Home » Blog » बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

0 comments
  • विजय चोरमारे

दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये समझोता होत असतानाच, बिहारमध्ये दहावी फेल मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे. आंदोलनकर्त्यांना उपद्रवी ठरवत सुमारे ५०० जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या आंदोलनातील पॅलट गनचा वापर वादग्रस्त ठऱला असताना बिहारमध्ये आंदोलकांविरोधात थेट एके-४७ चा वापर केल्याचा आरोप झाला. त्यावरून संसदेतही सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. कॉक्रोच जनता पार्टीनंही ही कारवाई गंभीरपणे घेतली असून कारवाई थांबवली नाही, तर पुन्हा दिल्लीत आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Bihar police using AK-47 against Students)

आंदोलकांवर एके-४७ मधून फायरिंग

दिल्लीतलं आंदोलन शांत झालं असताच बिहारमध्ये आंदोलनाचा भडका शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा विषय बिहारमध्ये तापला आहेच, परंतु त्याचे पडसाद थेट दिल्ली आणि संसदेपर्यंत पोहोचले आहेत. आंदोलकांवर एके-४७मधून फायरिंग केल्याचा मुद्दा दिल्लीतही विरोधकांनी उचलून धरला आणि त्यावरून सत्ताधा-यांना बॅकफुटवर जावं लागलं.

हेही वाचाः दिल्लीसारखा प्रयत्न केल्यास फटकावून काढणार ; राज ठाकरेंचा इशारा

बिहारमध्ये जहानाबाद आणि सिवान जिल्ह्यांत पोलिसांनी गोळीबार केला, तर काही जिल्ह्यांत इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर धरपकडही करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भाकपा (माले)चे आमदार संदीप सौरभ, तसेच अनेक विद्यार्थी नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ‘आयसा'(AISA) चे बिहार प्रदेशाध्यक्ष धनंजय कुमार, राज्य सचिव दीपांकर मिश्रा, उपाध्यक्ष सबा आफरीन आणि बिहार माध्यम प्रभारी कुमार दिव्यम यांनाही अटक करण्यात आली आहे. (Bihar police using AK-47 against Students)

दहावी नापास मुख्यमंत्री

बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर अमित शाह यांनी भाजपच्या नव्या संस्कृतीतला नेता बसवला आहे,त्याचं नाव सम्राट चौधरी. या सम्राट चौधरींना वयाच्य पंधराव्या वर्षी खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती, परंतु अल्पवयीन असल्यामुळं त्यांची सुटका झाली होती. राष्ट्रीय जनता दल, जेडीयू असा प्रवास करीत ते भाजपमध्ये दाखल होऊन अमित शाह यांच्या गळ्यातले ताईत बनले. बिहारमध्ये नीतिश कुमार यांना बदलण्याची वेळ आली तेव्हा सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. एकूण शिक्षणाबद्दल कमालीचे अज्ञान असलेल्या या चौधरी महाशयांनी सुरुवातीपासून विद्यार्थी आंदोलनावर दडपशाहीचं धोरण अवलंबलं.

बिहार पोलिसांनी अत्यंत घृणास्पद कृत्य केलं, ते म्हणजे त्यांनी आंदोलनकर्त्यांचे फोटो वृत्तपत्रांमध्ये छापले. जणू हे आंदोलक म्हणजे गुन्हेगार आहेत. मुजफ्फरपूर पोलिसांनी तर घाईघाईने आंदोलनकर्त्यांची छायाचित्रे ‘उपद्रवी’ म्हणून प्रसिद्ध केली. आणि त्यांना पकडण्यासाठी त्यांची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. (Bihar police using AK-47 against Students)

राज्यभर पोलिसांची दडपशाही

याशिवाय राज्यभर पोलिसांची दडपशाही सुरू आहे. राजधानी पटनासह इतर शहरांतील वसतिगृहांमध्ये घुसून तसेच अन्य ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. राज्यभर सगळीकडंच मोठ्या प्रमाणावर अटकसत्र सुरू आहे.

