इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एकाच कुटुंबातील सहा भावांनी विवाहाचा खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी एकाच कुटुंबातील सहा बहिणींशी विवाह केला. मुलतान जिल्ह्यातील जलालपूर पीरवाला शहरामधील खानबेला येथे हा सामुहिक विवाहसोहळा पार पडला. हुंडा न घेण्यात आल्यामुळेही हा विवाहसोहळा चर्चेत आहे. (Pakistan wedding)
नवरदेवांपैकी निग्रान अब्बास आणि कामरान अब्बास या दोघांनी या सामुहिक विवाहसोहळ्याविषयी माहिती दिली. वधूच्या कुटुंबावर आर्थिक भार टाकण्याची इच्छा नसल्याने सामुहिक विवाहसोहळा करण्याचा निर्णय घेतल्याचे या दोघांनी सांगितले. या विवाहामध्ये पारंपरिक ‘सलामी’ स्वीकारण्यासही कुटुंबाने नकार दिला. पाहुण्यांकडून देण्यात येणाऱ्या रोख रकमेच्या भेटींना ‘सलामी’ म्हटले जाते. हे विवाह एका वर्षापूर्वीच ठरवण्यात आले होते. तथापि, या सहा भावंडांपैकी सर्वांत लहान भावाने वयाची १८ वर्षे पूर्ण करेपर्यंत एक वर्ष प्रतीक्षा करण्यात आली. या विवाहासाठी १०० हून अधिक पाहुणे उपस्थित होते. (Pakistan wedding)
पाकिस्तानमध्ये शाही विवाहसोहळे आणि त्यामध्ये होणारी पैशांची उधळपट्टी हा चिंतेचा विषय बनत आहे. बऱ्याचदा जमीन गहाण ठेवून अथवा मालमत्ता विकून हे शाही सोहळे आयोजित केले जातात. अलीकडेच पाकमधील हैदराबाद शहरात वरपित्याने वधूच्या घरावर हेलिकॉप्टरमधून केलेली नोटांची वृष्टी चर्चेत आली होती. (Pakistan wedding)
हेही वाचा :
कुराणाची छोटी आणि मराठी प्रतही पाहता येणार
एकाच नंबरच्या दोन गाड्या… नेमके गूढ काय..?