-सुनिल कनकट
वर्तमान काळातील स्त्रीवादी विचारविश्व पाहिले तर एका बाजूला तात्त्विक, शैक्षणिक स्तरावर स्त्री प्रश्नांची चर्चा आणि संशोधन होत आहे तर दुसरीकडे विकृत पद्धतीने महिलांना लैंगिक अत्याचारास बळी पडावे लागत आहे. म्हणूनच केवळ सामाजिक शास्त्रात नव्हे तर नैसर्गिक शास्त्रात देखील आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंत, शासकीय स्तरापासून ते विद्यापीठीय स्तरावर संशोधन केले जात आहे. पण वर्तमान काळात ज्याप्रकारे सामाजिक समस्या संदर्भात विद्यापीठ स्तरावर संशोधन सुरू आहे ते खरोखर धोरण निर्मिती केली जाईल अशा दर्जाचे आहे का ? त्या संशोधनात गुणात्मक दर्जा असतो का? असेल तर अशा संशोधनाची दखल घेतली जाते का ? या अनुषंगाने वेश्या व्यवसायासंदर्भात आजतागायत जे संशोधन झाले आहे आणि सुरू आहे त्या आधारावर मांडणी करण्याचा हा प्रयत्न…
वर्तमान काळातील औद्योगीकरणाच्या विस्तारामुळे शहरांचा अवाढव्य विस्तार होत आहे. वाढती बेरोजगारी आणि नोकरीची शाश्वती नसल्यामुळे कुटुंबापासून दूर राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे. परिणामी, लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्वखुशीने लैंगिक व्यवहार करणाऱ्या स्त्री-पुरुषांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, लैंगिक शोषणाला बळी पडत असलेल्या महिलांची राजकीय जाणीव जागृती, बिगर शासकीय संस्था आणि वेश्या यांच्यातील परस्परसंवाद कसा आहे, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांसंबंधी शासनाचा किंवा सरकारचा कायदेशीर दृष्टिकोन कसा आहे आणि कसा असायला हवा, या अनुषंगाने जे काही संशोधन झालेले आहे आणि होत आहे, याविषयीचा धांडोळा प्रस्तुत लेखात घेतला आहे.
पारिभाषिक शब्दावली
लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला विषयी अधिक प्रसिद्ध आणि प्रचलित असलेला शब्द म्हणजे ‘वेश्या’ किंवा ‘वेश्याव्यवसाय’ आहे. या शिवाय ‘देहविक्रय’, ‘शरीरविक्रय’, ‘देह व्यापार’ तर अलीकडच्या काळात काही संघटना ‘सेक्स वर्क’ आणि ‘सेक्स वर्कर्स’, ‘वूमन इन सेक्स वर्क’, ‘वुमेन सेक्सवर्क’ ‘लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रिया’ अशा संज्ञाचा प्रयोग करताना दिसून येतात. इतकेच नव्हे तर हा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियास बळी, गरीब, विचाऱ्या असा शब्दप्रयोग न करता ‘आम्ही सेक्स वर्कर्स’ असाही शब्दप्रयोग करतात. या व्यवसायात येणाऱ्या महिलांची कारणे पाहिली असता वरील सर्व संज्ञा वेश्याव्यवसाय आणि वेश्या समजून घेण्यासाठी एकाच एक संज्ञा पुरेशी नाही. परंतु त्यांच्या वेगवेगळ्या बाजू पाहिल्यानंतर ‘लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला’ असा उल्लेख करणे अधिक संयुक्तिक ठरेल. परंतु वेश्या हा शब्द जास्त प्रचलित असल्यामुळे प्रस्तुत लेखात वेश्या या पारिभाषेचा चापर अधिक केलेला आहे.
