Home » Blog » Malegaon Factory: दोन म्हाताऱ्यांशी अजितदादांचा तिसरा सामना

Malegaon Factory: दोन म्हाताऱ्यांशी अजितदादांचा तिसरा सामना

by प्रतिनिधी
0 comments
Malegaon Factory

बारामतीच्या माळेगाव बुद्रुक येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय. त्याचं कारण इथं शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमध्ये तिसरा सामना होत आहे. दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत नेमकं काय होणार, याची मोठी उत्कंठा आहे. (Malegaon Factory)

-डॉ. विजय चोरमारे

बारामतीकरांनी याआधी लोकसभा आणि विधानसभा असे दोन सामने अनुभवले. पहिला सामना शरद पवारांनी जिंकला. विधानसभेच्या सामन्यात बारामतीकरांनी अजितदादांना साथ दिली. लोकसभेला २१ लाख मतदार होते, विधानसभेला ३ लाख ७५ लाख मतदार होते. माळेगाव कारखान्यासाठी जेमतेम १९ हजार ६०० मतदार मतदान करणार आहेत. मर्यादित मतदारसंख्येच्या या निवडणुकीसाठीही राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. २२ जूनला मतदान होणार आहे. (Malegaon Factory)

माळेगाव कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजित पवार यांनी सुरुवातीला प्रयत्न केले होते. परंतु चंद्रराव तावरे यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. खरेतर याआधी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. पवारांचे पारंपरिक विरोधक असलेल्या पृथ्वीराज जाचक यांच्याशी अजितदादांनी हातमिळवणी केली होती. त्याच पद्धतीने माळेगावमध्येही होईल, अशी चर्चा होती, परंतु तावरे यांनी अजितदादांना दाद दिली नाही. अजितदादांच्या बाजूने देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनही ८५ वर्षांचे तावरे मागे हटले नाहीत. १९९२साली आपल्या अध्यक्षपदाची संधी डावलल्याचा राग तावरे विसरायला तयार नाहीत. (Malegaon Factory)

अजितदादांच्या पॅनलमध्ये शरद पवार गटाचे काही उमेदवार घेण्याची चर्चा होती, परंतु त्यापैकी कुणाला घेतले नाही. त्यामुळे शरद पवार समर्थकांनी पॅनल उभे केले. स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी या पॅनलच्या प्रचारासाठी रान उठवले.

अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नीळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा सहकार बचाव पॅनेल, कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजप नेते चंद्रकांत तावरे आणि रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल अशी चौरंगी लढत होतेय. २१ संचालक पदांसाठी ९० उमेदवार रिंगणात आहेत. पवार काका-पुतण्यांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्कंठा आहे, की पवारांचे वर्चस्व झुगारून मतदार तावरेंच्या पॅनलला बळ देणार, हे पाहावे लागणार आहे.

वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी ब वर्ग गटातून अर्ज दाखल केला आहे. शरद पवार यांच्या पॅनेलने या गटातून उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे तावरेंच्या पॅनलच्या उमेदवाराशी त्यांची लढत आहे. वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या निवडणुकीत कारखान्याच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजित पवार यांनी स्वत:चे नाव जाहीर केले आहे. अन्य कुणाचे नाव जाहीर केले तर त्यातून गटबाजी वाढून पॅनलला फटका बसू शकतो, म्हणून त्यांनी स्वतःचे नाव पुढे केले आहे. अर्थात अजितदादांच्या उमेदवारीवरून शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सहकारातील निवडणुकीत नेत्यांनी कार्यकर्त्यांना संधी द्यायची असते, असे पवारांनी म्हटले आहे.

माळेगावच्या निवडणुकीत २०१५ मध्ये दोन्ही पवार एकत्र असताना चंद्रराव तावरेंनी त्यांचा पराभव केला होता, तेव्हापासून माळेगावची राज्यात चर्चा आहे. २०२० च्या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखालचे पॅनेल विजयी झाले. त्यावेळी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे हे विरोधक निवडून आले. परंतु पाच वर्षांत चंद्रराव तावरे कारखान्यात फिरकले नव्हते. (Malegaon Factory)

एकूणच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीकडे आता केवळ बारामतीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतरही बारामतीवर वर्चस्व कोणाचे, याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला नीटपणे मिळू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी युगेंद्र पवारांचा पराभव केला. दोन रंगतदार सामन्यांनंतर तिसरा सामना माळेगाव कारखान्याच्या निमित्ताने होत आहे. या निवडणुकीसाठी अजित पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून त्यांनी बारामतीमध्ये ठाण मांडले आहे.

