नगरसेवकांच्या कामगिरीवर नेत्यांचा वॉच

सतीश घाटगे : कोल्हापूर; कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण दोन विधानसभा मतदारसंघ येत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामगिरीवर नजर असणार आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना लोकसभा निवडणुकीत कोणत्या माजी नगरसेवकांची चांगली कामगिरी होती हे लक्षात घेऊन उमेदवारी दिली गेली. हाच फॉम्र्म्युला लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत प्रभागातील कामगिरीवर भविष्यात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी नगरसेवकांच्या उमेदवारीचा विचार नेत्यांकडून केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महानगरपालिकेत २०२० च्या आकडेवारीनुसार एकूण ८१ प्रभाग असून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ४४, तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ३७ प्रभाग आहेत. २०१० पासून महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. आघाडीने सत्तेच्या माध्यमातून महापौरपदासाठी अनेक पदे नगरसेवकांना दिली. २०१५ च्या निवडणुकीत  राज्यात महायुतीची सत्ता असल्याने भाजप आणि ताराराणी आघाडीने ३३ नगसेवक निवडून आणले होते. २०२० नंतर महानगरपालिका निवडणूक चार वर्षांहून अधिक काळ पुढे गेली असल्याने माजी नगरसेवक आणि इच्छुकांची विभागणी वेगवेगळ्या पक्षांत झाली आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने माजी नगरसेवकांचे गटही विभागले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून माजी नगरसेवकांनी काम केले होते. तरीही शहरातील अनेक प्रभागांत महाविकास  आघाडी पिछाडीवर पडली होती, तर काही भागात महायुतीला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे माजी नगरसेवकांनी उमेदवारी मागितली होती. लोकसभा निवडणुकीत कोणत्या नगरसेवकांची कामगिरी चांगली झाली आहे हे लक्षात घेऊन काँग्रेसने माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली. पण २७ नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात पत्रक काढल्याने लाटकर यांची उमेदवारी डावलून मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिली होती. ज्या २७ नगरसेवकांनी पत्रक काढले होते त्यांच्या प्रभागात लोकसभा निवडणुकीत काय परफॉर्मन्स होता, असा प्रश्न विचारला जात होता. माघारीच्या अंतिम दिवशी मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याने अपक्ष उमेदवार लाटकर यांना काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केले आहे. राजेश लाटकर यांच्या मागे खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील आणि काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची ताकद लागणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी खासदार धनंजय महाडिक, भाजप, ताराराणी आघाडी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना नगरसेवकांच्या माजी नगरसेवकांकडून मोठी रसद मिळणार आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील आणि भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांच्यात पारंपरिक लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून त्यांचे माजी नगरसेवक हिरीरीने प्रचार करत आहेत. कोल्हापूर उत्तरमधील माजी नगरसेवकांकडून दक्षिणेत प्रचार सुरू आहे. कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या दोन्ही निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या असून, माजी नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. माजी नगरसेवकांच्या प्रभागातून जास्त मते कशी मिळतील याकडे नेत्यांचे लक्ष आहे. प्रभागात कामगिरी कमी होऊ नये म्हणून माजी नगसेवकांनी पायाला भिंगऱ्या लावल्या आहेत. नेत्यांच्यामुळे ज्यांना महापौर आणि महानगरपालिकेतील महत्त्वाची पदे मिळाली आहेत त्या कारभारी नगसेवकांच्या कामगिरीवर नेते मंडळी लक्ष ठेवून आहेत. ज्यांच्या प्रभागात कामगिरी चांगली होणार त्याचा विचार महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार, अशी चर्चा आहे

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी