Home » Blog » Houses in BDD : बीडीडी चाळवासीयांना सदनिकांचे वितरण, मुंबईकरांचे जीवनमान सुधारणार : मुख्यमंत्री फडणवीस

Houses in BDD : बीडीडी चाळवासीयांना सदनिकांचे वितरण, मुंबईकरांचे जीवनमान सुधारणार : मुख्यमंत्री फडणवीस

by प्रतिनिधी
0 comments
Houses in BDD

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (१४ ऑगस्ट) माटुंगा, मुंबई येथे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ चाळवासियांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांच्या चावीचे वितरण करण्यात आले. मुंबईकरांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडवण्याचे काम करत राहू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. (Houses in BDD)

१९२० पासूनच्या बीडीडी चाळीने स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक व राजकीय आंदोलनांचा इतिहास पाहिला आहे. अनेक पिढ्यांपासून येथे राहणारे कुटुंब, त्यांच्या श्रमातून उभी राहिलेली ही मुंबई आणि येथील भिंतींमध्ये दडलेल्या त्यांच्या हजारो आठवणी… हे सर्व जपणारी ही वसाहत आज नव्या स्वरूपात उभी आहे.

या पुनर्विकासाचा प्रवास सोपा नव्हता. सुमारे ९० वर्षे प्रलंबित असलेले खटले निकाली काढून, खासगी विकासकांच्या नफ्याच्या गणितावर आधारित केवळ ३००–३२५ चौरस फूट घरांची मर्यादा नाकारून, म्हाडामार्फत पाचशे चौरस फूट प्रशस्त घरे देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. आशियातील सर्वात मोठ्या नागरी पुनर्निर्माण प्रकल्पासाठी जागतिक निविदा मागवून, देशातील आणि जगातील प्रतिष्ठित विकासकांना काम देण्यात आले. आज वरळीतील एकट्या प्रकल्पातून सुमारे नऊ हजार घरे, तर संपूर्ण योजनेतून १४,००० घरे उपलब्ध होणार आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांना केवळ ₹१५ लाखांमध्ये हक्काचे घर मिळणे, हे या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. (Houses in BDD)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मुंबईतील इतर पुनर्विकास प्रकल्प अधोरेखित केले. अभ्युदय नगर, जीटीबी नगर, पीएमजीपी अंधेरी यांसारख्या वसाहतींमध्ये वेगाने काम सुरू आहे. सरकारचा उद्देश नफा नसून सामान्य माणसाला घर मिळवून देणे हा असल्याने हे प्रकल्प यशस्वी होत असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले. (Houses in BDD)

धारावीत उच्च दर्जाची औद्योगिक वसाहत

धारावी पुनर्विकास हा त्याच दृष्टीकोनाचा विस्तार आहे. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली धारावी ही फक्त झोपडपट्टी नाही, तर एक आर्थिक विकासाचे केंद्र आहे. येथे रहिवाशांना घरे देतानाच लेदर उद्योगासारख्या व्यवसायांसाठी मूल्यसाखळी तयार करून, पाच वर्षांची करसवलत देत उच्च दर्जाची औद्योगिक वसाहत उभारली जाणार आहे. येथील न्यायालयीन अडथळे दूर करून सर्वांना घरे देण्याचा निर्णय घेतल्याने पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सरकारचे काम करण्याचे तत्त्व सर्वसमावेशक आहे. कोणी कितीही टीका केली तरी आम्ही मुंबईकरांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडवण्याचे काम करत राहू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

या ऐतिहासिक क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार मिलिंद देवरा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


वर्षाला ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू

दरम्यान, ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्वाच्या लिंक पुलांमुळे  पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

वांद्रे येथे प्राधिकरण पोडियम येथे प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उदघाटन व लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार,  महापालिका आयुक्त भूषण गगरानी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.

१५ ऑगस्टपासून मुंबईतील कोस्टल रोड नागरिकांसाठी २४ तास खुला असणार असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वाहनचालकांनी कोस्टल रोडवर वाहतूक नियमांचे पालन करावे, संपूर्ण कोस्टल रोड सीसीटीव्ही निगराणीखाली आहे. हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी ठरणार आहे. यात पादचाऱ्यांसाठी प्रेक्षणीय असे वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक यांचा समावेश आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी समांतर मार्ग तयार केले जात आहेत.
मुंबईतील विविध भागांना जोडणारे टनेल्स, लिंक पूल आणि उड्डाणपूल हे वाहतूक सुलभीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. २०२८-२९ पर्यंत मुंबईत सुरू असलेले विकास प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. मेट्रो प्रकल्प केवळ वाहतूक सुधारण्यासाठी नसून, रोजगार निर्मितीचाही एक प्रभावी मार्ग आहे.  कर्मचाऱ्यांना चांगले निवास व सुविधा दिल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते. विकासात कोणतीही तडजोड न करता, मुंबईच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00