कोल्हापूर : प्रतिनिधी : शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य पराक्रमांने सर्वांची छाती फुलून जाते. शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाची स्फूर्ती घेऊन वारणेच्या खोऱ्यांतील ३२५ महिलांनी ११ एकरांत ३५ टन रांगोळीचा वापर करुन भव्य रांगोळी साकारली आहे. निमित्त होते जिजाऊ जयंतीचे. जगातील ही सर्वांत मोठी रांगोळी असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. (Magnificent rangoli)
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वारणा समूहाकडून जिजाऊ जयंतीनिमित्त पारगाव येथील तात्यासाहेब कोरे सैनिक स्कूलच्या मैदानावर भव्य रांगोळी साकारण्याचा संकल्प सोडला. या उपक्रमात ३२५ हून अधिक महिलांनी सहभाग घेत शिवरायांची भव्य रांगोळी रेखाटली, अशी माहिती या उपक्रमाच्या आयोजक ईशानी कोरे यांनी दिली. (Magnificent rangoli )
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या रांगोळीची नोंद होणार आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल एक आठवड्याचा कालावधी लागला. यापूर्वी मिर्झापूरला तीन लाख ४५ हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी काढून वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात आला होता. मात्र, वारणानगर येथे साकारलेली रांगोळी तब्बल साडेचार लाख स्क्वेअर फुटांची असल्याने या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होणार आहे. (Magnificent rangoli )
स्वराज्य युवा प्रतिष्ठान, ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र आणि वारणा शिक्षण समूह यांच्या सामूहिक प्रयत्नातून ही रांगोळी साकारण्यात आली. या उपक्रमावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह गिनिज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांची समिती उपस्थित होती.