जमीर काझी : मुंबई : या देशाने सगळ्यांचा माज उतरवला आहे . मोदी-शाह काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. त्यांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढले पाहिजे, जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरें यांनी शनिवारी दिला आहे. (Raj Thackeray launches a scathing attack on Modi and Shah)
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीकडून सुरू असलेले आक्रमक आंदोलन आणि शनिवारी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलनाला दडपण्यासाठी सरकार व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या जुलमी कारवाईबद्दल देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनीही आपल्या खास शैलीत सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट करीत मोदी, शाह आणि भाजपावर कडाडून हल्ला चढविला आहे.
दिल्ली पोलिसांनी आंदोलन हाणून पाडण्यासाठी परिसरातील इंटरनेट सेवा मेट्रो, विमान आणि ट्रेन सेवा बंद केल्या . सिजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना विमानात शिरून अटक केली तर आशुतोष रांका, सौरव दास, ध्रुव राठी अभिनेते प्रकाश राज यांना अटक केली. त्यामुळे संतापलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खडे बोल सुनावत इशारा दिला आहे. (Raj Thackeray launches a scathing attack on Modi and Shah)
डॉ. आंबेडकरांच्या विधानाचा दाखला
राज ठाकरे यांनी पोस्टची सुरवात “No nation can be grateful at the cost of its liberty” या , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना केलेल्या विधानाने करून त्यात म्हटले आहे की,एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.
मोदी शाहांच्या डोक्यात हुकुमशाही बसली आहे
हे वाक्य आज पुन्हा म्हणावे लागत आहे .कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . त्यांनी देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली.आणि फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे.
महिला पत्रकारांचा छळ
या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत आहे.
देशातील तरुण तरुणी अस्वस्थ
आज दिल्लीत मेट्रो सेवा बंद केलीत, रस्ते अडवलेत, इंटरनेट सेवा बंद केली आहे, बस सेवा थांबवली आहे, आंदोलकांना विमानातून उचलून नेलं जात आहे. ही कोणती पद्धत ? देशातील २०,३० वर्षांचे तरुण तरुणी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ती शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी जाऊन आमच्या देशात लोकशाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत ? ही असली लोकशाही? (Raj Thackeray launches a scathing attack on Modi and Shah)
ज्ञानेशकुमारांबद्दल इतकं प्रेम का?
मला समजत नाही या ज्ञानेश कुमारबद्दल इतकं प्रेम का ? ज्ञानेश कुमार आणि त्या आधीचे निवडणूक अधिकारी हे तुमचे सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून ? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्या प्रमुखाने काही गोंधळ घातला असेल तर त्याचा राजीनामा व्हायलाच हवा. तसंच संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही प्रामाणिक आणि पारदर्शक असायला हवी या मागणीत गैर ते काय ? माझ्या मताचा अधिकार काढून घेतला जातोय, किंवा माझं मत कुठे आणि कोणाला जातंय हे मला समजत नाहीये. आणि त्यातून माझ्या मताचा अपमान होतोय हा राग व्यक्त करण्याचा अधिकार पण नसावा ? का वरच्या दोघांना भीती आहे की ज्ञानेश कुमारला राजीनामा द्यायला लागला आणि त्याने माझे मतचोरीचे करवते धनी कोण हे जर सांगितलं तर आत्तापर्यंतचं सत्तेचं सगळंच बिंग फुटेल म्हणून!
सत्तेचा अमरपट्टा जन्माला घेऊन आला नाही आहात
भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) आणि (ब) यानुसार नागरिकांना शांततेत निदर्शनं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार तुम्हाला का चिरडायचा आहे ? काल तर चक्क माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विचारलं, माशी मारायला हातोडा कशाला वापरताय ?. बरं आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं असं सहसा महाराष्ट्रात पोलीस डिपार्टमेंट करतं. आणि हे करताना नागरिकांच्या संविधानिक अधिकारांना धक्का बसणार नाही हे पाहतात. पण इथे दिल्लीत तर महिला पत्रकार ज्या हे आंदोलन कव्हर करत होत्या, त्यांच्या तक्रारी आहेत की पोलिसांनी स्थानबद्ध केल्यावर त्यांचा छळ केला म्हणून. जर आंदोलन कव्हर करणाऱ्यांचा छळ होत असेल तर आंदोलकांना नीट वागवतील याची काय खात्री ? आज आपण सत्तेत आहोत म्हणजे अनंत काळापर्यंत असू ही अपेक्षा बाळगू नका. तुम्ही काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही आहात. जेव्हा सत्तेतून एखादा हुकूमशाही मानसिकतेचा सत्ताधारी जातो त्यानंतर त्याची जनताच कशी पळताभुई करतात याची जगभरातील उदाहरणं आठवा. जगभरातील सोडा भारताचा इतिहास वाचलात तरी कळेल जिथे मुघलांपासून, पोर्तुगीजांपासून ते आमच्या साम्रज्यावरचा सूर्य मावळत नाही असा माज करणाऱ्या ब्रिटिशांचा जिथे या देशाने माज उतरवला, तिथे स्वकीयांचा माज इथली जनता उतरवणार नाही, असं वाटतंय का तुम्हा सत्ताधाऱ्यांना ? सरकार म्हणून तुमच्याकडून मॅच्युरिटीची अपेक्षा आहे, ती नसेलच तर शिकून घ्या, आत्मसात करा. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आणि तो अबाधितच राहिला पाहिजे , असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे. (Raj Thackeray launches a scathing attack on Modi and Shah)