उपलब्ध संदर्भ साहित्य
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस उदयास आलेल्या नवीन सामाजिक चळवळीमध्ये स्त्रीवादी चळवळ ही एक महत्वपूर्ण चळवळ होती. प्राचीन काळापासून चालत आलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रश्न प्रथम दुर्लक्षित केलेला, पण नंतर प्रगत भांडवलशाहीच्या काळात म्हणजेच १९७० व ८० च्या दशकात विकसित राष्ट्राबरोबर विकसनशील राष्ट्रातील स्त्रीवादी चळवळीने आपल्या कृती कार्यक्रम पत्रिकेवर हा प्रश्न घेतला. कालांतराने स्त्रीवादी चळवळीला धरून वेश्या स्वायत्त संघटनेची मागणी करू लागल्या, तर दुसऱ्या बाजूला एचआयव्ही/एड्स सारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्या दरम्यान पाश्चिमात्य व बिगर पाश्चिमात्य देशांत अनेक संस्था, संघटना, सेवाभावी संस्था, बिगर शासकीय संघटना लालबत्ती क्षेत्रातील महिलांसोबत कार्य करू लागल्या, विशेषतः नव्वदच्या दशकापासून वेश्याव्यवसाय, वेश्या आणि लालबत्ती क्षेत्राविषयी समाजशास्त्रीय, मानववंश शास्त्रीय, मानसशास्वीय, साहित्यविषयक, स्त्रीवादी अशा विविध परिप्रेक्ष्यातून लेखन केले गेले. त्याचबरोबर वेश्याव्यवसायावर लालबत्ती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था संघटनाचे विविध पत्रके, भित्तीपत्रके, वार्षिक अंक, विशेष अंक प्रकाशित होऊ लागले. वेश्या आणि वेश्याव्यवसाय दोन्ही घटकांची ऐतिहासिक दृष्टीने रचनात्मक मांडणी झाली, असली तरीही तिचा परिस्थितीनुसार अर्थ बदलत गेलेला दिसून येते.
या संदर्भाने र. थो. कर्वे (१९४०), पु, गो. नाईक (१९४८), पुणेकर आणि राव (१९६७), जेन डी कुन्हा (१९९१), सिन्हा आणि बसू (१९९२), उत्तम कांबळे (१९९८), आशा आपटे (२००२), राजस वसंत (२००४), अनघा तांबे (२००७), रोहिणी सहाणे (२००८), अनुजा अग्रवाल (२००८), अश्विनी तांबे (२००९) आदी संशोधकांनी लेखन केलेले आहे. त्यात प्रभा कोटीस्वरन (२०११) यांचे ‘डेंजरस सेक्स, इनव्हिजिबल लेबर’ (प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेस) पुस्तक म्हणजे १९९० नंतरच्या काळातील वेश्या व्यवसायाला जागतिक पातळीवर जी कामगार म्हणून मांडणी केली जात होती अशा संस्था, संघटनांचा भारतीय संदर्भात ‘सेक्सवर्क’ आणि ‘सेक्स वर्कर्स’ विषयीचे सखोल विवेचन आहे. वरील सर्व लेखन स्त्रीवादी, साहित्य, समाजशास्त्रीय, मानव वंश शास्त्रीय, अर्थशास्त्रीय आणि आरोग्यशास्त्रीय परिप्रेक्षातून झाले आहे. अपवाद वगळता वेश्यासंदर्भात जे काही राजकीय दृष्टिकोनातून लिखाण झाले आहे अश्या संशोधनाची दखल धोरण निर्मिती करताना होत नाही, हे वास्तव आहे.
वेश्याव्यवसायातील दलालांची भूमिका
वेश्याव्यवसाय हा व्यापारी तत्त्वावर चालत असल्यामुळे ‘मागणी व पुरवठा’ या तत्त्वावर अवलंबून आहे. भारतीय संस्कृतीत वेश्याव्यवसायाकडे नीती अनीतीचा परिप्रेक्ष्यातून पाहिल्यामुळे वेश्यागमनी लोक उघड उघड मागणी करू शकत नाहीत. तसेच वेश्याव्यवसाय करणारी स्त्री देखील स्वतःची विक्री करू शकत नाही. त्यामुळे उभयतांमध्ये गुप्तपणे सहसंबंध प्रस्थापित करून देणारी एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेतल्या व्यक्तीला प्रचलित भाषेत दलाल महटले जाते. उघडपणे व्यवसाय करणाऱ्या वेश्यापेक्षा गुप्तपणे व्यवसाय करणाऱ्या वेश्यांमध्ये दलाल हा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. मुख्य स्हणजे गुप्त वेश्याव्यवसायात विक्रेता आणि ग्राहक हे दोघेच एकमेकांचे भेटीसाठी आधीर राहतात, पण परिस्थिती मात्र अशी चमत्कारिक असते की त्या दोघांनाही एकत्र आणणारा तिसरा मिळाल्याशिवाय ते व्यवहार करू शकत नाहीत.
