मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३०० मिलीमीटरच्यावर पाऊस पडला आहे. त्यामुळे मुंबईकरांची कोंडी झाली आहे. मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वेसेवा खोळंबली आहे. अनेक लोकल रूळावरच थांबल्या आहेत. तेथे बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने चहा-बिस्कीट पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात येत आहे. (Mumbai, Kokan Rain)
दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी देखील (१९ ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्वत्र सतर्कता बाळगण्यात येत आहे.
मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. चुनाभट्टी स्टेशनवर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. (Mumbai, Kokan Rain)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या चोवीस तासांत मुंबईसह परिसरात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पुराच्या पाण्याचा धोका असलेल्या ठिकाणच्या तीनशेवर जणांचे स्थलांतर करावे लागले. आता मिठी नदीची पातळी काही अंशी ओसरली आहे. तथापि, पुढील पावसाची शक्यता लक्षात घेता सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. (Mumbai, Kokan Rain)
“मुंबई आणि उपनगरांतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. एकंदरीत कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा तासांमध्ये २०० मिमि आणि २४ तासांत ३०० मिमी पाऊस झाला. त्यामुळे मिठी नदीलाही पूर आला. महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. ५२५ पंप सुरु करण्यात आले आहेत. १० मिनी पंपिंग स्टेशन आहेत. होल्डिंग पाँडही ओव्हरफ्लो झाले आहेत. जीवितहानी होऊ नये, नुकसान होऊ नये म्हणून सगळेच फिल्डवर काम करत आहेत. सहा पंपिंग स्टेशनही काम करत आहेत,” असे शिंदे यांनी सांगितले.
महापालिकेच्यावतीने प्रवाशांसाठी चहा-बिस्कीटे
अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली. परिणामी विविध रेल्वे स्थानकांवर प्रवासी अडकून पडले आहेत. या प्रवाशांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाणी, चहा, बिस्कीट व इतर खाद्यपदार्थ पुरवण्यात येत आहेत.