाला दाद दिली जाते हे त्यांच्या लिखानाची खरी ताकद होती.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या थिंक टँकमधील महत्वाचे व्यक्ती
शामराव अण्णा पाटील यांनी लोकनेते राजारामबापू पाटील आणि शंकर पाटील यांच्या संबधांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, राजारामबापू पाटील यांच्या थिंक टँकमधील शंकर खंडू पाटील हे महत्वाची व्यक्ती होती. राजारामबापू पाटील यांनी केलेल्या विविध लोकोपयोगी कामांच्या पुस्तिका शंकर पाटील यांनी लिहिल्या. शिक्षकांची नोकरी सोडून पत्रकारिता करणाऱ्या शंकर पाटील यांनी कोल्हापुरात नवसंदेशमध्ये प्रदीर्घ काळ काम केले. बहुजन समाजातील लेखक, कवी यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शंकर पाटील आणि चंद्रकांत नलगे यांनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापन केली. मोठ्या राजकारणी, साहित्यिकांमध्ये त्यांची उठबस होती. त्यांनी अनेक विवाह जमवल्याने त्यांना लोकसंग्रह मोठा होता. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. रफीक सुरज यांनी शंकर पाटील यांच्या निवडक लिखानांचा चांगला ग्रंथ निर्माण केल्याबद्दल आभार मानले.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या स्थापनेत पुढाकार
शंकर खंडू पाटील व्यक्ती आणि कर्तुत्व या परिसंवाद यांच्या कन्या प्रतिभा शिवाजीराव जाधव, डॉ. विजय चोरमारे, डॉ. रफीफ सुरज यांनी शंकर खंडू पाटील यांची स्वभाववैशिष्टे आणि लिखानावर चर्चा केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी होत असल्याने आमच्या कुटुंबाच्यादृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन प्रतिभा जाधव यांनी केले. लेखनात सतत कार्यरत राहणाऱ्या शंकर खंडू पाटील यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी गीतकार जगदीश खेबुडकर यांनी माघार घेतली होती ही आठवणही त्यांनी सांगितली. दमसाच्या स्थापनेत पुढाकार घेतलेल्या शंकर पाटीलयांनी दमसाचे पहिले साहित्य संमेलन संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात घेतले होते असे त्या म्हणाल्या.
पश्चिम महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका
डॉ. विजय चोरमारे यांनी शंकर खंडू पाटील यांचे कुंडके सांगून त्यांची आठवण जागी केली. ते मानधनासाठी कधीही अडून बसायचे नाहीत. दैनिक पुढाकारीच्या पुरवणीतून ग्रामीण भागातील नवीन लेखकांना संधी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लेखकांची जडणघडण त्यांची महत्वाची भूमिकाहोती. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष चित्रतपस्वी व्ही.शांताराम असताना शंकर खंडू पाटील सरचिटणीस होते यावरुन त्यांनी महंत्ती लक्षात येते असे ते म्हणाले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची सुत्रे पुढच्या पिढीने हातात घ्यावीत याचे पहिल्यांदा सुतोवाच शंकर पाटील यांनी केले. त्यांच्या कार्याचा उचित गौरव आणि नवीन पिढीला त्यांच्या लेखनाचा पुन्हा उजाळा मिळावा यासाठी शासनाच्या सहकार्याने दमसा कार्यक्रम घेऊ शकली याचा आनंद आहे असे चोरमारे म्हणाले.
आनंद काळे, हिंमत पाटील यांच्या कथाकथनाला उत्फुर्त दाद
अभिनेते आनंद काळे यांनी शंकर खंडू पाटील यांच्या ‘पाखरे घराकडे निघाली’ या कथेचे अभिवाचन केले तर हिंमत पाटील यांनी ‘बोनस’ या कथेचे कथाकथक केले. या दोन्ही कथाकथनांनी रसिकांनी खिळवून ठेवले. त्यांच्या कथाकथनाला उत्फुर्त दाद मिळाली. दमसाचे अध्यक्ष डॉ. विनोद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. शंकर खंडू पाटील यांचे नातु डॉ. नचिकेत पाटील यांनी कुटुंबियांच्यावतीने मनोगत व्यक्त केले. आभार प्रा. दि.बा.पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. रणधीर शिंदे, शंकर खंडू पाटील यांचे चिरंजीव प्रदीप पाटील, प्रमोद पाटील, कन्या प्रतिभा जाधव, कल्पना काकडे यांच्यासह शंकर पाटील यांचे मित्र, स्नेही, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Shankar Khandu Patil was a writer of immense power)