आधुनिक काळातील वेश्याव्यवसायाचे स्वरूप बदलेले असल्यामुळे वेश्याव्यवसायातील दलालाचे स्वरूप देखील बदललेले आहे. काही व्यक्ती पूर्णवेळ दलाल म्हणून काम करतात तर काही जण आपल्या इतर व्यवसायाबरोबर हा व्यवसाय चोरून करतात. कोणता व्यक्ती दलाल आहे हे ओळखणे अवघड आहे. पण त्यांचे काही संकेत सांगता येतात. जसे की, विशिष्ट प्रकारचा नमस्कार, सलाम, विशिष्ट भाषा इत्यादी गोष्टीवरून दलाली करणारी व्यक्ती ओळखता येते. दलालांचे मोठमोठ्या शहरांमध्ये नेटवर्क आहे, तर काही ठिकाणी दलालांच्या टोळ्या आहेत, दलालाच्या संघटना नाहीत, पण संघटनेप्रमाणे त्यात एकी आणि संघटित होण्याची सुप्त शक्ती असते.
या दलालांचे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचे नेटवर्क असते. वर्तमान काळातील कॉल गर्ल्स व अदृश्य वेश्याव्यवसायामुळे त्यांच्या संख्येत अधिकाधिक भर पडत आहे. हे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे या व्यवसायाचा दलाल हा केंद्रबिंदू बनला आहे. तंत्रज्ञानामुळे दलालांचे काम अधिक सोयीस्कर झाले आहे.
वेश्याव्यवसाय आणि समाज
सर्वसाधारणपणे समाज वेश्याव्यवसायकडे कलंकित अशा नजरेने पाहतो. त्यास गुन्हेगारी मानतो. अर्थात, व्यक्तिपरत्वे वेश्यांकडे पाहण्याचे तीन दृष्टिकोन दिसून येतात. एक म्हणजे, वेश्याव्यवसायाबद्दल किळस असणारा वर्ग आहे तसाच वेश्या व्यवसाय बद्दल थोडीफार सहानुभूती असणाराही दुसरा वर्ग आहे. वेश्याव्यवसाय बद्दल काही सोयर सुतक नाही असा तिसरा वर्ग आहे. पहिल्या वर्गातील लोक वेश्यांना सरसकट दोषी मानतात. त्यांच्याकडे हीन दृष्टीने पाहतात. हा व्यवसाय बंद करावा, अशी मागणी करतात, तर दुसऱ्या वर्गातील लोक वेश्याव्यवसायाविषयी थोडीफार सहानुभूती असल्यामुळे ते वेश्यांना दोषी न मानता दलाल, समाजव्यवस्था किंवा पितृसत्ताक व्यवस्थेला दोष देतात. वेश्यांवर, दलालांवर बंदी आणावी किंवा त्यांना कठोर शिक्षा करावी म्हणजे, वेश्याव्यवसायाचा प्रश्न सुटेल असे त्यांना वाटते. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर सर्वच प्रकारच्या वेश्या समाजविघातक आहेत कारण वेश्याव्यवसायामध्ये एका पुरुषापेक्षा अधिक पुरुषासोबत शरीरसंबंध ठेवल्यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. एड्स किंवा इतर संसर्गजन्य होणारा रोग हा केवळ वेश्यागमनी व्यक्तीलाच होतो असे नाही, तर वेश्यागमनी पुरुषापासून त्याच्या पत्नीला किंवा त्यांच्या अपत्यानाही त्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अर्थातच, एचआयव्ही/एड्स हा रोग केवळ वेश्यागमनातूनच होतो असे नाही, हे वास्तव असले तरी एड्स ग्रस्त लोकांचे प्रमाण हे वेश्यागमनापासून अधिक होते, हे नाकारता येत नाही. शरीरविक्रय करणाऱ्या महिला समाजाची एक प्रकारे गरज भागवीत असल्यामुळे त्यास सर्वतोपरी नाहीसा करणे शक्य किंवा श्रेयस्कर नाही, असे म्हणणारे पुष्कळ लोक असले तरी या त्यांचे कायमचे उच्चाटन झाले पाहिजे अशाही मताचा एक पक्ष समाजात नेहमी आढळतो. या दोन्ही चाजूंचा विचार केल्यानंतर हे स्पष्ट होते की वेश्याव्यवसाय हा जेवढा समाज उपयोगी आहे त्यापेक्षा काही पटीने तो समाजविघातक आहे म्हणून वेश्याव्यवसाय सामाजिक समस्या म्हणून समाजापुढे उभा आहे. तत्वतः ती एक राजकीय समस्या म्हणूनही राज्यसंस्थेसमोर उभी आहे.
