विशाळगड संशयित रवींद पडवळची कणेरीमठावर हजेरी

कोल्हापूर;  प्रातिनिधी : विशाळगड हिंसाचार प्रकरणातील फरारी असलेला प्रमुख संशयित रवींद पडवळ याने दोन दिवसापूर्वी करवीर तालुक्यातील कणेरी मठावर हिंदू संमेलनाला हजेरी लावली. रामगिरी महाराज आणि काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतल्याचा व्हिडिओ स्वत: रवींद पडवळने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. या संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. या संमेलनस्थळी चोख बंदोबस्त लावला असतानाही रवींद्र पडवळ पोलिसांना कसा दिसला नाही असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणांच्या विरोधात माजी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन केले होते. १४ जुलै २०२४ रोजी संभाजीराजे विशाळगडावर आंदोलन करण्यापूर्वीच हिंदू बांधव समिती आणि सेवाव्रत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये वस्तीत घुसुन हिंसाचार केला होता. या घटनेने महाराष्ट्र हादरुन गेल्यावर पोलिसांनी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी आवाहन करणाऱ्या रवींद्र पडवळ आणि बंडा साळुंखे यांच्यासह २० हून अधिक हल्लेखोरांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभागी झालेल्या काही संशयितांना पोलिसांनी अटक केली तर रवींद्र पडवळ आणि बंडा साळुंखे याला अटक करण्यासाठी पोलिसांनी आठ पथके निर्माण केली होती. पण दोघेही पोलिसांच्या ताब्यात सापडलेले नाहीत.

दरम्यान दोन दिवसापूर्वी कणेरी मठावर झालेल्या हिंदू संमेलनाला राज्यभरातील हिंदू साधू, संत, किर्तनकार, हिंदूत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह स्थानिक नेत्यांनी या संमेलनाला हजेरी लावली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संमेलनाला येणार असल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या संमेलनाला रवींद पडवळ याने उपस्थिती लावली. त्याने रामगिरी महाराजांची भेट घेतल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला असून त्या व्हिडिओमध्येही एक पोलिस कर्मचारी बंदोबस्तास असल्याचे दिसते. पडवळ याने काही राजकीय नेत्यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. फरारी असलेल्या रवींद्र पडवळ याला कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Related posts

police encounter : खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या तिघांचा एन्काउंटर

pune accident : पुण्यात भरधाव डंपरने नऊ जणांना चिरडले

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त