कोल्हापूर; प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी (ललित पंचमी) करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ अंबाबाई रुपात पूजा बांधण्यात आली.श्री त्र्यंबोली पंचमी- कोलासुर पुत्र कामाक्ष अत्यंत उग्र व पराक्रमी पुत्र होता. देवताकडून त्याचा पराभव झाल्यानंतर निराश होऊन तो दैत्यगुरु शुक्राचार्याकडे गेला व त्यांच्या आज्ञेने कपिलाश्रमात कपिलमहामुनींची सेवा करुन, त्यांच्याकडून योगदंड मिळविला. हा योगदंड कोणावरूनही फिरविला असता, तो प्राणिरूप होई. मात्र जमिनीवर ठेवताच याचे सामर्थ्य तत्क्षणी नष्ट होई. (Navratri Ustav 2024)
हा योगदंड घेऊन कामाक्ष मुक्तिमंडपात आला, येथे देवगणांसहित जगदंबा कोल्हासुर वधोत्सवाचे कूष्मांडभेदन करीत होती, एकाच ठिकाणी असलेल्या देवगणांवरुन कामाक्षाने योगदंड फिरविला, यामुळे सर्व देवांचे शेळ्या मेंढ्यात रुपांतर झाले. तेव्हा त्र्यंबोलीने वृद्धस्त्रीचे रूप घेऊन, मायेने कामानाकडून योगदंड हिसकावुन घेऊन, त्याचा वध केला. या योगदंडाच्या शक्तीने सर्वदेवांस पूर्ववत् केले. हे तिचे देवलोकांवर मोठे ऋण होते. (Navratri Ustav 2024)
कोल्लासुरवधासाठी त्र्यंबुलीने देवीस प्रचंड साहाय्य केले असूनही, विजयोत्सवात तिला बोलाविण्याचे राहून गेले, याचा त्र्यंबुलीला राग आला व ती रागाने करवीराबाहेर एका टेकडीवर जाऊन बसली. ही गोष्ट जगदंबेच्या ध्यानात येताच, तिने त्र्यंबुलीस दासीकरवी निरोप धाडला. अखेर त्र्यंबुलीच्या रागाचे परिमार्जन करण्यासाठी जगदंबा स्वतः तिच्या भेटीस गेली आणि कोल्लासुरवधाचा विजयोत्सव (कोहाळा छेदन) त्र्यंबुलीसमोरच साजरा केला, यानंतर,’ अश्विनशुद्ध पंचमीस (त्र्यंबुलीपंचमी) जे भक्त तुझ्या दर्शनास येतील, त्यांनाच करवीरवासफल लाभेल. करवीरात कोणतेही विधि, यात्रा करणाऱ्या भाविकानी आदि- मध्य व कर्मसमाप्तीवेळी तुझे दर्शन घेतले नाही, तर त्याची उपासना व तीर्थविधी सिद्धी पावणार नाही.’ असा जगदंबेने त्र्यंबुलीला वर दिला. करवीरक्षेत्रात त्र्यंबुलीचे माहात्म्य थोर आहे.ही पूजा श्रीपूजक मयुर मुकुंद मुनिश्वर, अरुण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यांनी बांधली.
हेही वाचा :