बिगर शासकीय संस्था आणि वेश्यांच्या संघटनाची भूमिका
पारंपारिक काळापासून चालत आलेल्या वेश्याव्यवसायाने आजच्या घडीला गंभीर रूप धारण केलेले आहे. जागतिकीकरणाचा आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यापासून वेश्याव्यवसाय आणि वेश्याचा व्यापार, लैंगिक स्वैराचाराचा प्रसार वाढतच चालला आहे. विशेषतः तिसऱ्या जगातील राष्ट्रांमध्ये हा स्वैराचार वेगाने वाढताना दिसून येतो. असे होण्याचे कारण म्हणजे, जागतिक पातळीवर हा व्यवसाय प्रचंड नफ्याचा बाजार म्हणून पुढे आलेला आहे. त्याच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी होत आहे. एक विशिष्ट अंतर राखून ठेवलेल्या वेश्यांना मंचावर स्थान दिले आहे. अगदी युनोपासून ते स्थानिक पातळीवर देखील वेश्यांच्या सशक्तीकरणावर काम करणाऱ्या संघटना, संस्थाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न मांडले जात आहेत. वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देणे इत्यादी विधानांचा वापर करून त्यामध्ये असलेल्या हितसंबंधीच्या राजकारणाबरोबर प्रतिनिधित्वाचेही राजकारण कसे केले गेले आहे, याचा शोधही तीन पातळीवर घेण्यात आलेला आहे. त्या मध्ये महाराष्ट्रातील लालबत्ती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था संघटना, आंतरराष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीवर वेश्याव्यवसाया संबंधित मांडण्यात आलेले मुद्दे आणि दोन्ही विभागातील पटक कोणकोणत्या गटाचे हितसंबंध जोपासतात या संबंधांची मांडणी करण्यात आलेली आहे. तसे पाहता, महाराष्ट्रातील वेश्या वस्तीमध्ये काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि बिगर शासकीय संघटनांची ध्येय-धोरणे, उद्दिष्टे आणि भूमिकांवरून संघटनांचे वर्गीकरण करता येते. यात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, वेश्या आणि वेश्याव्यवसायासाठी होणाऱ्या अनैतिक व्यापारावर बंदी घालण्याची व वेश्यांचे निर्मूलन करण्याची मागणी करणारा असा एक गट आहे. तर दुसऱ्या गटातील संघटना तेथील स्त्रियांच्या आरोग्याबरोबर वेश्यांच्या सबलीकरणाची मागणी करतात आणि तिसऱ्या गटातील संघटना अधिक आक्रमकपणे ‘लैंगिक काम हेच खरे आमचे काम आहे’ त्यामुळे एक कामगार म्हणून आम्हालाही हक्क मिळाले पाहिजे, अशी मागणी करणारा आहे. दुसऱ्या बाजूला हा गट वेश्या व्यवसायातील स्त्रियांना कामगार आणि त्यांच्या संघटनांना कायद्याचे संरक्षण देऊन त्याचे वैध व्यवसायात रूपांतर करण्याचा आग्रह धरतानाच पितृसत्तेला विरोध करणारा आहे.
वेश्याव्यवसाय आणि राज्यसंस्था
सन १९८०-९० च्या दशकानंतर एआचव्ही/एड्स सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत चाललेला होता. या आजारामुळे अनेकांचे बळी देखील जात होते. परिणामी कायद्याने नियमन व नियंत्रण करण्यासंबंधीचा वाद पुन्हा ऐरणीवर आला होता. राज्यसंस्था एनजीओ, आरोग्य विभाग आणि जाहिरातीच्या माध्यमातून अधिक सक्रिय होऊन कार्य करताना दिसत होते. तत्कालीन परिस्थिती वेश्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्नही वेगाने सुरु झाले होते. असे प्रयत्न पहिल्यांदाच होत होते असे नाही, तर वसाहत काळात आणि वसाहतपूर्व काळात देखील असे प्रयत्न झालेले होते. मात्र एड्सचा प्रश्न धोकादायक बनल्यानंतर केवळ लालबती क्षेत्रातील स्त्रियांनाच एड्सच्या वाहक- प्रसारक म्हणून जबाबदार ठरविले जात होते. त्यामुळे वेश्या व वेश्याव्यवसाया संबंधीचा शासनाच्या दृष्टिकोन कसा आहे, हे त्या त्या काळात झालेला कायद्याच्या आधारावर शासनाचा किंवा राज्यसंस्थेच्या दृष्टिकोन समजून घेता येतो.
