MP Sule: ‘सीबीएसई’ सुरु करुन शिक्षण मंडळ बंद करणार का?

MP Sule

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकार राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करणार आहे. मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, खा. सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (२२ मार्च) उपस्थित केला. (MP Sule)

मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यात गेल्या शंभर दिवसांत केवळ गुन्हेगारीत वाढ झाली असून महाराष्ट्र गुन्हेगारीत नंबर वन ठरला आहे, अशी टीकाही केली.

त्या म्हणाल्या की, राज्यातील शाळांत सीबीएसई अभ्यासक्रम सुरु होणार आहे. त्याबद्दल मला तीन प्रश्न विचारायचे आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमात किती टक्के मराठी असणार आहे, महाराष्ट्राचा इतिहास त्यात असणार का, महाराष्ट्राची किती माहिती त्यात असणार आहे. सीबीएसई बोर्ड करताना तुमची तयारी आहे का? तुमच्याकडे शिक्षक आहेत का?(MP Sule)

राज्यात गुन्हेगारीचा आलेख चढताच आहे. केंद्राच्या डेटातूनही राज्यात गुन्हेगारी वाढल्याचे दिसते, असे सांगून त्या म्हणाल्या की, ज्या व्यक्तीवर आरोप होतो, तो देश सोडून जातो. ईडीने १९६ केसेस दाखल केल्या. त्यात दोनच जणांवर आरोपत्र सिद्ध झाले आहेत. हे केंद्र सरकारने लोकसभेत सांगितल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, राज्याचे अर्थमंत्री काल म्हणाले, सगळ्याचे सोंग घेता येते पण पैशांचे सोंग घेता येत नाही. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्याचे मी स्वागत करते. मी हेच चार महिन्यांपासून सांगत होते. या सरकारने आता आदिवासी विभागाचे पैसे आणि सामाजिक विभागाचे पैसे वळवले आहे. तीन ते चार लाख कोटी रुपये शेअर बाजारातून लोकांनी काढून घेतले आहे. देशातील गुंतवणूक बाहेर जात आहे. सामान्य माणसांचे पैसे शेअर बाजारात होते. आज काय परिस्थिती आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे, हे परवा अर्थमंत्र्यांनीच सभागृहात सांगितले आहे. त्यामुळे सरकारने औरंगजेबासारखे मुद्दे बाजूला करुन राज्यातून बाहेर जाणारी गुंतवणूक थांबवावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक लक्ष द्यावे असे, आवाहनही सुळे यांनी केले.(MP Sule)

कोरटकर परदेशात गेला कसा?

त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. असे गंभीर आरोप असलेला  कोरटकर हा देश सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे.  हा माणूस देश सोडून गेलाच कसा?, नागपूरवरुन दिल्लीला गेला आणि दिल्लीवरुन दुबईला गेला अशी माहिती मिळत आहे. राज्य सरकारला त्याला शोधता येत नसेल तर त्यांनी केंद्राची मदत घ्यायला पाहिजे. एक माणूस नागपूरहून दिल्ली आणि दिल्लीतून बाहेर देशात निघून जातो तोपर्यंत राज्याचे पोलिस आणि गृहखाते काय करत होतं? अशी विचारणा त्यांनी केली.(MP Sule)

बीड, परभणीमध्ये न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार

बीडमध्ये सरपंचाचे हत्याकांड झाले. त्यानंतर परभणीमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा पोलिस ठाण्यातील मारहाणीत मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये सर्वप्रथम  शरद पवार हे त्या पीडित कुटुंबीयांच्या भेटीला गेले. डिसेंबरमध्ये त्यांनी जे सांगितले  ते आज साडे तीन महिन्यांनी खरे ठरले आहे. सरकारचे किती लोक बीड आणि परभणीला गेले? महादेव मुंडेंच्या पत्नीला सरकारचे किती लोक जाऊन भेटले? हा राजकारणाचा विषयच नाही, हा माणुसकीचा विषय आहे. आम्ही बीड, परभणी येथील अन्यायग्रस्त कुटुंबीयांच्या पाठीशी सुरवातीपासून आहोत. जोपर्यंत हल्लेखोरांना शासन होत नाही तोपर्यंत आमची तीच भूमिका असणार आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देशात सर्वाधिक गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली आहे. सुसंस्कृत नागपूरमध्ये दंगल घडते. सहा दिवस झाले तरी नागपूरमधील अनेक भागांत संचारबंदी लागू आहे. या सरकारचे १०० दिवसांचे रिपोर्ट कार्ड पाहिले तर या सरकारने राज्यात गुन्हेगारी वाढवली. याशिवाय यांच्या रिपोर्टकार्डवर काहीही लिहिलेले नाही.

खा. सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी

Related posts

Vetalmal : ‘वेताळमाळ’ची उपांत्य फेरीत धडक

Khadase : मंत्री महाजनांचे महिला अधिकाऱ्यांशी संबध

Kerala Firm : गळ्यात पट्टा बांधून कर्मचाऱ्याला कुत्र्यासारखे फिरवले