हेही वाचाः धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना

राजधानी पटना येथे तसेच इतर जिल्ह्यांत २२ जुलैला विद्यार्थी आंदोलन झाले. त्यानंतर २५ जुलैला बिहार बंद पुकारण्यात आला होता. त्यासंदर्भानं ही कारवाई सुरू आहे. म्हणजे ज्या आंदोलाच्या पाठिंब्यासाठी आंदोलनं झाली, ते दिल्लीतलं आंदोलन संपलं. पण त्याला पाठिंबा देणा-या बिहारमधल्या आंदोलकांवर मात्र पोलीस गुन्हेगारांप्रमाणे व्यवहार करीत आहेत.

केवळ पटना येथेच ३० महिला आणि ३० अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले. त्यांच्याकडूनही बाँड लिहून घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावरून पोलिस कारवाई किती व्यापक होती, याचा अंदाज येतो. एफआयआरची प्रत मागितल्यानंतर पोलिसांनी टाळाटाळ केल्याचाही आरोप आहे. तेज प्रताप यादव यांनीही अटकेच्या दिवशी एफआयआरची प्रत देण्यात आली नसल्याची तक्रार केली आहे. (Bihar police using AK-47 against Students)

पटना येथे किमान २०० जणांना तुरुंगात पाठवण्यात आले.  सिवान येथे किमान १०० जणांना तुरुंगात टाकले. आणि २,५०० अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सिवानमध्येच पोलिस गोळीबारादरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याने AK-47 मधून गोळीबार केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले. या गोळीबारात किमान तीन आंदोलनकर्ते जखमी झाल्याचे सांगितले जाते.

तेजस्वी यादव आक्रमक

आंदोलनाशी संबंधित लोकांच्या मते, ‘अज्ञात आरोपी’ म्हणून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा आधार घेऊन भविष्यात कोणालाही टार्गेट करून अटक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Bihar police using AK-47 against Students)

दरम्यान बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारपर्यंत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत, तर राष्ट्रीय जनता दल (RJD) संपूर्ण राज्यभर आंदोलन उभारेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून तुरुंगात पाठवून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचाः रामाच्या नावावर फसवणूक पूर्वापार

दिल्लीतल्या सरकारचा अहंकार कोवळ्या पोरांनी ठेचल्यानंतर जखमी झालेल्या भाजप सरकारने खुनशीपणे कारवाई सुरू केल्याचे सांगितले जाते. बिहारमधील कारवाई हा त्याचाच भाग आहे. परंतु बिहार ही नेहमीच परिवर्तनाची भूमी राहिली आहे. आणि दिल्लीतल्या संकटातून सहीसलामत सुटल्यानंतर मोदी-शाह बिहारच्या निमित्ताने आगीशी खेळत असल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. दिल्लीतील भाजप नेतृत्वाने बिहारमधील आंदोलन मोडून काढण्याचा संदेश दिल्यानंतर तेथील सरकार ही कठोर कारवाई करीत असल्याचे सांगण्यात येते. परंतु बिहारमधून सुरू झालेल्या वणव्यात इंदिरा गांधी यांच्या सरकारची आहुती पडली होती, त्याची पुनरावृत्ती होऊ शकेल, असा इशाराही देण्यात येत आहे.

विद्यार्थी नव्हे असामाजिक घटक

पटना जिल्हा प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी वृत्तपत्रांत पूर्ण पानाची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपली मते मांडण्याचा अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र त्याच जाहिरातीच्या अर्ध्याहून अधिक भागात शंभरहून अधिक आंदोलनकर्त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून त्यांना ‘असामाजिक घटक’ असे संबोधण्यात आले. (Bihar police using AK-47 against Students)

स्थानिक पातळीवरील माहितीनुसार, पूर्वी एखाद्या मोठ्या वृत्तपत्राला बिहार सरकारकडून सुमारे एक कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या जात होत्या. आता सम्राट चौधरी यांच्या कार्यकाळात त्यातीन कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. आर्थिक गुलाम बनवून प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा खेळ बिहार सरकार खेळत आहे. परंतु बिहारमधील वणव्याची झळ दिल्लीला बसू शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!