कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात यजमान पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने बलाढ्य खंडोबा तालीम मंडळाचा ४-२ असा पराभव करत सतेज चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली. विजेत्या पाटाकडील संघास रोख दोन लाख रुपये आणि चषक तर उपविजेत्या खंडोबा संघास रोख एक लाख रुपये आणि चषक बक्षिस देण्यात आले. पाटाकडीलच्या अरबाझ पेंढारीची मालिकावीर म्हणून निवड झाली. त्याला बुलेट मोटार सायकल बक्षिस देण्यात आली. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवण्यात आली. (PTM win)
पाटाकडील आणि खंडोबा यांच्यातील सामना चुरशीचा होणार म्हणून दोन्ही संघांच्या समर्थक आणि फुटबॉल शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. सामन्याच्या सुरवातीपासून दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला. आघाडीसाठी गोलक्षेत्रात चढाया केल्या. पाटाकडीलचा ऋषिकेश मेथे, निवृत्ती पौनोजी, ओंकार मोरे तर खंडोबाकडून प्रभू पोवार, ऋतुराज संकपाळ, थुलुंगा ब्रम्हा यांनी चढाया केला. मध्यंत्तरास सामना शून्य गोलबरोबरीत राहणार असे वाटत असताना पाटाकडीलने यशस्वी चढाई केली. निवृत्ती पौनोजीने खंडोबाचा बचाव भेदत उत्कृष्ट गोलची नोंद केली. मध्यंत्तरास पाटाकडील संघ १-० असा आघाडीवर होता. (PTM win)

उत्तरार्धात परतफेड करण्यासाठी खंडोबा तर आघाडीसाठी पाटाकडील संघ मैदानात उतरले. सामन्याच्या ५८ व्या मिनिटाला पाटाकडीलच्या ओंकार मोरे सुरेख हेडरवर दुसऱ्या गोलची नोंद केली. ६२ व्या मिनिटाला खंडोबा संघास फ्री कीक मिळाली. ओंकार रायकरने वेगवान फटक्याद्वारे खंडोबाचा पहिला गोल केला. या गोलनंतर खेळ वेगवान झाला. खंडोबा बरोबरी साधणार का याची उत्सुकता असताना पाटाकडीलने तिसऱ्या गोलची नोंद करत खंडोबाला धक्का दिला. कॉर्नर किकवर अरबाज पेंढारीने गोल केला करत पाटाकडील संघास ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. (PTM win)
आघाडी कमी करण्यासाठी खंडोबाने चढायाचा वेग वाढवला. ७३ व्या मिनिटाला खंडोबाने यशस्वी चढाई केली. त्यांच्या ऋतुराज संकपाळने बचाव फळी आणि गोलरक्षकाला चकवत सफाईदार गोलची नोंद केली. बरोबरी साधण्यासाठी खंडोबाकडून प्रयत्न सुरू असतानाच पाटाकडीलच्या ऋषीकेश मेथेने खंडोबाच्या गोलक्षेत्रात चढाई केली. पण त्याला अवैधरित्या रोखल्याने मुख्य पंच अजिंक्य गुजर यांनी पेनल्टी किक बहाल केली. ऋषिकेशने अचूक पेनल्टी मारत संघाला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर खंडोबाने पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात धडक मारली. खंडोबाच्या खेळाडूला डी मध्ये रोखल्याने पंचांनी पेनल्टी किक बहाल केली. आघाडी कमी करण्याची खंडोबाला सुवर्णसंधी असताना प्रभू पोवारचा पेनल्टीवर मारलेला फटका गोलखांबाला तटला. पूर्णवेळेत दोन गोलची आघाडी कायम टिकवत पाटाकडीलने सामना जिंकून सतेज चषकावर नाव कोरले. (PTM win)

बक्षिस वितरण आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे सदस्य आणि केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी नॉर्थ इस्ट संघाचे व्यवस्थापक मंदार ताम्हाणे, भरत कोटकर, विजय देवणे, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, सचिन चव्हाण, सुभाष देसाई, राजेंद्र ठोंबरे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, अर्जुन माने, सुरेश ढोणुक्षे, प्रताप जाधव, संजय मोहिते, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. (PTM win)
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
सामनावीर : नबी खान (पाटाकडील)
मालिकावीर : अरबाझ पेंढारी (पाटाकडील)
बेस्ट फॉरवर्ड : निवृत्ती पौनोजी (पाटाकडील)
बेस्ट हाफ : प्रभू पोवार (खंडोबा)
बेस्ट गोलकिपर राजीव मिरियाला (पाटाकडील) बेस्ट डिफेन्स ओंकार रायकर (खंडोबा)
हेही वाचा :