‘पाडाsपाडाss’च्या ज्वराला मराठवाड्यात ‘दामोजी’चा ‘काढा’

छत्रपती संभाजीनगर : रणजित खंदारे

मराठा आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेऊन मराठा-ओबीसी वाद निर्माण करून आंदोलन मोडीत काढल्याचा आंदोलकांकडून तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडल्याचा त्या पक्षातील कार्यकर्त्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत. मराठवाड्यात या दोन्ही घटकांच्या रोषाला सत्ताधारी महायुतीला सामोरे जावे लागले. मात्र शेवटच्या दोन दिवसांत या रोषाला उतारा म्हणून ‘दामोजीरावांना’ मैदानात उतरवल्याची चर्चा आता गावोगावी सुरू आहे. दरडोई २०० पासून दहा हजारांवर पोहोचलेला ‘दामोजीरावां’चा जोश या रोषाला थोपवेल का, हे शनिवारी निकालानंतर स्पष्ट होईल.

पाचवीला पूजलेला दुष्काळ, दिवसेंदिवस महाग होत चाललेले शिक्षण, वाढती बेरोजगारी, बेभाव विकावा लागणार शेतीमाल अशा चक्रव्युहात सापडलेल्या नेतृत्वहीन झालेल्या मराठवाड्यात मराठा आरक्षणाची ठिणगी पेटली. परिणामी येथे आरक्षण आंदोलनाची धगही जास्त होती. या आंदोलनाची मुख्य रणभूमीच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे गाव होते. मनोज जरांगे यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी या गावात झालेला लाठीचार्ज मराठा आंदोलकांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. या घटनेनंतर हे आंदोलन महाराष्ट्रभर पसरले. त्यातच महायुती सरकार एकीकडे मराठा समाजासाठी आरक्षण देण्याची भाषा करत असतानाच भाजपशी जवळीक असलेले काही कार्यकर्ते याला राजरोसपणे विरोध करत न्यायालयातही गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयऱ्याचा जीआर काढण्याचे आश्वासन जरांगे यांना दिले होते. मात्र तो जीआर निघाला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका, या सर्व घडामोडींमागे प्रामुख्याने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप जरांगे व मराठवाडा मराठा आंदोलक करत आहेत. यातूनच जरांगे यांनी ही विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.

पत्रकार परिषद घेऊन काही मतदारसंघात उमेदवार देणार तर काही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना पाडणार अशी भूमिका जाहीर केली होती. परंतु दुसऱ्या दिवशीच त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला व या निवडणुकीत मराठा आंदोलकांनी स्थानिक पातळीवर भूमिका घ्यावी, असे जाहीर केले होते.

मराठा आंदोलकांचा भाजपबरोबरच त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या शिंदे व पवार गटावरही निवडणुकीत रोष दिसून येत होता.

शिवसेनेचे मराठवाड्यात गावपातळीवर संघटन मजबूत होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचेही या भागात प्राबल्य होते. मात्र हे दोन्ही पक्ष फुटले. दोन्ही पक्षांचे चिन्हही फुटलेल्या गटांकडेच गेले. या सर्व घडामोडींमागे भाजपच आहे, असा आरोप करणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये भाजपबरोबरच फुटून बाहेर पडलेल्या आमदारांवर मोठा रोष होता. त्यामुळे भाजपबरोबरच गद्दारांना पाडा अशी या कार्यकर्त्यांची भूमिका होती. मराठा आंदोलकांचीही भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना पाडा अशी भूमिका होती. लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला होता. कारण मराठवाड्यातील लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर वगळता इतर सातही जागी महायुतीला पराभव पत्करावा लागला होता.

या पार्श्वभूमीवर ही विधानसभा निवडणूक पाडापाडा विरुद्ध दामोजीराव अशी झाल्याचे बोलले जात आहे.

Related posts

‘लाडकी बहीण’चा हप्ता अधिवेशनानंतर जमा, सर्व आश्वासने पूर्ण करणार

Nana Patole : बीडमधील गुंडगिरीत सहभागी मंत्र्याची हकालपट्टी करा

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट