जमीर काझी : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या कल्याण येथील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते पगारे मामा यांना पंधरादिवसापूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी साडी नेसवली होती. या अपमानस्पद कृतीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अनोख्या पद्धतीने निषेध करीत पगारे यांचा सन्मान केला. त्यांना चक्क खांद्यावर उचलून स्टेजवर नेत देशाचे संविधान, गौतम बुद्ध यांची मूर्ती देऊन सत्कार करीत पक्ष सर्वशक्तिनिशी त्यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. (Mama Pagare)
उल्हासनगर येथील पक्षाच्या शाखा कार्यालयाच्या उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पगारे यांचाही गौरव करण्यात आला. कल्याण येथील अदानीच्या सिमेंट कंपनीला स्थानिकांचा विरोध असून त्याविरोधात आंदोलन सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईचे विमानतळ, धारावी, मदर डेअरी, देवनारची जागा मोदी सरकारने लाडक्या मित्राला दिली. त्यानंतर वाढवण बंदराच्या नावाखाली पालघर देऊन टाकले. आता कल्याणमधील ४५० एकर जमीन राष्ट्रीय शेठच्या सिमेंट कंपनीसाठी दिली. फक्त जमीनच दिली नाही तर या सिमेंट कंपनीसाठी पर्यावरणासह सर्व नियमच बदलून टाकले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. ही सिमेंट कंपनी स्थानिकांच्या जीवावर उठलेली असून स्थानिकांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी, दबाव आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवला आहे. या प्रश्नी काँग्रेस पक्ष विधानसभेतही आवाज उठवेल, असे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले. (Mama Pagare)
सरन्यायाधीश गवई व पगारे यांच्यावर हल्ला करणारी प्रवृत्ती ही मनुवादी आहे.त्याला न घाबरता चोख उत्तर दिले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हात लावण्याचे धाडस कोणी केले तर त्याच्यापाठीमागे सर्वशक्तिनीशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले. (Mama Pagare)