गेल्या पाच वर्षांत कारखान्याने केलेली उत्तम कामगिरी, ऊसाला दिलेला चांगला दर,  एआय तंत्रज्ञानाचा वापर या तीन मुद्दांवर अजित पवारांच्या नीळकंठेश्वर पॅनेलले जोर दिला आहे.  “आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलंय, कारखाना नफ्यात आहे. शेतकरी आमच्याच पाठीशी आहे,” असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केलाय. स्थानिक सहकार क्षेत्रावर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी अजित पवारांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यांनी सात विद्यमान संचालक आणि पाच माजी संचालकांना निवडणूक रिंगणात उतरवलंय.

शरद पवारांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा सहकार बचाव’ पॅनलने मतदारांना भावनिक साद घातली आहे. ‘शेतकरी हिताला’ आम्ही प्राधान्य देणार असल्याचे बळीराजा पॅनेलने म्हटले आहे. “सहकार हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे, तो जपण्यासाठी आमचा लढा आहे,” असा या पॅनलच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर होणारी ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती राहिलेली नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष आता गावपातळीपर्यंत पोहोचला आहे. मोठ्या निवडणुका जिंकायच्या तर स्थानिक संस्थांवर वर्चस्व असावं लागतं, याची जाणीव लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांना झाली. त्यामुळं त्यांनी स्थानिक शेतकरी आणि सहकारी नेत्यांना एकत्र आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केलाय. शरद पवारांच्या पॅनेलचे नेतृत्व युगेंद्र पवार यांच्याकडे असून शरद पवारांनी पडद्यामागे राहात रणनिती आखण्याचे काम केले आहे. (Malegaon Factory)

लोकसभा निवडणुकीच्यावेळी जसा प्रचार तापला होता, तसाच यावेळी पुन्हा तापला आहे. अजित पवार यांनी लोकसभेप्रमाणेच पुन्हा वयाचा मुद्दा काढला आहे. लोकसभेवेळी ते शरद पवार यांच्या वयाबद्दल बोलत होते. आता ते कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या वयाबद्दल बोलत आहेत. मी चांगलं काम करू शकेल की ८५वर्षाचा माणूस चांगलं काम करू शकेल, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांना टोला लागवला आहे. त्याला उत्तर देताना तावरे यांनी, आपण शंभर वर्षे जगणार आहोत आणि तोवर निवडणुका लढवणार असल्याचे म्हटले आहे.

अजित पवारांचे जवळपास बारा कारखाने आहेत, ते त्यातून एक कोटी मेट्रिक टन ऊसाचं गाळप करतात. माळेगांव कारखान्याने चांगला दर दिला तर त्यांच्या खाजगी कारखान्यांना देखील द्यावा लागेल. हे टाळण्यासाठी अजित पवारांना माळेगांव कारखान्याचा चेअरमन व्हायचं आहे, असा आरोपही चंद्रराव तावरे यांनी केला आहे.

निवडणूक म्हटलं की नाट्यमय घटना असतातच. बारामतीमधील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक १८ जून रोजी रात्री ११ वाजल्यानंतर सुरू असल्याचा असा आरोप करण्यात आला आहे. बँकेत काही खाजगी लोकही होते. बँकेतील कम्प्युटर यंत्रणा चालू होती. या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्याही होत्या असा दावा सहकार बचाव शेतकरी पॅनलकडून करण्यात आला.

रात्रीच्या वेळी बँकेमध्ये खाजगी व्यक्ती कशासाठी पाठवण्यात आल्या होत्या? त्या ठिकाणी कारखान्याच्या मतदार याद्या का ठेवण्यात आल्या? होत्या असा सवाल रंजनकुमार तावरे यांनी विचारला आहे. यापुढील काळात माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत बारामतीत ठोशास ठोस उत्तर दिलं जाईल. कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही असा इशारा रंजनकुमार तावरे यांनी दिला आहे. पीडीसीसी बँक रात्री उशिरा उघडी असल्यासंदर्भात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही आक्षेप घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी तर त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी

वेल्हा बँक अशीच रात्री बारा पर्यंत उघडी होती. आता ही दुसरी वेळ आहे. बँक कशाला उघडेल? त्याचे नेतृत्व करणाऱ्यांनी सूचना केल्याशिवाय कर्मचारी कशाला उघडतील. एवढी रात्री सेवा द्यावी अशी स्थिती बारामतीत नाही, त्यामुळे काय समजायचे ते समजा…” असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. एकूणच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचे वातावरण कमालीचे तापले आहे. अजितदादांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार प्रचारात उतरले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा निरोप डावलून लढणारे चंद्रराव तावरेही मागे हटायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत माळेगावचे वीस हजार सभासद काय कौल देतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00