कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून विरोधकांकडून सत्ताधारी महायुतीवर निवडणुकीतील चिन्ह वाटपातील महायुतीकडून सत्तेच्या दबावाच्या राजकारणांवर टीका केली आहे. काल उमेदवारी अर्ज माघारीनंतर गोकुळची निवडणूक थेट दोन पॅनेलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज शुक्रवारी चिन्ह वाटप झाले. समविचारी पॅनेलने नियम आणि कायद्यानुसार ‘कपबशी’ चिन्हाची सर्वप्रथम मागणी करुन थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करुन ‘कपबशी’ चिन्ह मिळू दिले नसल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. (CM intervenes in the allocation of election symbols for Gokul)
समविचारी आघाडीची कपबशी चिन्हासाठी सर्वप्रथम मागणी
गोकुळच्या निवडणकीत ‘कपबशी’ हे चिन्ह मिळावे अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सर्व प्रथम राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीने केली होती. मात्र या चिन्ह वाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व:ता हस्तक्षेप करत दबावाचे राजकारण केल्याने समविचारी आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळू दिले नसल्याचा आरोप काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केला. महायुतीने आम्हाला कपबशी हे चिन्ह मिळू दिले नसले तरी दूध उत्पादकांच्या मनात समविचारी आघाडीचाच ठसा आहे. त्यामुळे दूध उत्पादक समविचारी आघाडीच्या पाठीशीच उभे राहतील असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
गोकुळच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीला ‘शिटृी’ हे चिन्ह मिळाले आहे. मात्र समविचारी आघाडीने प्रथम मागणी करुनही ‘कपबशी’ चिन्ह न दिल्याने आमदार पाटील यांनी महायुतीवर निशाना साधला. (CM intervenes in the allocation of election symbols for Gokul)
चिन्ह वाटपात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
पत्रकात असे म्हटले आहे की, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या २ मार्च २०२६च्या परिपत्रकानुसार एकाहून अधिक उमेदवारांनी एकाच निशाणीची मागणी केली असल्यास प्रथम आलेल्यांना प्रथम प्राधान्य देवून निशाणीचे वाटप करावे असे नमूद करण्यात आले आहे. नियम २८ (३) (क) मध्ये निवडून द्यावयाच्या एकूण जागाच्या ३० टक्केपेक्षा अधिक उमेदवारांनी गट तयार करुन संबंधित उमेदवारांनी सह्या केलेल्या लेखी सामूहिक अर्जाव्दारे एकाच निशाणीची मागणी केल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अशा गटास सामूहिक निशाणी देण्याची तरतूद आहे. शिवाय अशा गटाला चिन्ह वाटप करताना प्रथम आलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्याचे या परिपत्रकात नमूद केले आहे.
छाननीनंतर समविचारी आघाडीची चिन्हासाठी मागणी
राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीने छाननी नंतर पात्र उमेदवारांची पात्र यादी प्रसिध्द झाल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०५ मिनीटांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कपबशी हे चिन्ह मिळावे अशी मागणी पत्र देवून केली होती. शिवाय तसा ई-मेल ही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला पाठविला होता. चिन्ह मागणीचा पहिला अर्ज समविचारी आघाडीने केला होता. उर्वरीत आघाडीच्या पॅनेलमधील उमेदवारांव्यतिरिक्त पॅनेलमध्ये समाविष्ट होणाऱ्या उर्वरीत १५ उमेदवारांची नांवे नंतर कळवून त्या १५ उमेदवारांनाही कपबशी हे चिन्ह मिळावे अशी विनंती पत्रामध्ये केली होती.
माघारीनंतरही सर्वप्रथम समविचार आघाडीची चिन्हासाठी मागणी
८ ऑक्टोबर रोजी राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीने दुपारी ३.२८ मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उर्वरीत १५ उमेदवारांच्या नावांची यादी देत कपबशी हे चिन्ह मिळावे अशी मागणी केली होती. उमेदवारी अर्ज माघारीनंतर आज शुक्रवारी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणे व चिन्ह वाटप होणार होते त्याअनुषंगाने आमच्या समविचारी पॅनेलने रात्री १२.०३ मिनिटांनी २५ उमेदवारांची ‘कपबशी’ चिन्ह मागणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत मेल आयडी वर मेल पाठवला होता. तसेच आज शुक्रवारी त्याच पत्राची छापील प्रत सकाळी १०.५५ मिनिटांनी सादर केली होती. कायद्यानुसार समविचारी आघाडीचाच असा एकमेव अर्ज होता, असा दावा निवेदनात केला होता. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या नियमानुसार राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र चिन्ह वाटपात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर महायुतीच्या सत्तेच्या दबावाने ‘कपबशी’ हे चिन्ह बळकावल्याचा आरोप आमदार पाटील यांनी या पत्रकाव्दारे केला आहे. (CM intervenes in the allocation of election symbols for Gokul)