नवी दिल्ली : डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत वांशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मणिपूरला तीनवेळा भेटी दिल्या होत्या. त्यांनी केवळ भेटीच दिल्या नाहीत तर तेथील परिस्थिती समजून घेतली. वारंवार होणाऱ्या संघर्षांमागचे कारण जाणून घेतले. त्यावर दीर्घकालीन उपाययोजन आखल्या. त्याची अंमलबजावणीही टप्प्याटप्प्याने तत्काळ सुरू केली होती. त्यांनी जनतेच्या विकासासाठी आखलेल्या योजनांमुळे मणिपुरी नागरिकांच्या हृदयावर त्यांची अमिट छाप उमटली आहे. (Manipur)
मणिपूर जातीय हिंसाचार आणि अशांततेने ग्रासले होते अशावेळी डॉ. सिंग यांनी तेथे पहिली भेट दिली. २० नोव्हेंबर २००४ रोजी, त्यांनी कांगला किल्ला राज्य सरकारकडे सोपवण्याची मणिपुरी जनतेची मागणी पूर्ण केली. आसाम रायफल्सचे मुख्यालय असलेला कांगला किल्ला वसाहतकाळ आणि वसाहतोत्तर काळात लष्करी वर्चस्वाचे प्रतीक होता. त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तो मणिपूर सरकारकडे सोपवण्याची जनतेची अनेक वर्षांची मागणी होती.(Manipur)
‘हा आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. कांगला फोर्ट कॉम्प्लेक्स मणिपूर सरकारकडे सोपवण्याच्या या पवित्र प्रसंगी मला तुमच्यासोबत असल्याबद्दल अतीव आनंद होत आहे,’ असे उद्गार त्यांनी या समारंभात काढले होते.
विशेष म्हणजे आसाम रायफल्सच्या कोठडीत थंगजाम मनोरमा यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याच्या (अफ्सपा) विरोधात राज्यात तीव्र आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवरही त्यांची मणिपूरची भेट महत्त्वपूर्ण ठरली.(Manipur)
त्यांनी जनतेच्या तक्रारी ऐकल्या. त्यानंतर त्यांना त्यांच्या समस्यांचे निराकारण करण्याचे आश्वासन डॉ. सिंग यांनी दिले. त्यांनी ‘अफ्सपा’च्या तरतुदींचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. त्यांच्या भेटीनंतर लगेचच इम्फाळच्या नगरपालिका हद्दीतून ‘अफ्सपा’ हटवण्यात आला. हा निर्णय मणिपुरी नागरिकांच्या आकांक्षेची पूर्तता होती.
त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनंतर, २ डिसेंबर २००६ रोजी डॉ. सिंग विकासाभिमुख अजेंडा घेऊन मणिपूरला आले. ‘एम्स’च्या धर्तीवर रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (RIMS) सुधारणा करणे, स्थानिक कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा अकादमीची स्थापना, राज्याची सुलभता आणि आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी रस्ते आणि हवाई संपर्क सुधारणे यासह अनेक प्रमुख उपक्रमांची त्यांनी घोषणा केली. या भेटीमुळे राष्ट्रीय धोरणनिर्मितीमध्ये अनेकदा दुर्लक्ष होत असलेल्या या प्रदेशातील विकासातील तफावत भरून काढण्याच्या डॉ. सिंग यांच्या वचनबद्धतेला बळकटी मिळाली.
डॉ. सिंग यांनी पुन्हा ३ डिसेंबर २०११ रोजी मणिपूरला भेट देत तेथे आधी प्रस्तावित केलेल्या अनेक मेगा प्रकल्पांचे उद्घाटन केले. पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्ष आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांचे केंद्र ठरणाऱ्या सिटी कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन केले. शिवाय प्रादेशिक वाहतूक सुधारण्यासाठी आंतरराज्य बस टर्मिनस आणि देशाच्या न्यायिक प्रगतीचे प्रतीक ठरणाऱ्या उच्च न्यायालय संकुलाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
मणिपूरच्या प्रादेशिक अखंडतेसाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला होता. डॉ सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी मणिपुरी जनतेविषयी दाखवलेली सहानुभूती आणि कृती यांचे मिश्रण दिसून आले. मणिपूरवर त्यांनी आपली अमिट छाप सोडली.
हेही वाचा :
स्टेट्समन
कर्मयोगी