बेळगाव : प्रतिनिधी : ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, सीमालढ्याचे अग्रणी कॉम्रेड कृष्णा मेणसे (वय ९७) यांचे निधन झाले. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमालढ्याचा चालता बोलता इतिहास आणि अन्यायाविरूद्ध आवाज उठवणारा कामगार नेता अशी त्यांची ओळख होती. अप्पा म्हणून ते निकटवर्तीयांत परिचित होते. (Krishna Menase Death)
त्यांच्या पश्चात पुत्र प्रा. आनंद मेणसे, ॲड. संजय मेणसे, कन्या लता पावशे, श्रीमती नीता पाटील आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते.
कट्टर कम्युनिस्टवादी, उत्तम वक्ते, सीमा सत्याग्रही, लेखक, संपादक असे कृष्णा मेणसे यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा, यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. आपल्या विचारांशी पक्की निष्ठा असणारा नेता अशी त्यांची ओळख होती. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली होती. शाळकरी विद्यार्थी असताना ते गांधीजींना भेटण्यासाठी घरात न सांगता निघून गेले होते. त्यांची गांधीजींशी भेट झाली. त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विचारपूस केली. त्यानंतर गांधीजींनी कार्यकर्त्याला सांगून त्यांना बेळगावला परत पाठवले होते. (Krishna Menase Death)
आठ दशके लढा आणि संघर्ष
कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी उभारलेली आंदोलने, अंधश्रद्धा निर्मूलन, भ्रष्टाचार निर्मूलन, सीमालढा आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांत त्यांनी स्वत:ला झोकून देऊन कार्य केले होते. गेल्या आठ दशकांहून अधिक काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरून ते संघर्षशील राहिले होते. बिदर-भालकी, बेळगांव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. कॉ. कृष्णा मेणसे यांना काही दिवसांपूर्वी ‘राष्ट्रवीर’कार पुरस्काराने गौरविण्यात आले होते. (Krishna Menase Death)
पत्रकार, साहित्यिक
कर्नाटक, महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. बसवेश्वरांच्या वचनांचा त्यांनी मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. सीमालढा, कामगार कष्टकऱ्यांची आंदोलने करीत असताना पत्रकार म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘हेमंत’ या मासिकाबरोबर ‘साम्यवादी’ हे साप्ताहिक सुरु करून कष्टकऱ्यांच्या लढ्याला त्यांनी माध्यमात आणले. त्यांना आवाज दिला.
याबरोबर त्यांनी विपुल वैचारिक लेखनही केले. हो ची मिन्ह, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर, गोठलेली धरती पेटलेली मने, असा लढलो असा घडलो, डॉ. आंबेडकर आणि बुद्धधर्म, अशा तोडल्या बेड्या यांसारख्या अनेक वैचारिक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. विद्यार्थी आणि तरुण वयात कुस्तीपट्टू म्हणून त्यांचा बेळगाव परिसरात नावलौकिक होता. त्यांनी कुस्तीचे अनेक फड गाजविले होते. सत्यशोधक विचारांचा त्यांच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव राहिला आहे. ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई यांच्यासोबत बेळगाव परिसरात सत्यशोधक विचाराच्या प्रचार आणि प्रसारात ते पुढाकारात राहिले होते.
त्यांच्या जाण्याने सीमालढ्याचा एक बिनीचा शिलेदार आणि ज्येष्ठ मार्गदर्शक निघून गेला, सीमालढा चळवळीचे अपरीमित हानी झाली, अशा भावना व्यक्त होत आहेत.
हेही वाचा :