यातला पहिला टप्पा हा मुख्यतः नियंत्रणात्मक दृष्टिकोनाचा आहे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार आणि राष्ट्रवादी चळवळीच्या उदयामुळे एका बाजूने प्रतिबंधात्मक दुसऱ्या बाजूला निर्मूलनात्मक अशा दोन्ही बाजूचा स्वीकार केला गेलेला दिसतो. तिसऱ्या टप्प्यावर भारत स्वतंत्र झाल्यानंतर यंत्रणांच्या दमनाचा वापर करून पुन्हा निर्मूलनात्मक पद्धतीचा स्वीकार केलेला दिसून येतो. तर चौथ्या टप्प्यावर वेश्यांना अपरिहार्य मानून प्रतिबंधात्मक पद्धतीचा स्वीकार केलेला दिसून येतो. आणि अंतिमतः जागतिकीकरणाच्या काळात वेश्यांना कामगार म्हणून कायदेशीर दर्जा देण्यासाठी पुन्हा नियमन व नियंत्रणात्मक पद्धतीकडे वाटचाल होते आहे, या पाच बदलाच्या दृष्टिकोनाची चर्चा लेखकांनी ‘वेश्याव्यवसायः बदलता कायदा, बदलते दृष्टिकोन’ या लेखात केलेली आहे. मुळात, वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देणे म्हणजे स्त्रीच्या वाढत्या मादीकरणाला प्रोत्साहन देणे होय. देवदासी, मुरळी सारख्या अमानुष रुढी, सडलेल्या विवाहसंस्थेचा प्रश्न, गुन्हेगारीकरण आणि भ्रष्ट शासन या सर्व प्रश्नांना बगल देऊन ‘लायसन्स राज’ हे उत्तर म्हणजे ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असा न्याय आहे. खरे तर पुरुषसत्ताक प्रभावाला बाजूला करून वेश्यांच्या कायदेविषयक समस्यांबाबत मुक्त चर्चा व्हायला पाहिजे, ती मात्र होत नाही ही शोकांतिका आहे. थोडक्यात, वेश्याव्यवसाय संबंधीचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतचे कायदे हे नियमन-नियंत्रणाकडून दडपशाहीच्या मार्गाने निर्मूलनाच्या दिशेने प्रवास करीत आज हा कायदा प्रतिबंधात्मक आणि अदृश्य सुरक्षात्मक व्यवहाराकडे अर्थात पुन्हा पहिल्या टप्प्याकडे प्रवास करताना दिसून येतो. या व्यवसायासंबंधीच्या कायद्याचा प्रवास बघितला तरी हा व्यवसाय पूर्णतः बंद करणे अशक्य आहे. ही वस्तुस्थिती आहे.
उपाय: वेश्यांची होणारे कोंडी सोडवण्यासाठी नवीन कायद्याची व वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यतेची गरज नाही, तर सध्या अस्तित्यात असलेल्या कायद्यात बदल व सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यसंस्थेने कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये मानवतावादी दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे.
सारांश: आधुनिक काळातील प्रगत भांडवलशाहीच्या विकासाबरोबर वेश्याव्यवसायाने व्यक्तीच्या कल्पनेतील अति उच्च टोक गाठले आहे. वेश्या व्यवसायामध्ये विशिष्ट टण्यावर त्यांच्यात बदल झालेले आहेत, पण आजही त्यातील कामवासनेचा दृष्टिकोन स्थिर आहे. भारतीय समाजामध्ये दिवसेंदिवस लैंगिक जीवन अधिकाधिक विकृत रूप धारण करत आहे आणि त्याची पूर्तता करण्यासाठी वेश्यांनीही समाजाच्या विकृतीचे सिम्बॉल अंगीकृत केले आहे. थोडक्यात, काय तर वेश्याव्यवसायाचे स्वरूप बदललेले आहे. वर्तमान काळातील वेश्या ही कॉल गर्ल्स, मॉडेल गर्ल्स, सोसायटी गर्ल्स, बिअरबार मधील वेट्रेस, बार डान्सर इत्यादी रुपांमध्ये समाजापुढे उभी आहे. पूर्वी मुख्यतः कुंटणखान्यामधून व्यवसाय करणाऱ्या स्त्रीस वेश्या म्हटले जात होते. पण आजच्या काळात कुंटणखान्यापलीकडे तथाकथित सभ्य समाजात हा व्यवसाय अदृश्य स्वरुपात सुरू झालेला आहे. त्यामुळे नीती अनीतीच्या पलीकडे जाऊन राज्यसंस्थेने वेश्यांकडे केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता सकारात्मक हस्तक्षेप करून धोरण निर्मिती केली पाहिजे.
(टीपः सदर लेख लिहिताना डॉ. नामदेव पवार यांनी आशयाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना केल्या.)