कोल्हापूर : प्रतिनिधी : पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आज शुक्रवारी जिल्ह्यात ‘ग्रीन डे’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेय यांनी घरातून कार्यालयापर्यंत सायकल प्रवास करुन उपक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग झाले. (Green Day)
जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी स्वतः सायकलचा वापर करुन कार्यालयात येत उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. या अभिनव उपक्रमाद्वारे कोल्हापूर जिल्ह्याने देशभरात पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श निर्माण केला असून, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता न राहता वर्षभर आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. हा उपक्रम दर दिवशी साजरा करण्यात यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले. (Green Day)
सरकारी कार्यालयासह खासगी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सायकल आणि इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर केला.काही जण चक्क चालत आले. काहींना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारत प्रवास केला. आज दिवसभर वीज, इंधन, कागद, प्लास्टिक आणि मोबाइल यांचा कमीत कमी वापर करुन या उपक्रमात सहभागी झाले. ‘ग्रीन डे’ अंतर्गत कर्मचाऱ्यांनी वीज व इंधनाचा वापर कमी करुन, कार्यालयीन कामकाजात कागदाऐवजी डिजिटल प्रणालीचा वापर, लिफ्टऐवजी जिन्याचा वापर तसेच प्लास्टिकमुक्त उपक्रमांचा अवलंब केला. अनेकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत सायकल व पायी प्रवासाचा स्वीकार केला. (Green Day)
सकाळच्या सत्रात शाळा व महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. ”ग्रीन डे’ निमित्त पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची प्रतिज्ञा आज सर्व शाळा, कार्यालयांमध्ये घेण्यात आली. (Green Day)