Home » Blog » Maria Corina Machado : व्हेनेझुएलाची “आयर्न लेडी” मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचे नोबेल

Maria Corina Machado : व्हेनेझुएलाची “आयर्न लेडी” मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचे नोबेल

by प्रतिनिधी
0 comments
Maria Corina Machado

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  नोबेल शांतता पुरस्कारासाठी दबाव वाढवत असताना व्हेनेझुएलामधील लोकशाही हक्कांसाठी लढणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवारी (दि. १०) या पुरस्काराची घोषणा केली. शांततेसाठी नोबेल कोणाच्या नावाची घोषणा होणार याची  जगभरात सर्वाधिक उत्सुकता होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा पुरस्कार मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम उघडली होती. गतवर्षी हा पुरस्कार जपानवरील अणुहल्ल्यातून वाचलेल्या लोकांच्या ‘निहोन हिडानक्यो’ या संघटनेला देण्यात आला होता. अण्वस्त्र बंदीची मोहीम त्यांनी चालवली होती. (Maria Corina Machado)

कोण आहेत मारिया मचाडो?

“व्हेनेझुएलाच्या जनतेसाठी लोकशाही अधिकार वाढवण्यासाठी, आणि हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे शांततामय मार्गाने जाण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा शांतता पुरस्कार देण्यात येत आहे.” असे पुरस्कार समितीने म्हटले आहे.

मारिया मचाडो या व्हेनेझुएलातील लोकशाही चळवळीच्या प्रमुख नेत्या मानल्या जातात. त्यांनी देशातील विभागलेल्या विरोधकांना एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांची मागणी करत एकजूट केली. लोकशाहीवरील संकटाच्या काळात असा समान पाया जपणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे समितीने नमूद केले. (Maria Corina Machado)

हुकूमशाही राजवटीखाली राजकीय कार्य करणे फार अवघड असतानाही मचाडो यांनी “सुमेट” नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था लोकशाही विकासासाठी कार्य करते. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ त्या मुक्त निवडणुकांसाठी लढत आहेत.

२०२४  च्या निवडणुकीत मचाडो विरोधकांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार होत्या, पण सत्ताधाऱ्यांनी त्यांची उमेदवारी रद्द केली. त्यानंतर त्यांनी एडमंडो गोंझालेस उरुटिया या उमेदवाराला पाठिंबा दिला. विरोधक एकत्र आले. स्वतः मतमोजणी केली आणि स्पष्ट विजय मिळाल्याचे दाखवले. मात्र सत्ताधाऱ्यांनी निकाल नाकारला आणि सत्ता सोडली नाही. परिणामी मचाडो यांना अज्ञातवासात राहावे लागले. मात्र त्या देशाबाहेर न जाता आपल्या देशातच राहिल्या. जिवावरचा धोका पत्करूनही त्यांनी लढा सुरू ठेवला, ज्यामुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळाली. (Maria Corina Machado)

नोबेल पुरस्काराचे स्वरुप

नोबेल पुरस्कार दरवर्षी दहा डिसेंबर रोजी दिले जातात. नोबेल पुरस्कारांचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांचा हा स्मृतीदिन असतो. प्रत्येक विजेत्याला मिळतात ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे साडेदहा कोटी रुपये), सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र दिले जाते. अल्फ्रेड नोबेल हे स्वीडनचे श्रीमंत उद्योगपती होते आणि त्यांनीच डायनामाइटचा शोध लावला होता. त्यांचे निधन १८९६ मध्ये झाले. (Maria Corina Machado)

अन्य विभागातील नोबेल विजेते

 वैद्यकशास्त्र : मेरी ई. ब्रँको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन सकागुची यांना पेरिफेरल इम्यून टॉलरन्स विषयक संशोधनासाठी पुरस्कार.

भौतिकशास्त्र : जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना क्वांटम टनलिंग विषयक संशोधनासाठी पुरस्कार.

रसायनशास्त्र : सुसुमु कितागावा (जपान), रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) आणि ओमर एम. यागी (अमेरिका) यांना मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स विषयक योगदानासाठी पुरस्कार.

साहित्य : हंगेरीचे लेखक लास्झलो क्रास्झ्नाहोरकाई यांना, त्यांच्या अद्भुत आणि दूरदर्शी साहित्यकृतीसाठी सन्मान.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00