अफगाणिस्तानचा स्वतंत्र बाणा हेच पाकिस्तानचे दुखणे

  • प्रा. अविनाश कोल्हे

विसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा असं वातावरण निर्माण झालं होतं की ‘धर्म’ या आधारावर नवा देश निर्माण करता येतो. म्हणून बॅ. जिन्ना यांची मांडणी प्रत्यक्षात आली तेव्हा हा एक नवा पायंडा निर्माण पडत आहे, असे वाटायला लागले होते. मात्र याच पाकिस्तानची जेव्हा डिसेंबर १९७१ साली फाळणी झाली आणि बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा बॅ. जिन्नांची मांडणी उधळली गेली की काय, असे वाटायला लागले. याचा पुढचा पुरावा म्हणजे १९७९ ते १९८९ दरम्यान इराण आणि इराक या दोन मुस्लिम देशांत जेव्हा युद्ध झाले तेव्हा पुन्हा एकदा ‘धर्म’ या पायावर आधुनिक काळात नवा देश निर्माण होऊ शकत नाही, हे सिद्ध झाले. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन मुस्लिम देशांत डिसेंबर २०२४ पासून रक्तरंजित वादावादी सुरू झाली आहे. (afghanistan pakistan war)

अफगाणिस्तानच्या पूर्व भागात पाकिस्तानने मंगळवार २४ डिसेंबर रोजी रात्रभर हवाई हल्ले केले. एका अंदाजानुसार यात सुमारे पन्नास लोक मारले गेले. मोठया प्रमाणात वित्तहानी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे हे हल्ले अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पकतिका प्रांतावर करण्यात आले होते. या हल्ल्यात मृत झालेल्यांत महिला आणि बालकांचा समावेश होता. अशी माहिती तालिबानच्या प्रवक्त्याने दिली. तर हे हल्ले दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि घुसखोरांचा नायनाट करण्यासाठी करण्यात आले होते अशी पाकिस्तानची बाजू आहे. या हल्ल्यांत कोणाची चूक होती, कोण दोषी आहे वगैरेंपेक्षा यामुळे आता अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील ताणतणावात भर पडेल, ही भीती जास्त आहे. दुस-याच दिवशी म्हणजे बुधवार २५ डिसेंबर रोजी खैबर पख्तुनवाला प्रांताच्या दक्षिण वझिरीस्तान जिल्हयातील सीमेवरून पाकिस्तानात घुसखोरी करू पाहणा-या दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैन्याने ठार केल्याचेसुद्धा वृत्त आहेच. (afghanistan pakistan war)

पाकिस्तानमुळेच अफगाणिस्तानात गुंता

आजच्या अफगाणिस्तानचे काय करायचे याबद्दल भल्याभल्यांची डोकी चालत नाहीत. आज अफगाणिस्तानचा एवढा गुंता होण्यात पाकिस्तानचा मोठा हात आहे. याची सुरुवात डिसेंबर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान जाऊन त्याऐवजी बांगलादेश आला तेव्हा झालेली दिसून येते. त्या अगोदर पाकिस्तानला आपण ‘भारताला दोन सीमांवर त्रस्त करू शकतो’ याचा आनंद असायचा. जर भारताने पश्चिम पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला तर याला पूर्व पाकिस्तानातून उत्तर द्यायचे अशी पाकिस्तानची रणनीती होती. पण डिसेंबर १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती झाल्यापासून पाकिस्तानची रणनीती कालबाह्य झाली. म्हणून मग पाकिस्तानी योजनाकारांनी अफगाणिस्तानात लक्ष घालायला सुरुवात केली. यामागे तर्कशास्त्र असे होते की, जर आता भारताने पाकिस्तानवर (म्हणजे जुना पश्चिम पाकिस्तान) जोरदार हल्ला केलाIndia-Pakistan,  तर पाकिस्तानला अफगाणिस्तानात आश्रय घेता आला पाहिजे आणि त्यासाठी अफगाणिस्तानात पाकिस्तानधार्जिणे सरकार असणे गरजेचे ठरले. तेव्हापासून पाकिस्तानचे राज्यकर्ते अफगाणिस्तानच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करत असतात. त्यासाठीच पाकिस्तानने ‘तालिबान’ संघटनेला सर्व प्रकारची मदत केली. यामुळेच तालिबान अफगाणिस्तानात १९९६ ते २००१ दरम्यान सत्तेत होते.

आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर असे दिसते की फेब्रुवारी १९७९ मध्ये इराणमध्ये आयोतोल्ला खोमेनी यांनी केलेली ‘इस्लामी क्रांती’ ही फार महत्वाची घटना आहे. या क्रांतीचे लोण शेजारच्या अफगाणिस्तानात येऊ नये म्हणून सोव्हिएत युनियनने डिसेंबर १९७९ मध्ये तेथे सैन्य पाठवले. त्याकाळी अफगाणिस्तानात मार्क्सवादी विचारांचे सरकार होते. अशा सरकारला मदत करणे सोव्हिएत युनियनचे कर्तव्य होते. मात्र आपल्या देशात घुसलेल्या आणि देव न मानणा-या रशियन फौजांच्या विरोधात अफगाणिस्तानातील विविध वांशिक टोळ्या स्वतंत्रपणे लढल्या. अशा स्थितीत रशियाने डिसेंबर १९८९ मध्ये म्हणजे दहा वर्षांनी सैन्य माघारी घेतले. अफगाणिस्तानातून रशियन सैन्य माघारी गेल्यानंतर अफगाणिस्तानात यादवी युद्धाला ऊत आला होता. तेथे प्रत्येक वंशाच्या टोळया होत्या. ताजिकांची, उज्बेकांची, पठाणांची टोळी वगैरे टोळ्या एकमेकांच्या गळा दाबण्याच्या प्रयत्नांत होत्या. अशा स्थितीत पाकिस्तानने १९९३ साली तालिबान’ ही धर्मांध शक्तींची संघटना जन्माला घातली आणि नंतर तालिबानला सर्व प्रकारची मदत केली.

तालिबानी सत्तेचा विळखा

तालिबानने १९९६ साली अफगाणिस्तानाच्या नव्वद टक्के भागावर सत्ता मिळवली. तालिबानची सत्ता २००१ च्या ऑक्टोबरपर्यंत होती. ११ सप्टेंबर २००१ रोजी अल कायदाने अमेरिकेवर विमान हल्ले केल्यामुळे अमेरिका अफगाणिस्तानात शिरली. पुढे अमेरिका तेथे वीस वर्षे होती. अमेरिकेने ऑगस्ट २०२१ मध्ये अचानक अफगाणिस्तानातून माघार घेतली आणि पुन्हा एकदा सत्ता तालिबानकडे आली. जी आजही त्यांच्याच हातात आहे. मुख्य म्हणजे कालपर्यंत एकमेकांचे मित्र असलेले पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात आज तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.(afghanistan pakistan war)
तसं पाहिलं तर हे मतभेद अलिकडचे नाहीत. भूगोलाचा विचार केला तर पाकिस्तानची सीमा एका बाजूने भारताला भिडलेली आहे तशी ती दुसरीकडे अफगाणीस्तानशी भिडली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पश्चिम आणि मध्य आशियातील राजकारणात अफगाणीस्तान अचानक महत्त्वाचा ठरला. म्हणूनच इंग्रजांनी पुढाकार घेऊन १८९३ साली ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ड्युरँड रेषा आखली जी दोन्ही देशातील सीमा म्हणून ओळखली जाते. असं असलं तरी दोन्ही देशांत विभागल्या गेलेल्या पख्तून समाजाला ही सीमा कधीही मान्य नव्हती.(afghanistan pakistan war)

पाकिस्तानचा भ्रमनिरास

आपल्या हातातल्या बाहुलं असलेल्या तालिबानच्या हातात २०२१ साली पुन्हा सत्ता आल्याचे पाहून पाकिस्तानला फार आनंद झाला. पण लवकरच पाकिस्तानचा भ्रमनिरास झाला. याचे कारण म्हणजे तालिबानचे सरकार अफगाणिस्तानचे हितसंबंध डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घ्यायला लागले. यातील अनेक निर्णय पाकिस्तानला आवडणारे नव्हते. म्हणूनच पाकिस्तानने आता तालिबानविरोधी शक्तिंना मदत करायला सुरुवात केली आहे. एका अंदाजानुसार पाकिस्तानच्या आय. एस. आय. या गुप्तहेर संघटनेने तालिबानला लगाम घालण्यासाठी ताजिकिस्तानातील तालिबानविरोधी शक्तिंना एकत्र आणण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तान-चीन सीमा म्हणजे वखान पट्टी (कॉरीडॉर). आता पाकिस्तान याच वखानवर ताबा मिळवून ताजिकिस्तानपर्यंत हात पसरण्याचे स्वप्न पाहात आहे. यासाठी पाकिस्तानने मोठया प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. (afghanistan pakistan war)

चीनच्या भूमिकेला महत्त्व

या प्रकरणात चीनच्या भूमिकेला अचानक महत्व आले आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे वखान पट्टी म्हणजे चीन-अफगाणिस्तान यांच्यातील सीमा. चीनच्या झिंगियांग प्रांतात विगुर मुस्लिम फार मोठया प्रमाणात आहेत. गेले अनेक वर्षे ते स्वतंत्र देशाची मागणी करत आहेत आणि यासाठी ते अनेकदा चीनी सैन्यावर सशस्त्र हल्ले करत असतात. चीनमधून फुटून निघण्यास आतूर असलेल्या शक्तिंना अफगाणिस्तानातून मदत मिळू नये, अशी चीनची इच्छा आहे. त्याचप्रमाणे या वादात पाकिस्तानला दुखवू नये असेही चीनचे प्रयत्न आहेत. आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेला ताण लवकर संपेल, असे दिसत नाही. ‘स्वतंत्र बाण्याचा अफगाणिस्तान’ मान्य करणे पाकिस्तानसाठी सोपं नाही.

 

Related posts

Los Angeles Fire : उरले केवळ भग्नावशेष!

Virat, Anushka : विराट, अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या भेटीस

Modi Podcast : मोदी म्हणाले, ‘मी देव नाही!’